मे 3, 2013

बालपणीची मैत्रीण

फेसबुक आणि इंटरनेट सोडा, साधे फोनही दुर्मिळ असलेल्या आपल्या बालपणीच्या काळात मित्र किंवा मैत्रीण हरवून जाणं हे काही अपवादात्मक नव्हतं. तुमचे आहेत का हो असे मित्र किंवा मैत्रीण जे आजही आठवण आली की मनाला हुरहूर लावून जातात?

आठवत नाही आता
     आयुष्य सरकत जाता
कशा आणखी कोठे
     भिन्न जाहल्या वाटा

वाढे जगविस्तार
     असंख्य मनी विचार
नवलाईच्या डोही
     हरवून गेलीस पार
एप्रिल 19, 2013

निकाल

परीक्षा संपून आता निकालांची वेळ जवळ आली आहे. एकीकडे 'मुलांचा निकाल आहे, आपला नाही' ह्याचा असुरी आनंद तर दुसरीकडे 'काय दिवे लावले आहेत कोण जाणे' ह्याची चिंता अशा कातरीत तुमच्यापैकी बरेच जण सापडले असतील. घरातील तणाव कमी व्हावा म्हणून खास बाळगोपाळांकरता लिहिलेली ही कविता त्यांना अवश्य वाचून दाखवा …

विसरून गेले त्याच्यानंतर बाकीचे पेपर
सुचत नव्हतं कोणावरती फोडू मी खापर
एवढुसे ते मार्क बघुनी होई तोंड कडू
आईला मी काय सांगू आलंच मला रडू

माझ्या जागी स्वतःस ठेवा तुम्ही सुद्धा रडाल
परीक्षेचा नाही लागलाय माझाच आज निकाल
एप्रिल 5, 2013

मन

एक वेळ धूर मुठीत धरून ठेवणं जमेल, पाणी झारा वापरून भरणं जमेल, वाळू ओंजळीतून नेणं जमेल ... पण मन ताब्यात कसं ठेवावं? काही जण मनन चिंतन करतात, काही जण साधू-बाबांचा आसरा घेतात. कुणी योग तर कुणी व्यायाम करतात. तुम्हा कोणाला जमलंय का ह्या मनाला वेसण घालणं?

दिवसभर असा
     सोडला नाही वसा
संध्याकाळ झाली
     खाल्लाच सामोसा

डॉक्टर सांगतात मला
     कमी करा वजन
यत्न केले पण
     ताब्यात नाही मन
मार्च 15, 2013

स्वप्नं

स्वप्नं दोन प्रकारची असतात. पहिल्या प्रकारची स्वप्नं असतात शक्यतेच्या चौकटीत बसणारी ... जी पूर्ण करण्याकरता कष्ट करावे लागतात. दुसऱ्या प्रकारची स्वप्नं मात्र भव्य, उदात्त असतात ज्यांना शक्यतेची चौकटच अमान्य असते. रणजी खेळणाऱ्या खेळाडूने कसोटी सामन्यांत खेळण्याचं स्वप्न बघणं हे झालं पहिल्या प्रकारचं. तर घरातच आरशासमोर उभं राहून आपणच शोएब अख्तरला मारलेल्या सिक्सरचं धावतं समालोचन टोनी ग्रेगच्या आवाजात करणं हे दुसऱ्या प्रकारचं. चंदू आणि बंडूची स्वप्नं कोणत्या प्रकारात मोडतात ते तुम्हीच ठरवा ...

चंदू आणि बंडूचीही
     आपली स्वप्नं होती
घर लहान माणसं फार
     परिस्थितीच होती

चंदू म्हणे घ्यायचा आहे
     flat एक चांगला
बंडू म्हणे चंद्रावरच
     बांधीन मी एक बंगला

चंदू सतत काळजीत बंडू आनंदात मग्न
तुमच्या आमच्या मनात असतात अशीच काही स्वप्नं
मार्च 3, 2013

योगायोग

'मी असा आहे', 'मी तशी आहे' ... अशा वल्गना करताना आपण सोयीस्करपणे विसरतो की आपण जसे आणि जिथे आहोत ते असणं आपल्या हातात कधीच नव्हतं, नसतं. त्याला उत्क्रांती म्हणा, प्राक्तन म्हणा किंवा देवाची करणी म्हणा, शेवटी आपलं असणं हा फक्त एक योगायोग आहे. काल संपन्न झालेल्या 'राष्ट्रीय विज्ञान दिना'निमित्त ही एक विज्ञानावर आधारित कविता ...

एकच केवळ अंडाशय ते इतुक्या मोठ्या पोटी
एक जिंकला शुक्राणू अन् हरले कोटी कोटी
विजयाची तुमच्या सांगावी काय शक्यता होती

शक्यताशक्यतांचा ऐसा पिढ्यान् पिढ्यांचा ओघ आहे
तुमचं माझं जगणं म्हणजे निव्वळ योगायोग आहे
फेब्रुवारी 15, 2013

परकी मावशी

दर वर्षी येणारा फेब्रुवारी २१ हा दिवस राष्ट्रकुल संघाने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला आहे. हा दिवस जरी पूर्वीच्या पूर्व पाकिस्तानातील (सध्याच्या बांग्लादेशातील) बंगाली भाषिकांच्या लढ्याशी संबंधित असला तरी भारतासारख्या देशात जिथे इंग्रजी नावाच्या परक्या मावशीने आपल्या मराठी मातेची गळचेपी चालवली आहे, तिथे विशेष महत्वाचा आहे. आपल्या घरात ठाण मांडून बसलेल्या ह्या परक्या मावशीला मारलेली ही एक कोपरखळी ...

माध्यम घेतलं इंग्रजी तर कच्चा राही पाया
शिक्षण घेतलं मराठीमध्ये सारंच जाई वाया
साधे साधे शब्द मराठी कळत आता नाहीत
daddy झाले बाबा आणि mummy झाल्या आया

आपली भाषा विसरून जाती पडले सारे फशी
आपल्या घरात ठाण मांडुनी बसली परकी मावशी
फेब्रुवारी 1, 2013

एकुलता

आपल्या पुरुषप्रधान समाजात प्रसंगी मुलींची आबाळ करून मुलांना झुकतं माप दिलं जातं. बहुतेक वेळा ह्यामागे एक सूक्ष्म स्वार्थ दडलेला असतो. घरातील सर्व संसाधनं उपभोगलेल्या त्या मुलाला त्या गुंतवणुकीची परतफेड करायची असते. अशा मानसिक दबावाला तोंड देणं सोपं नसतं.

"... होय, त्याला लिहिता वाचता येत होते. येणारच! तो चांगला पदवीधर होता. बी कॉम. काय काय विषयांचा अभ्यास केला होता त्याने. बुक कीपिंग, अकाऊंटन्सी, इकोनॉमिक्स ... त्याला तशाही अवस्थेत हसू आले. संतोषच्या घरच्यांना तर हे शब्द कानडी किंवा मल्याळी शब्दांइतकेच अनोळखी होते. पण तरीही संतोष शिकला होता ... नव्हे त्याला त्याच्या घरच्यांनी शिकवले होते ..."
जानेवारी 18, 2013

स्वामी विवेकानंद

बारा जानेवारी रोजी नरेंद्र नाथ दत्त अर्थात स्वामी विवेकानंद ह्या महापुरुषाची शतकोत्तर सुवर्णजयंती साजरी झाली. स्वामी विवेकानंदांसारख्या विराट व्यक्तिमत्वाला शब्दांमध्ये बंदिस्त करणे म्हणजे अशक्यप्राय गोष्ट आहे. तरीही माझ्या वतीने हा आदरांजलीचा लहानसा प्रयत्न ...

वस्तुस्थिती घेण्यास जाणुनी फिरला साऱ्या देशी
प्रगल्भ करण्या विचार लांघे धर्मांच्याही वेशी
पाच वर्षं देशाटन केले चार धाम अन् काशी

पाहुनी द्रवला देशाच्या पिडीत मनीचा आक्रंद
तो भारतभूचा सुपुत्र होता स्वामी विवेकानंद
जानेवारी 4, 2013

डोरेमॉन

तुमच्या घरी किंवा आजूबाजूला लहान मुलं असतील तर डोरेमॉन म्हणजे कोण हे तुम्हाला सांगायची गरज नाही. नोबिता हा एक ८-१० वर्षांचा धांदरट मुलगा. तो कधीही संकटात सापडला की बाविसाव्या शतकातून आलेलं डोरेमॉन हे यंत्रमांजर त्याला एखादं जादुई उपकरण (गॅजेट - gadget) देऊन त्याची सुटका करण्यास मदत करतं. एका संकटातून दुसऱ्या संकटात जाणाऱ्या आपल्या देशाला पाहून अशाच एखाद्या डोरेमॉनची निकड फार प्रकर्षाने जाणवू लागली आहे ...

इथे आम्हाला देव दिसतो जमिनीवर उगवणाऱ्या साध्या दर्भात
पण देवीसारख्या मुलींना आम्ही मारून टाकतो गर्भात
स्त्री पुरुषांचं समाजातील स्थान समान करण्याकरता
     डोरेमॉन मला एक गॅजेट देशील काय?