वरचढ
जानेवारी 1, 2016नव्याण्णववासी
मार्च 18, 2016नरक
सुख आणि दुःख ह्या दोन्ही सापेक्ष गोष्टी आहेत. इतरांच्या दृष्टीने दारिद्र्यात पिचलेला, संकटांनी घेरला गेलेला मनुष्यही सुखी असू शकतो आणि लौकिकार्थाने सर्व सुखांनी ज्याच्या पायाशी लोळण घेतली आहे असा मनुष्यही अत्यंत दुःखी असू शकतो. आपल्या प्राक्तनात लिहिलेल्या आयुष्याला स्वर्ग म्हणायचं की नरक हे ज्याच्या त्याच्या वृत्तीवर अवलंबून असतं . . .
शेठ किरोडी मेला गेला आकाशाच्या दारी
चित्रगुप्त त्याच्या जन्माची वही वाचतो सारी
चित्रगुप्त देतसे तयाला डोंगरमाथी बंगला
बंगल्यामध्ये त्याच्याकरता हजर सुखे ती न्यारी
शेठ पाही आनंदे आपुल्या नामाचा तो फलक
हा तर आहे नरक || १ ||
देवदूताने आश्चर्याने चित्रगुप्तास पुसले
शेठ किरोडीवरी येथले भाग्य असे का हसले
दीनदु:खितांना लुटले हा मनुष्य असला पापी
पैशांकरता केले ह्माने धंदे कसले कसले
पाप्यांना जर सुख मिळाले बसेल कैसा वचक
हा तर आहे नरक || २ ||
चित्रगुप्त हसुनिया म्हणाले बघ आपुल्या तू डोळा
सुवर्णदेखील दिले तयाला नाही काही तोळा
देवदूताचे डोळे फिरले पाहून इतुके सोने
त्याच्या दसपट वजनाचा तो होता मोठा गोळा
शेठ किरोडी हुरळे पाहून संपत्तीची झलक
हा तर आहे नरक || ३ ||
ढकलत सोन्याचा गोळा मग घराकडे तो जार्इ
कधी मढवतो घरास आपुल्या मनात त्याच्या घार्इ
डोंगरमाथ्यावरी चढवता दमून जार्इ पार
घसरत गोळा अर्ध्या वाटेवरूनी खालती येर्इ
पुन्हा चढवणे पुन्हा घसरणे पडला नाही फरक
हा तर आहे नरक || ४ ||
समजून गेला शासन कैसे देवदूत त्या जागी
शेठ किरोडी शरीरसुखी तरी असे मनाचा रोगी
जोवर पापाचा ना होर्इ त्याला पश्चात्ताप
सुखात तरीही शेठ किरोडी नरक यातना भोगी
हेच तयाला तेल उकळते हाच तयाला चरक
हा तर आहे नरक || ५ ||