
छेड
नोव्हेंबर 25, 2022
प्रेमाचा पाढा
फेब्रुवारी 14, 2023… अडलं नाही बुवा

नास्तिक व्यक्ती बोलताना फार जपून बोलते. कधी आणि कशामुळे कुणाच्या भावना दुखावतील ह्याचा काही भरवसा नसतो. शिवाय देव मानणाऱ्या व्यक्तीचा दुसरा कुठला देव मानणाऱ्यांपेक्षा देव न मानणाऱ्या व्यक्तीवर जास्त राग असतो. पण मग नास्तिक व्यक्तींना स्वतःच्या काही भावना नसतात का? एखाद्या नास्तिक व्यक्तीने आपल्या भावना व्यक्त करायचं ठरवलं तर त्या कश्या असतील?ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/1UwkJpBoYGE ह्या ठिकाणी ऐकता येईल.
आयुष्यात विलक्षण काही घडलं नाही बुवा
देवावाचून कधी काही अडलं नाही बुवा ॥
बालपणातच लागली होती विज्ञानाची गोडी
विज्ञानानेच सोडवली ती बालपणीची कोडी
चमत्काराचं वेड कधी जडलं नाही बुवा
देवावाचून कधी काही अडलं नाही बुवा ॥
परीक्षेत कधी चांगली कधी वाईट आली वेळ
कधी झालो पास कधी नापासाचा खेळ
नवसावाचून शिक्षण काही रखडलं नाही बुवा
देवावाचून कधी काही अडलं नाही बुवा ॥
प्रेमामध्ये पडत होतो मुलीच्या प्रत्येक
नाही म्हणाल्या चार शेवटी हो म्हणाली एक
स्वर्गामधल्या गाठींना मी छेडलं नाही बुवा
देवावाचून कधी काही अडलं नाही बुवा ॥
कधी होती चांगली कधी नव्हतीही नोकरी
घरच्यांची अन् शेजाऱ्यांची नजर असे बोचरी
भकास जीवन दारूत कधी बुडलं नाही बुवा
देवावाचून कधी काही अडलं नाही बुवा ॥
आप्त आणि मित्रांना आजारपण नाही चुकले
काही जण वाचले काही वाचू नाही शकले
मृत्यूपासून जगात कुणीच दडलं नाही बुवा
देवावाचून कधी काही अडलं नाही बुवा ॥
देवभक्ती म्हणतात असते संस्कारांची ठेव
पण चागलं वागा कळण्यासाठी हवा कशाला देव
वडिलधाऱ्यांचं ऐकून कुणी बिघडलं नाही बुवा
देवावाचून कधी काही अडलं नाही बुवा ॥
देवाच्या नावाखाली नुसतेच बाजार भरतात
जितक्या व्यक्ती तितक्या देवाच्या व्याख्या करतात
कुठलंच स्पष्टीकरण मनाला भिडलं नाही बुवा
देवावाचून कधी काही अडलं नाही बुवा ॥
संकटं पुढेही येत राहतील त्याचा काय खेद
संकटांना आस्तिक नास्तिक असला नसतो भेद
पुढेही कधी अडेल असं वाटत नाही बुवा
देवावाचून कधी काही अडलं नाही बुवा ॥
आयुष्यात विलक्षण काही घडलं नाही बुवा
देवावाचून कधी काही अडलं नाही बुवा ॥