बलाढ्य होता शत्रू त्याची शस्त्रे होती भारी
तीन दिवस तरी तसाच आम्ही लढा ठेविला जारी
वरूनी ये आदेश शत्रूला तीन दिवस तरी रोखा
होतो थोडे तरीही शत्रुला दिला नाही मोका
केली माझ्या तुकडीने अन् पराक्रमाची शर्थ
दिवस तीन होता युद्धाला उरला नव्हता अर्थ || १ ||
हाती लागे ते ते घेऊन आम्ही काढला पळ
गाठण्यास अन् फिरलो मागे सुरक्षित तो तळ
एक जवान सांगतो जेव्हा दिन येतसे सरत
दोस्त राहिला मागे जातो आणावयास परत
मन माझे आले दाटुनिया पाहून तो निस्वार्थ
पण मॄत्यूच्या तोंडी जाण्या उरला नव्हता अर्थ || २ ||
वदलो त्याला धोका किती ती तुजला आहे जाण
मित्राचेही नक्कीच तुझिया गेले असतील प्राण
ऐकण्यास तो तयार नव्हता भरूनी आला गळा
वदत राहिला एकच जाणे भागच आहे मला
जाऊनी अंती दिले बोलणे ऐकत नव्हता सार्थ
भावनांसवे वाद घालण्या उरला नव्हता अर्थ || ३ ||