श्रद्धा
जानेवारी 20, 2017उपदेश
एप्रिल 7, 2018पेराल तसे उगवेल
निवडणुका येत आहेत. ‘पेराल तसे उगवेल’ ही उक्ती निवडणुकीतील मतदानाइतकी दुसऱ्या कशालाही चपखल बसत नसेल. तेव्हा सावधान! ह्या म्हणीला साजेशी एक छोटीशी काव्यकथा सादर करत आहे . . .
येता महिन्याचा पुन्हा तो एक विशिष्ट वार
शेतकर्याने नेहेमीसारखा गाठला मग बाजार
महिनाभर केली जी ती मेहेनत फळण्याकरता
केवळ आजच्या दिवसाचा असे त्यास आधार
आला कच्च्या रस्त्याची खात सगळी धूळ
कमार्इचं होतं त्याच्या केवळ एकच मूळ
बनवत असे महिनाभर सतत करून कष्ट
ताजा शुद्ध सोनेरी साखरेसारखा गूळ
जायचं होतं परत लांब होती त्याला घार्इ
महिनाभर चालवायची होती आजची कमार्इ
धान्य भाज्या भांडी कपडे मुलांसाठी खेळ
घरी वाट पाहती मुलं आणि त्यांची आर्इ
गूळ दुकानात विकायला त्याने गाठली पेठ
त्याला बघून बाहेर आला दुकानातला शेठ
चेहेर्यावर संताप त्याच्या मावता मावत नव्हता
येऊन शेतकर्याची त्याने मानगूट धरली थेट
संशय आला होता मला पूर्वीच्या खेपेला
शेराला दहा तोळे कमी गुळाच्या ढेपेला
बरा सापडलास आता तुला सोडणार नाही मी
कोतवालाला बोलावतो तू जा जन्मठेपेला
शेतकरी रडत शेठच्या पाया पडला त्या
मालक माझं बोलणं जरा ऐकून तरी घ्या
नाही पटलं जर मी काय सांगतो ते तुम्हाला
तर मला खुशाल कोतवालाच्या ताब्यात द्या
मी गरीब कुठून आणू वजनाचा तो काटा
म्हणून जेव्हा येत असतो इकडे बाजारहाटा
नेतो तुम्ही मोजून देता शेर शेर धान्य
तेच वजन वापरून करतो गुळाचा मी वाटा
शेठ दुकानात जाऊन मान खाली घालून बसला
शेतकर्याचा शब्द त्याला नागासारखा डसला
आपलेच दात आपलेच ओठ सांगणार तरी कोणाला
पेराल तसे उगवेल ह्मावर विश्वास त्याचा बसला
2 Comments
सगळ्या कविता खूप खूप सुंदर अर्थपूर्ण
मनःपूर्वक धन्यवाद, मनीषा…