वेल
जुलै 5, 2013बूट
डिसेंबर 6, 2013दुःख
१७ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रसंघाने ‘जागतिक गरिबी निर्मुलन’ दिवस म्हणून जाहीर केलेला आहे. सध्या निवडणुकीचे वारे वाहत असल्याने भारतात बऱ्याच जणांना अचानक गरीब दिसू लागले आहेत आणि गरिबीची जाणीव होऊ लागली आहे. गरिबी हेच जगातील दुःखाचं मुख्य कारण आहे. पराकोटीला पोहोचलं की शेवटी ह्या दुःखाचाच अभिमान मग मनात उरतो . . .ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/XykWLdJfMEM ह्या ठिकाणी ऐकता येईल.
एकदा आमच्या खोलीत बसलो होतो दोघे मित्र
तो होता वाचत घरून पाठवलेले पत्र
मित्र होतो तरी ओळख फार नव्हती आमची
भेटून एकमेकां झाला होता महिना मात्र || १ ||
उन्हाळ्याला होते दिवस फक्त उरले पंधरा
घेणे मला भाग होते नवीन एक सदरा
जुना सदरा माझा होता फाटून झाला जीर्ण
हिवाळ्यात शालीखाली लपत होता बरा || २ ||
बाप गेला ठेऊन गरिबी नव्हतं कोणी शिकलं
घरचं कोणीच माणूस माझ्या शाळेत नव्हतं टिकलं
एकच मुलगा हुशार धरली आर्इने पण जिद्द
ठेवत होती गहाण शेतात जे जे काही पिकलं || ३ ||
डोळे लावून बसली होती मुलगा होणार मोठा
आला शिकून परत की मग नाही कशाला तोटा
वस्तुस्थिती पण बेकारीची मलाच होती ठाऊक
डोळे आले भरून आठवून समज तिचा तो खोटा || ४ ||
दिसत नव्हता मार्ग जीवन झाले असे भकास
विचार होतो करत आणखीन होत होतो उदास
इतक्यात लक्ष गेले मित्र रडत होता हमसून
मला म्हणाला आयुष्यात मी झालो बघ नापास || ५ ||
मनात म्हंटले माझे दु:ख ठाऊक ह्माला नाही
पत्र त्याने हाती दिले ते मी वाचून पाही
बाप लिहीत होता पत्र हाती अन्य कुणाच्या
स्वत: होता अंध त्याला दिसत नाही काही || ६ ||
गहाण होते घर पुरात वाहून होते गेले
पुराने त्या जे जे होते सारे काही नेले
सावकाराने तारण म्हणून बहीण उचलून नेली
त्या धक्क्याने आर्इलाही त्याच्या वेडे केले || ७ ||
आता मुलगा हाच एक उरे त्यांस आधार
नाहीतर आत्महत्या होता शेवटचा विचार
त्याच्याकडे पैसे नव्हते गावी जाण्यापुरते
तिळ तिळ तुटले काळीज सोसवत नव्हता त्याला भार || ८ ||
हेलावून मी गेलो पाहून दु:खाचे ते माप
डोळ्यांमध्ये आणि दाटला माझ्या मग संताप
मागेपुढे नाही पाहीले धावून त्यावर गेलो
अनावर मी झालो होतो मारले त्यास अमाप || ९ ||
जगात मोठे दु:ख माझे मजला होता गर्व
माझ्यापेक्षा कमी दु:खी होते बाकी सर्व
हिरावली ती एकच होती माझी अमूल्य ठेव
अनभिषिक्त सम्राट मी दु:खाचा भूतपूर्व || १० ||
समजून गेला तोही मनात मनचे माझ्या भाव
वर्मी माझ्या बसला होता दु:खाचा तो घाव
आपले दु:ख कुरवाळायचा छंद असे आपल्याला
दु:ख समजण्या बाकीच्यांचे नसतो त्यात वाव || ११ ||