सप्टेंबर 5, 2014

जिंकणाऱ्यांची दुनिया

शर्यतीत मागे पडलेले खेळाडू, सिनेमात हिरो-हिरोइनच्या मागे नाचणारे एक्स्ट्रा, ६०% गुण मिळवून पास होणारे विद्यार्थी ह्या सर्वांमध्ये एक समान दुवा असतो. जगाने ह्या साऱ्यांच्या माथी 'अयशस्वी' किंवा 'हरलेले' असा शिक्का मारलेला असतो. गम्मत म्हणजे अशा हरलेल्यांची संख्या जिंकलेल्यांपेक्षा कितीतरी अधिक असते आणि तरीही आपण ह्या जगात जगायला नालायक आहोत असा न्यूनगंड मनात जोपासत हे हरलेले जगत असतात. काहीतरी नक्की चुकतंय . . . 

दुसऱ्याला मारूनच येथे
     पोट भरत असेल तर
हिंस्र पशूंच्या जंगलामध्ये
     चरणाऱ्यांनी काय करावं

यश कसे मिळवावे हे तर
     असंख्य तोंडी ऐकत असतो
हलाहल अपयशाचे रोज
     पचवणाऱ्यांनी काय करावं

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/aQ_vMM8YQa4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑगस्ट 15, 2014

आरसा

समांतर ब्रह्मांडांची कल्पना प्रगत भौतिकशास्त्राच्या कक्षेत येते. मात्र आपल्या सानिध्यात, आपल्या घरातही एक समांतर ब्रम्हांड असतं ज्यात डोकावण्याच्या खिडक्यांचं काम करतात घरी दारी असणारे आरसे! त्या ब्रह्मांडातील व्यक्ती आपल्याकडे प्रतिबिंब म्हणून बघत असतील का? काही असलं तरी त्या ब्रह्मांडाची नाळ आपल्या ब्रह्मांडाशी कायमची जोडली गेलेली आहे एवढं नक्की!

आरशातल्या माझे असते खचितच न्यारे घर
पदर साडीचा पत्नी घेते उलट्या खांद्यावर
माझ्या तुलनेमध्ये त्याचा भांग उलट तो कसा
कुण्या समांतर जगतामध्ये नेई मला आरसा
ऑगस्ट 1, 2014

क्षितीज

'अमुक एवढी' गोष्ट झाली की मी निवृत्त होणार' असं आपल्यातील प्रत्येकाला वाटत असतं. प्रत्यक्षात मात्र कोणीही निवृत्त होताना दिसत नाही कारण ती 'अमुक एवढी' गोष्ट एखाद्या क्षितीजाप्रमाणे असते. आपण क्षितीज म्हणून ठरवलेल्या जागी पुढचं क्षितीज तयार असतं . . .  

प्रत्येक क्षितिजापुढती मजला लोक दिसत होते
गंमत म्हणजे तेही पुढे पुढे पळत होते
तरीही तेच लक्ष्य माझे विचार म्हणत होते

समोर दिसेल ते सारं मला काबीज हवं होतं
फार काही नाही
     मला फक्त ते क्षितीज हवं होतं
जुलै 18, 2014

देव असावा कसा

'देव कुणाला म्हणावे अथवा म्हणू नये' असा एक नवीनच वाद सध्या सुरु आहे. मला इतके दिवस वाटत होतं की देव हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. एखादी गोष्ट देव आहे किंवा नाही हे ठरवणारी एखादी संस्था आहे हेच मला ठाऊक नव्हतं. आमच्या office मध्ये दसऱ्याला phone आणि संगणकांचीही पूजा होते. त्याकरता परवानगी घेतली आहे का हे तपासलं पाहिजे . . .
 
. . . 

देव असावा असा
     सकाळची न्याहारी
दिनभरच्या कामाची
     मिळेल उर्जा सारी

देव असावा असा
     जशी वाट ती लांब
मार्गी त्या लागता
     कुणी न म्हणते थांब

देव असावा असा
     आसमंत ते निळे
जगी कुठेही जावे
     त्याचे छप्पर मिळे

. . . 
जुलै 4, 2014

पाप

पाप-पुण्याची अध्यात्मिक चर्चा ऐकायची असेल तर स्मशानासारखी जागा नाही. मरणाची अपरिहार्यता नजरेसमोर उभी ठाकली की राग, लोभ, द्वेष, मत्सर ह्या भावनांचा फोलपणा जाणवू लागतो. मात्र स्मशानभूमीच्या बाहेर हे विचार जिवंत ठेवू शकणारा खरा योगी असतो!

निरखून बघती स्वामी चिंता चेहऱ्यावरती आली
     माझे सोड अभाग्या लिहिले काय तुझिया कपाळी
तुझ्या जीवनी आता केवळ दिवस राहिले सात
     स्पष्ट दिसतसे मजला ती मृत्यूची सावली काळी

भाविक तो दचकुनिया उठला जसा दिसावा साप
     विसरुनी गेला प्रश्न स्वतःचा काय पुण्य अन् पाप
जून 6, 2014

इस्पितळाची वारी

अपघाताप्रमाणे इस्पितळात भरती व्हावं लागणं हे केवळ इतरांच्या बाबतीत घडतं असा आपला समज असतो. इतरांना भेटायला आपण अनेकदा इस्पितळात जातो. मात्र इस्पितळ ह्या जागेचं गांभीर्य आपल्याला स्वतःला भरती होण्याची वेळ येते तेव्हाच समजतं. आणि त्यानंतर इस्पितळ ह्या वास्तूकडे आपण वेगळ्याच आदराने पाहू लागतो . . .

गप्पा मारणं, बसणं, भेटीला जाणं
     फालतू विनोद सांगून परतून येणं
एखाद्या रात्रीला झोपायला जाणं
     कधी सकाळ होते वाट पाहाणं

आत्तापर्यंत होती माझ्या विचारी
     इतुक्यापुरती इस्पितळाची वारी
मे 16, 2014

मनाने चांगला

तुमच्या बाबतीत असं कधी घडलंय का? आपण एखाद्या (त्या ठिकाणी उपस्थित नसलेल्या) व्यक्तीबद्दल तक्रारीच्या सुरात बोलत असतो. समोरची व्यक्ती आपल्याशी सहमती दाखवत असताना सहज बोलून जाते, 'ते काहीही असलं तरी तो मनाने फार चांगला आहे'. मनाने वाईट असलेली एखादी व्यक्ती तुम्हाला माहित आहे का? विचार केलात तर तुम्ही अगदी कट्टर मानता ते शत्रूही 'मनाने चांगले'च वाटू लागतील . . .
 
. . .
 
आपलं विखुरलेलं एकत्र कुटुंब आठवून मनामध्ये झिजतोय
पश्चात्तापाच्या आगीत होरपळून निघतोय
माझं मत नाही बदलणार जरी त्याला फासावरती टांगला
बाकी कसाही असला, तरी तो मनाने फार आहे चांगला

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/PnUWAFXPWE4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मे 2, 2014

दीर्घायुषी राजा

लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांतच पार पडतील. आता बहुतेक नवा भिडू, नवे राज्य आणि नवीन राजा. हा नवीन किंवा नव्याने येणारा जुना राजा ह्या गोष्टीतून काही बोध घेईल का?

. . .
 
दोन वर्षांपूर्वी शेवटी वदले त्यांना स्वामी
तुमच्या प्रश्नाकडे माझं खचितच आहे लक्ष
माझे विचार काही काळात येतील तुमच्या कामी
वठून जावा लागेल उद्यानातील तो वटवृक्ष

शब्द ऐकुनी त्या मंत्र्याचं डोकंच होतं फिरलं
समजत नव्हतं स्वामीजींच्या मनात काय दडलं
. . .
एप्रिल 18, 2014

उडदामाजी काळे गोरे

जनतेशी निगडीत असा साऱ्या जगातील भव्यतम सोहोळा - भारतीय लोकसभेची निवडणूक! आणि ह्या सोहोळ्याचे उत्सवमूर्ती, निवडणुकीचे उमेदवार . . .  अहाहा, काय वर्णावी त्यांची महती! एकास झाकावे आणि दुसऱ्यास काढावे . . .

ह्याला सोड त्याला जोड ह्याला गिरव त्याला खोड
शत्रू होते क्षणापूर्वी जे आता नाते झाले गोड
भाऊ ठाकला भावासमोर लक्तरं काढी गावासमोर
शत्रू सुद्धा अवाक् होती नातलगांच्या डावासमोर
धर्म काढ जात काढ भाषा काढ प्रांत काढ
मतांकरता काही चालेल आवस वाढ बये आवस वाढ
जेथील बाभळी तेथील बोरे उडदामाजी काळे गोरे