उपदेश
एप्रिल 7, 2018सरनौबत
मे 5, 2019निरुपयोगी
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! निर्व्याज प्रेमाची व्याख्या कुणी विचारली तर त्याला ‘आई’ असं एका शब्दात उत्तर देता येईल. आपल्या शरीराचा एक हिस्सा असलेलं आपलं अपत्य आईकरता आयुष्याचा केंद्रबिंदू असतं. मात्र सध्याच्या वाढत्या आयुर्मर्यादेच्या काळात अनेक आयांना आपण ‘निरुपयोगी’ झाल्याची खंत छळत असते. अशाच आजच्या एका आईची ही कहाणी…
पतीस नेर्इ काळ त्या दिशी पदरी होते बाळ
पोषण करण्या त्या तान्ह्माचे फिरली रानोमाळ
आचरण होते शुद्ध मनातून तेवत होती जिद्द
पार करतसे बाळासाठी ती यत्नांची हद्द
एकच त्या ध्यासापोटी ती स्वत:स विसरून जार्इ
ना कन्या ना पत्नी ती तर होती केवळ आर्इ || १ ||
मनास एकच ठाव पुत्र तो आपुला कमविल नाव
चैनीसाठी कधीच कुठली धरली नाही हाव
मनी विश्वास टिकला जेव्हा मुलगा भरपूर शिकला
आनंदाचा घन वर्षुनिया रोम रोम जणू भिजला
अभिमानाने अपत्यास ती डोळे भरूनी पाही
ना कन्या ना पत्नी ती तर होती केवळ आर्इ || २ ||
अशी मिळे संपत्ती तिच्या जणू दारी झुलती हत्ती
सुख मुलास मिळावे होती इतुकीच तिची आसक्ती
मोठ्या घरात आली आणि सुन सुरेख मिळाली
आयुष्यात सुखाची सांगा व्याख्या काय निराळी
म्हणते आता उरली नाही मनात इच्छा काही
ना कन्या ना पत्नी ती तर होती केवळ आर्इ || ३ ||
एकच इच्छा धरली होती तीही आता फळली
आयुष्याला परंतु काही दिशाचा नाही उरली
रमे पुत्र संसारी आली सुखे हाताशी सारी
आर्इची आता पण त्याला अडचण वाटे भारी
घरात आहे परंतु काही उपयोगाची नाही
ना कन्या ना पत्नी ती तर होती केवळ आर्इ || ४ ||
कशी जाहले अडगळ मनात विचार करते निष्फळ
चिंता मनीची वाहे सारखी दो डोळ्यांतून घळघळ
कामाचा तिज ध्यास होतसे सुन मुलाला त्रास
मौन तिच्याशी धरती दोघे मासांमागून मास
आपुला जाच होर्इ सर्वांना तिचे मन तिला खार्इ
ना कन्या ना पत्नी ती तर होती केवळ आर्इ || ५ ||
दिवस तेही पण सरले अवचित अमॄतकुंभच झरले
सुनेपोटी जन्मुनिया गोंडस बाळ घरी अवतरले
दॄष्टी बदले मुलाची त्याच्या खूणही पटे मनाची
घरात आता होर्इ तीही वस्तू उपयोगाची
बाळाकरीता रातरातभर गात बसे अंगार्इ
ना कन्या ना पत्नी ती तर होती केवळआर्इ || ६ ||
बाळ वाढतो भरभर नेहमी करे आजीचा आदर
आनंदी होताना ती पण विचार करते क्षणभर
बाळ होता असामी सारे म्हणतील मला निकामी
पुन्हा एकदा होर्इन घरात निरूपयोगी वस्तू मी
आयुष्याचे संचित उपयोगाहून हलके राही
ना कन्या ना पत्नी ती तर होती केवळआर्इ || ७ ||
2 Comments
प्रतिक्रिया काय देणार निव्वळ अप्रतिम
कविता आवडली हे वाचून आनंद झाला… धन्यवाद!