अंधश्रद्धा
डिसेंबर 20, 2013दीर्घायुषी राजा
मे 2, 2014प्रतिशोध
एखाद्या दुर्बल व्यक्तीवर अत्याचार करताना मनुष्य आपलं सामर्थ्य अबाधित राहील असं गृहीत धरतो. ही अहंगंडाची भावना इतकी प्रबळ असते की मग तो मनुष्य त्या व्यक्तीच्या मनात उद्भवणाऱ्या सुडाच्या भावनेलाही गौण समजतो. अशी चूक जीवघेणी ठरू शकते . . .
आडून पाहात होते त्याच्या चेहर्यावरची चिंता
जसा होतसे व्याकूळ कोणी विष अंगात भिनता
बावरलेली नजर तयाची बघते चारी ठाव
घाबरलेला होता तो जरी आणला होता आव
हसू माझिया ओठी घडला नव्हता जरी विनोद
पूर्ण होणार होता माझ्या अंतरीचा प्रतिशोध || १ ||
लग्नघडीला अल्लड होते मनात नव्हते पाप
चेहर्यावरती मात्र तयाच्या सदा दिसे संताप
नकार होता त्याचा मजला विचार त्याचे जहरी
मी तर होते गावाकडची अन् तो होता शहरी
प्रमाद माझा काय कळेना कितीही घेतला शोध
घरच्या रागाचा तो घेर्इ माझ्यावरी प्रतिशोध || २ ||
एके दिवशी घेऊन गेला मजला तो शहरात
गर्दीमध्ये नेऊन दिधला सोडून माझा हात
अशिक्षित निर्धन अन् दु:खी अबला मी असहाय
निर्दयतेने केला त्याने माझ्यावर अन्याय
तेव्हापासून अधोगतीला माझ्या ना अवरोध
जगत राहिले मन सांगे मम घे त्याचा प्रतिशोध || ३ ||
रूप टाकले बदलून माझे जशी टाकली कात
दबा धरून मी बसले जैसे श्वापद पाही वाट
संयमास फळ आले माझ्या चालून आली संधी
नव्या रूपाचा माझ्या तो तर पुरता बनला बंदी
प्रेम दाविले ऐसे दाबून अंतरीचा मी क्रोध
शांत मनाने रचिला होता त्याच्यावर प्रतिशोध || ५ ||
भुलवित आज आणिले त्याला किर्र अशा त्या रानी
ठाऊक वाटा केवळ मजला मी होते वनराणी
घातक दलदल हिंस्र श्वापदे असतील अंधारात
अरण्यात त्या नेऊन दिधला सोडून त्याचा हात
अरण्य होते शहरी तेव्हा अन् मी असे अबोध
खर्या अरण्यी सोडून त्याला पूर्ण होर्इ प्रतिशोध || ५ ||