जानेवारी 16, 2015

दोन देश

भारत हा विरोधाभासांचा देश आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. आपली लोकसंख्याच एवढी आहे की विरोधी विचारसरणीच्या लोकांची टक्केवारी जरी कमी असली तरी त्यांचा आकडा मोठा असू शकतो. ह्या विरोधाभासांकडे कधी नाईलाजाने, कधी सोयीस्करपणे तर कधी निर्ढावल्याप्रमाणे दुर्लक्ष करायला आपण शिकलो आहोत . . . 

परदेशाची स्वच्छता
     डोळे दिपविते पाहता
लाज नाही पण थुंकता
     हे दोन्ही देश माझे

गातो एकतेचे गुण सारे
     पण धर्म जातही प्यारे
भिंती बांधून अडवू वारे
     हे दोन्ही देश माझे

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/dvRP__5wF9U ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जानेवारी 2, 2015

लक्ष कुठे

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आधीच वेळ कमी मिळतो, त्यात एकविसाव्या शतकातील आधुनिक उपकरणांनी आपल्या उरलेल्या वेळेचाही ताबा घेतलेला आहे. आपण बोलत असताना एखाद्याचं आपल्याकडे लक्ष नसणं किंवा एखादी गोष्ट तू मला सांगितलीच नाहीस असं एखाद्याने सांगणं हे प्रकार आता वारंवार घडू लागले आहेत. साध्या साध्या गोष्टीतही 'कहीं पे निगाहें कहीं पे निशाना' म्हणावं लागत आहे . . . 

आजकालचा माणूस हरपे मेंदूवरती चढती पुटे
     नजर कुठे अन् लक्ष कुठे

शाळेमधली गंमत सांगत मुलगी थुईथुई नाचे
महाशयांची नजर मात्र संदेश फोनवर वाचे

हिरमुसलेल्या कन्येचे त्या काही क्षणांतच हृदय तुटे
     नजर कुठे अन् लक्ष कुठे
डिसेंबर 19, 2014

आता केस पिकले

केस पिकण्यामागे जैवरासायनिक कारण काहीही असो, एक गोष्ट मात्र नक्की की त्या वयात मनुष्य आयुष्याचं सिंहावलोकन करायला शिकतो. आयुष्यात अनुभवलेले हेवे-दावे, भांडणं, सुख-दुःखाचे प्रसंग . . . एकूण आयुष्यापुढे कोते वाटू लागतात. तुम्हाला आलाय का असा अनुभव?

आयुष्य असते फारच छोटे मजला कळून चुकले
     आता केस पिकले

नकार मिळता तिच्या मुखातून पचला नव्हता धक्का
भीष्मासम ब्रह्मचर्य पाळीन विचार केला पक्का
गृहस्थ पुरता आता शंका नाही एकही टक्का

प्यार मुहोब्बत असली गाणी ऐकून कान किटले
     आता केस पिकले
डिसेंबर 5, 2014

नकोशी तारीख

आपला एखादा मित्र किंवा मैत्रीण असते . . . त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या तारखा आपण लक्षात ठेवतो . . . विशेषतः जन्मतारीख, लग्नाची तारीख, वगैरे . . . बाकी काही नसलं तरी ह्या तारखांना आपलं नातं घट्ट होत असतं . . . आणि एक दिवस अचानक समजतं . . . तो मित्र किंवा मैत्रीण आपल्याला सोडून ह्या जगातून निघून गेले आहेत . . . आपल्याकरता मागे ठेवून एक तारीख . . . नकोशी!

मुलांनी विचारलं कोण होता तुमचा बेस्ट फ्रेंड - जिवलग मित्र
की डोळ्यांसमोर यायचं तुझंच चित्र

आणि . . . एक दिवस समजलं तू ह्या जगातून निघून गेलास
साधा निरोप घ्यायचा चान्सही नाही दिलास
नोव्हेंबर 21, 2014

बहिरा

दुसऱ्याकडे बोट दाखवताना (निदान) तीन बोटं आपल्याकडे वळलेली असतात हे आपण सोयीस्करपणे विसरतो. त्यामुळे कधी कधी आपलेच शब्द आपल्याच घशात जायची वेळ येते. अशाच कुठेतरी वाचलेल्या एका विनोदावर आधारित ही कविता . . . 

बरेच दिवस घोळत होता संशय माझ्या मनात
     गडबड आहे नक्की माझ्या बायकोच्या कानात
ह्या बाबतीत समजत नव्हतं करू तरी काय मी
     माझ्या बायकोला ऐकू येतंय का हो कमी?

नाक कान घसा तज्ज्ञ होता माझा मित्र
     भेटून त्याला मनचं माझ्या स्पष्ट केलं चित्र
मित्राने सांगितली मला शक्कल एक नामी
     माझ्या बायकोला ऐकू येतंय का हो कमी?
नोव्हेंबर 7, 2014

वीज

भारतातील ज्या असंख्य खेड्यांमध्ये अजूनही वीज पोहोचलेली नाही त्यांनी वीज ही फक्त तालुक्याच्या ठिकाणी पाहिलेली असते. ज्या अनेक गावांत वीज काही तासांकरताच मिळते त्यांना विजेचं महत्व कळतं. शहरांची गोष्ट मात्र वेगळी आहे. इथे वीज जाणार ह्या विचारानेच आपल्याला घाम फुटतो. गंमत म्हणजे पूर्णपणे विजेचे गुलाम बनलेले आपण ह्या दास्यातून मुक्ती मिळाली तर पार सैरभैर होऊन जाऊ . . . 

शांत होते रस्ते झाली होती निजानीज
     आमच्या शहरामधून एकदम गायब झाली वीज।।

घामाघूम झालो आम्ही सारे बसलो उठून
     एसीकरता बंद घर वारा येईल कुठून
थोड्याच वेळात येईल आमचा विचार होता पक्का
     प्रातःकाळी पेपर वाचून बसला मोठा धक्का

सात दिवस बंद राहील करा तुम्ही तजवीज
     आमच्या शहरामधून एकदम गायब झाली वीज।।
ऑक्टोबर 17, 2014

एक भाऊ असावा

राखीपौर्णिमेला जाहिरातबाजी कितीही झाली तरी महाराष्ट्रात भाऊ-बहीण नात्याला खरा उजाळा मिळतो तो भाऊबिजेला! प्रत्येक मुलीला, स्त्रीला आपल्याला आधार देणारा एक भाऊ असावा असं नक्की वाटतं. पुढल्या आठवड्यात येणाऱ्या भाऊबिजेच्या निमित्ताने एका बहिणीच्या भावना अधोरेखित करणारी ही कविता . . .

सतत खोड्या काढल्या तरी
     पाठवणीची वेळ येताच
कोपऱ्यात बसून आपले डोळे
     पुसणारा एक भाऊ असावा

अरेतुरेची सलगी साऱ्या
     मोठ्यांकरता चालत नाही
मुलांकडून मामा म्हणवून
    घेणारा एक भाऊ असावा

आपलं सुख आपलं मानून
     घेणारा एक भाऊ असावा
आपल्या दुःखात ठाम उभा
     राहणारा एक भाऊ असावा
ऑक्टोबर 3, 2014

जाणार नाहीस ना

हल्ली internet आणि mobileवर दहापैकी नऊ विनोद हे बायको ह्या व्यक्तीबद्दल असतात. पिकतं तिथे विकत नाही हेच खरं कारण ज्यावेळी पुरुषावर कौटुंबिक, सामाजिक किंवा आर्थिक संकट येतं तेव्हा collegeमधल्या मैत्रिणी किंवा सिनेमातल्या नायिका नाहीत तर हीच अर्धांगिनी पुरुषाच्या मागे ठामपणे उभी राहते. अशा वेळी धास्तावलेला पुरुष एकच प्रश्न विचारत राहतो . . . तू मला सोडून तर 'जाणार नाहीस ना?'

निकड भासते पदोपदी मज
     नसते जेव्हा सानिध्य
मला उगाच स्वावलंबी
     करून जाणार नाहीस ना

ह्या हृदयाच्या गाभाऱ्यातील
     सुगंध आहे तुझ्यामुळे
धुराप्रमाणे उदबत्तीच्या
     विरून जाणार नाहीस ना

वळण आलं वाटेमध्ये
     सरळ जाणार नाहीस ना
तेव्हा माझा हात सोडून
     दूर जाणार नाहीस ना
सप्टेंबर 19, 2014

किती सूक्ष्म किती भव्य

विज्ञानाची अलौकिक भरारी दोन दिशांना गवसणी घालत चालली आहे. एक दिशा आहे अतिसुक्ष्माची तर दुसरी आहे अतिभव्याची. एका टोकाला अतिसूक्ष्म कणांच्या प्रक्रिया तर दुसऱ्या टोकाला ब्रह्मांडाची व्याप्ती! ब्रह्मांडाच्या साऱ्या गुपितांचा छडा लावल्याशिवाय हे शास्त्रज्ञ थांबणार नाहीत . . .

पाण्याच्या रेणूत चिमुकला हायड्रोजनचा अणू
चंद्र पृथ्वीहून विशाल सविता तीन पिढ्या त्या जणू
अणू दिसे ना कुणा कुणी ना गेले सूर्यावर
किती सूक्ष्म हे चराचर
     किती भव्य हे चराचर

कधी सूक्ष्मदर्शकातून दिसे कधी दुर्बिणीचा वापर
किती सूक्ष्म हे चराचर
     किती भव्य हे चराचर

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/St0nGb9wSGQ ह्या ठिकाणी ऐकता येईल.