सप्टेंबर 12, 2018

बाप्पांचे पर्यावरण

उद्या येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! फार मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या ह्या उत्सवामुळे पर्यावरणाबद्दल चिंता वाटणं साहजिक आहे. काही दिवसांपूर्वी एका शाळेतील मुलांकरता गणपती दरम्यान आणि एरवीही पर्यावरणाची काळजी कशी घेता येईल ह्याबद्दल एक आरती लिहून देण्याची संधी मिळाली. ती आरती सादर करत आहे...

जय देव जय देव जय मंगलमुर्ती
प्रदूषणाने त्रासली धरती
     जय देव जय देव ॥

POPची मूर्ती हवी कशाला
     शाडूच्या मूर्तीत आणू तुम्हाला
Thermocolचे मखर नको आम्हाला
     Plastic Nylon सर्वांनी टाळा
     जय देव जय देव ॥

टाकणार नाही ताटात पोळ्या
     आवरून ठेवू आमुच्या खोल्या
बघाल फरक आपुल्या डोळ्या
     निर्माल्येही टाकू कचऱ्यात ओल्या
     जय देव जय देव ॥
जुलै 7, 2018

चॉकलेट

जागतिक चॉकलेट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! युरोपमध्ये म्हणे आजच्या दिवशी चॉकलेटचं आगमन झालं. असो... आपल्याला काय करायचंय! चॉकलेट खाण्याकरता आपल्याला निमित्त पुरतं. आबालवृद्धांना आवडणारा हा पदार्थ कधी खावा हे सांगणारी ही जंत्री...

वाढे वजन करा उपास ।
     पण झकास चॉकलेट खावे ॥
वजन घटता मनी संतोष ।
     करुनी जल्लोष चॉकलेट खावे ॥

वय जाहले बाल्य आठवे ।
     मुलांच्या सवे चॉकलेट खावे ॥
वयाचे काय आकड्यांचा खेळ ।
     मिळता वेळ चॉकलेट खावे ॥
जून 2, 2018

नसणार तू ….

“पिल्लं मोठी झाली की घरटं सोडून जाणारच”, हे बोलायला आणि ऐकायला किती सोपं वाटतं. पण आपलं रिकामं घर बघून ज्याचं मन जळतं त्यालाच कळतं...

त्याच भिंती त्याच खोल्या
     त्याच जागा दिसती डोळ्यां

त्या कपाटामागुती शोधी मी जर लपलीस तू
     पण तिथे नसणार तू ||


त्याच खुर्च्या तेच टेबल
     पुस्तकांवर तेच लेबल

आर्इही चिडणार नाही पसरल्या जर वस्तू तू
     पण तिथे नसणार तू ||
मे 13, 2018

निरुपयोगी

जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! निर्व्याज प्रेमाची व्याख्या कुणी विचारली तर त्याला ‘आई’ असं एका शब्दात उत्तर देता येईल. आपल्या शरीराचा एक हिस्सा असलेलं आपलं अपत्य आईकरता आयुष्याचा केंद्रबिंदू असतं. मात्र सध्याच्या वाढत्या आयुर्मर्यादेच्या काळात अनेक आयांना आपण ‘निरुपयोगी’ झाल्याची खंत छळत असते. अशाच आजच्या एका आईची ही कहाणी...

एकच इच्छा धरली होती तीही आता फळली
     आयुष्याला परंतु काही दिशाचा नाही उरली

रमे पुत्र संसारी आली सुखे हाताशी सारी
     आर्इची आता पण त्याला अडचण वाटे भारी

घरात आहे परंतु काही उपयोगाची नाही
     ना कन्या ना पत्नी ती तर होती केवळ आर्इ ||
एप्रिल 23, 2018

पुस्तक

जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! किती पोकळ वाटतात ह्या शुभेच्छा... जागतिक भीमसरट दिनाच्या शुभेच्छा म्हटल्यासारखं... कुणे एके काळी भाषेची, समाजाची, राज्याची श्रीमंती लिहिल्या आणि वाचल्या जाणाऱ्या पुस्तकांवरून ठरत असे. आता मात्र संगणक आणि स्मार्टफोन्सच्या वावटळीत पुस्तकांची वाळलेली पानं भिरभिरत उडून गेलेली दिसतात. अशाच एका पुस्तकाचं हे आत्मकथन....

अजून वाटे मनाला
	सांगावे जनाला
मित्रच तुमचे आम्ही
	शंका का कुणाला

यावे परत फिरुनी
	हातामध्ये धरुनी
अमृतप्राशन तुम्ही
	अन् पाहावे करुनी

वाटत नाही परंतु मिळतील आम्हाला वाचक
मी तर आहे कपाटामधील जीर्ण शीर्ण पुस्तक ||

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/lWQzAtCCABA ह्या ठिकाणी ऐकता येईल.
एप्रिल 7, 2018

उपदेश

आंतरराष्ट्रीय आरोग्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आरोग्य हा शब्द बोलून पूर्ण होण्यापूर्वी तुम्हाला सतराशे साठ सल्ले मिळतात... विशेषतः dietingच्या बाबतीत. एखादा सल्ला आचरणात आणणं किती कठीण आहे हे प्रत्येक सल्ला देणारा विचारात घेतोच असं नाही ....

स्वामीजींच्या भेटीसाठी शेटजी आला एक
     संगे घेऊन आला होता मुलगा त्याचा छोटा
पैसा होता खूप तरीही वृत्ती होती नेक
     दुःख होतं एकच मुलगा लाडावलेला होता

फार दुरून आला होता ऐकून ज्यांचे नाव
     त्या स्वामींना पाहून त्याने वाकून प्रणाम केला
स्वामीजींच्या चेहेऱ्यावरती तेजःपुंज भाव
     शेटजीच काय मुलगा देखील पाहून भारून गेला
मार्च 31, 2018

नाव

काही जणांना ‘मीच माझ्या आयुष्याचा शिल्पकार आहे’ असा आत्मविश्वास असतो तर काही जण ‘देवाला काळजी’ अशी सपशेल शरणागती पत्करतात. विचार करण्याची कुवत असलेला एकमेव जीव, मानव, पूर्वापारपासून आपल्या आयुष्याचा अर्थ लावण्याकरता कधी अध्यात्माची तर कधी विज्ञानाची कास धरत आला आहे. पण खरं सांगायचं तर ....

नाही सुकाणू नाही शीड ना वल्ह्यांचाही ठाव
     आयुष्य जैसे नावाड्यावाचून असावी नाव ||

ऐलतीराचा पत्ता नाही पैलतीर ना ठावे
     कशास आलो कुठे चाललो कुणी कुणा सांगावे
प्रवाह जैसा जैसा वारा तैसीच घेई धाव
     आयुष्य जैसे नावाड्यावाचून असावी नाव ||

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/JhauMnqzsP0 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मार्च 18, 2018

अघटित – असं फक्त इतरांच्या बाबतीत घडतं!

'आजची आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना ह्यापूर्वी कधीतरी घडलेली असते. आयुष्य हे रुळावरून धावणाऱ्या आगगाडीप्रमाणे असतं असं गृहीत धरून आपण जगत असतो. आयुष्याला कलाटणी देणारे बदल केवळ इतरांच्या बाबतीत घडतात असा आपला ठाम समज असतो. इतरांकरता आपण ‘इतर’ असतो हे आपण सोयीस्करपणे विसरतो. त्यामुळे एखादी अघटित घटना जेव्हा आपल्या आयुष्यात घडते तेव्हा आपण मुळापासून हादरून जातो. आपल्या बाबतीतही असं घडू शकतं ह्या साक्षात्कारामुळे आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पार बदलून जातो...’

‘अघटितप्रकार: लघुकथासंग्रह
स्वरूप: छापील, Kindle Edition
प्रकाशक: राफ्टर पब्लिकेशन्स
पृष्ठसंख्या: २२८
कमाल किंमत: ₹ २५०/- (छापील), ₹ २००/- (Kindle Edition)
फेब्रुवारी 26, 2018

सागरा प्राण तळमळला

भारतमातेची परकीय जोखडातून मुक्तता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून विकास ह्या दोन ध्येयांकरता वाटेल त्या हालअपेष्टा सहन करण्याची तयारी ठेवणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज पुण्यतिथी आहे. ‘न धरी शस्त्र करी मी’ अशा ह्या वीराचा इंग्रजांनी इतका धसका घेतला होता की त्यांना पार अंदमानात पन्नास वर्षांकरता काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. अंदमानातही वीर सावरकर अमानुष अत्याचार सहन करत अथक कार्यरत होते. मात्र मातृभूमीपासून दूर ठेवणाऱ्या सागराला पाहिलं की मनात एकच विचार येत होता....

केवळ सत्तावीस वयाला नशीब फिरवी पाठ
दहा साल पण सुटकेचे सन एकोणीसशे साठ
काळ्या पाण्याकरता सोडी भारतभूचा काठ

दिसेल का कधी भारतमाता आत्मा गहिवरला
एकच विचार मनी सागरा प्राण तळमळला ||