चराचर
जानेवारी 1, 2011जनरेशन गॅप – एक वरदान
सुनील गावस्करला एकदा एका सहसमालोचकाने भोचकपणे विचारलं की आजकालच्या क्रिकेटपटूंचं क्षेत्ररक्षण पाहून तुम्हाला तुमच्या क्षेत्ररक्षणाची लाज वाटत असेल नाही. मिस्किलपणची वानवा नसलेल्या सुनील गावस्करने त्याला ताबडतोब उत्तर दिलं की भारतातील प्रत्येक नवीन पिढी आधीच्या पिढीवर प्रत्येक क्षेत्रात कुरघोडी करत असते. आमच्या वेळेला आम्हाला सांगितलं जायचं की आमच्या आधीच्या पिढीतले काही खेळाडू फलंदाजांनी चारपेक्षा अधिक धावा काढू नयेत म्हणून सीमारेषेवर अडवलेला चेंडू चक्क लाथेने सीमारेषेच्या पार उडवत असत. त्या मानाने आम्ही भलतेच चुश्तिले फुर्तिले होतो.
ह्या प्रसंगातला विनोदाचा भाग सोडला तरी दोन पिढ्यांमधल्या तफावतीमध्ये सकारात्मक बदलही असू शकतात हे नाकारून चालणार नाही. दोन पिढ्यांमधील तफावत अर्थात जनरेशन गॅप ही संज्ञा नेहमी तक्रारवाचक रितीनेच वापरली जाते. लहानपणी आपल्यातला प्रत्येकजण अर्थातच मोठ्या माणसांकडून अनेक गोष्टी शिकत असतो. त्यामुळे कधी कधी मोठ्या माणसांमध्ये अहंगंडाची भावना घर करू लागते. पण मग हीच लहान मुलं जेव्हा मोठी होतात आणि प्रत्येक बाबतीत आधीच्या पिढीशी स्पर्धा करू लागतात तेव्हा त्यांना आपल्या बरोबरीचं मानण्याचा मनाचा मोठेपणा आधीच्या पिढीतले लोक दाखवू शकत नाहीत. हा कालचा पोर मला काय शिकवणार ही भावना प्रत्येक पिढीत सर्वसामान्यपणे आढळून येते. ह्याला अपवाद नसतो. आपल्या मुलाला चित्रपट संगीत ऐकतो म्हणून ओरडणारी व्यक्ती भजन-किर्तनाऐवजी भावगीतं ऐकली म्हणून आपल्या वडिलांकडून खाल्लेली बोलणी सोयीस्कर रीतीने विसरलेली असते. आजच्या उदयाला येणा-या नवीन पिढीकडे (अर्थात आज शालेय जीवन व्यतीत करणार्या उद्याच्या पिढीकडे) जर आपण वेगळ्या दॄष्टीकोनातून पाहू शकलो तर सुनील गावस्करचं विधान आपल्याला पटू लागेल.
आज पालक बनलेल्या आपल्या पिढीतल्या किती व्यक्ती कला किंवा क्रीडा क्षेत्रातल्या एका तरी शाखेत निपुणतेचा दावा करू शकतील? निपुणता सोडा, साधा छंद म्हणूनही एखादी कला किंवा क्रीडा जोपासणार्या व्यक्ती आपल्या पिढीत अभावानेच आढळतील. हा प्रश्न कोणाला हिणवण्याकरता विचारलेला नाही. आपल्या वेळी परिस्थितीच बहुतेक अशा गोष्टींकरता पोषक नव्हती. स्वातंत्य्रोत्तर काळात जी काही प्रचंड प्रमाणावर सामाजिक आणि आर्थिक ढवळाढवळ झाली त्याची एक निष्पत्ती होती स्थैर्याकरता मध्यमवर्गीयांची शहराकडे लागलेली रीघ. आपल्या आधीची पिढी आपली बालपणाची पाळंमुळं तोडून शहरात येऊन स्थायिक झाली. नवीन समाजरचनेत स्थैर्य शोधण्यात त्यांनी आपली आयुष्यं वेचली. भारताच्या त्या काळातल्या बंदिस्त अर्थव्यवस्थेकडून सुशिक्षित व्यक्तींकरता प्रचंड मागणी होत होती. परंपरागत उद्योगधंदे सोडून आलेल्या ह्या पिढीकरता स्थैर्याकरता एकमेव साधन उपलब्ध होतं ते म्हणजे शिक्षण. त्यामुळे सहाजिकच शिक्षणाचा असा काही बागुलबुवा उभा केला गेला की मग त्यापुढे बाकी सारं काही दुय्यम होतं. (एक विनोद: आनंदी आणि स्वानंदी दोघी मैत्रिणी होत्या. एकदा त्यांच्या गावात पुराचं पाणी शिरलं. आनंदीने मागेपुढे न बघता नदीत उडी मारली आणि ती पोहत पैलतीरावर सुखरूप पोहोचली. स्वानंदी मात्र आधी गावातल्या शाळेच्या दिशेने धावली. तिने झाडाच्या फांद्यांचा एक तराफा बांधला आणि त्यावर शाळेत अडकलेल्या लहान लहान मुलांना घेऊन मगच ती पैलतीराला आली. तरीही गावातले सर्वजण म्हणाले की आनंदीच जास्त हुशार आहे. का? … कारण आनंदीला दहावीला स्वानंदीपेक्षा जास्त गुण मिळाले होते² आजही सुनील श्रेष्ठ का सचिन श्रेष्ठ ह्या आपल्या लाडक्या वादावर सुनील एम् ए पर्यंत शिकला म्हणून तोच श्रेष्ठ असा शेरा आपल्या आधीच्या पिढीकडून ऐकू येतो तो काही उगीच नाही.) ‘आम्हाला कोणी प्रोत्साहनच दिलं नाही’ अशी तक्रार करण्याचं आपल्या पिढीला काहीही कारण नाही. त्यावेळी परिस्थितीच तशी होती आणि कदाचित त्या पिढीच्या शिक्षणाच्या बाबतीत असलेल्या हेक्यामुळेच आज आपली पिढी आर्थिक सुबत्ता पाहत आहे.
आज मात्र परिस्थिती बदललेली आहे. आजच्या नवीन पिढीकडे जर तुम्ही पाहिलंत तर हा बदल प्रकर्षाने जाणवेल. हल्ली शाळेत जाणारं प्रत्येक मुल कोणत्या न कोणत्या कलेची किंवा क्रीडेची जोपासना करताना दिसेल. गायन, वादन, अभिनय, चित्रकला, टेनिस, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स … यादी लांबलचक होऊ शकते. आपल्या पिढीला मिळालेल्या वारसा म्हणून मिळालेल्या स्थैर्याचा आणि शिक्षणक्षेत्रात आलेल्या संपॄक्ततेचा (सॅच्युरेशन) हा चांगला परिणाम आहे ह्यात वाद नाही. आणि ही तर फक्त सुरूवात आहे. आपल्या पिढीने ह्या नवीन संधींचा जर डोळसपणे विचार केला तर शक्यतेची अनेक नवीन दालनं खुली होतील.
भारताला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदकं मिळत नाहीत किंवा गेल्या एक्याऐशी वर्षांत भारताला चारहून जास्त ऑस्कर पारितोषिकं मिळवता आली नाहीत अशी ओरड सतत सुरू असते. आणि ह्या सगळ्याचं खापर अपरिहार्यपणे सरकारच्या डोक्यावर फोडलं जातं. पण भारतात लोकशाही आहे आणि लोकशाहीचे जसे तोटे आहेत तसेच फायदेही आहेत (बहुतेक वेळा हे विधान विरूद्ध अर्थी वापरलं जातं). पदकं मिळवणार्या देशांच्या यादीवरून जर एक नजर फिरवली तर ढोबळ तीन प्रकारांत त्यांची वर्गवारी करता येर्इल. पहिला वर्ग म्हणजे आर्थिक सुबत्ता आणि स्थैर्य असणारे देश, ज्यात अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया वगैरे देश येतात. दुसरा वर्ग म्हणजे जे देश पदकं मिळवणं हा आपल्या इभ्रतीचा प्रश्न बनवतात आणि खेळाडूंना अक्षरश: वेठीला धरतात, जसे चीन, उत्तर कोरिया, पूर्वाश्रमीचा रशियन महासंघ वगैरे. तिसरा वर्ग म्हणजे ज्या देशांतले खेळाडू अत्यंतिक हलाखीतून सुटका होण्याकरता खेळाची निवड करतात, जसे इथिओपिआ, झिम्बाब्वे, केनिया वगैरे आफ्रिकन देश. आपण भारतातील नागरिक नशीबवान आहोत की ह्या तिन्हीपैकी पहिल्या वर्गाच्या दिशेने आपण जात आहोत. विशेषत: शहरी मध्यमवर्ग ज्या प्रकारची सुबत्ता उपभोगत आहे त्यामुळे कला आणि क्रीडेच्या क्षेत्रात पुढे येण्याकरता नवीन पिढीची मानसिक जडणघडण बनवण्याची महत्त्वाची जबाबदारी ह्या वर्गावर आहे. आणि लोकशाहीला कितीही नावं ठेवली तरी एवढ्या मोठ्या जनमताकडे दुर्लक्ष करणं कोणत्याही राज्यकत्र्यांना परवडणार नाही. कबूल आहे की सरकारकडे प्राधान्य देण्याकरता इतर बर्याच गोष्टी आहेत, हेही शक्य आहे की आपल्याला अपेक्षित सुविधा सरकारकडून लगोलग उपलब्ध होणार नाहीत, पण हेही तितकंच शक्य आहे की आज ना उद्या सरकार दरबारीही ह्या गोष्टींना महत्त्व द्यावंच लागेल. लोकशाहीत ‘देर’ असेल पण ‘अंधेर’ नसतो.
हल्ली बरेच पालक तक्रार करताना आढळतात की आमची मुलं टीवी किंवा संगणकासमोरून हलतंच नाहीत. अशी तक्रार करण्यापूर्वी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. आज शाळांमधूनही कला आणि क्रीडा क्षेत्राकरता वेगवेगळ्या सोयी-सवलती उपलब्ध आहेत. आपल्या मुलांचा फावला वेळ आणि बालसुलभ उत्साह ह्मांना जर योग्य ती दिशा दिली तर अशा तक्रारीला वावच रहाणार नाही. ही एक प्रकारची सामाजिक क्रांती आहे जिची सुरूवात आधीच झालेली आहे. आणि ह्या क्रांतीच्या पुराव्यांकरता फार लांब पहायची गरज नाही. तुमच्या शेजारच्या घरातून एखाद्या बालकंठातून भूप रागाचे अलंकार आळवलेले ऐकू येतील, किंवा तुमच्याच इमारतीतील एखादी चिमुरडी तिच्या वजनाएवढी ब^ग खांद्याला अडकवून रिदमिक जिमनास्टिक्सकरता जाताना दिसेल. ह्या गोष्टी काही आता अपवादात्मक राहिलेल्या नाहीत.
काही दिवसांपूर्वी एका जुन्या आणि प्रथितयश वर्तमानपत्राने १८९३ साली एका वाचकाने त्यांना लिहिलेलं पत्र छापलं होतं. त्यातही त्या वाचकाने अतिशय उद्विग्नपणे ‘आजची पिढी कुठे चालली आहे’, ‘आजच्या पिढीची गंभीरपणे विचार करण्याची कुवतच नाहीशी झाली आहे’, ‘आजची पिढी थिल्लरपणा करण्यातच धन्यता मानते’, ‘आमच्यावेळी असलं काही सहन केलं जायचं नाही’ वगैरे लिहिलं होतं. तारीख बदलली असती तर ते पत्र कोणत्याही वर्षी लिहिलेलं असू शकलं असतं.
तात्पर्य: ‘आमच्या वेळेला असले फाजील लाड चालवून घेतले जात नव्हते’ वगैरे विधांनांच्या पलीकडे पहायची वेळ आली आहे. आपल्या आधीच्या पिढीने आपल्याला दिलेल्या भक्कम पायाचा उपयोग करून पुढच्या पिढीच्या गरूडभरारीकरता पोषक वातावरण निर्माण करायची गरज आहे. आणि हे होणारच आहे – तुमच्या साथीने किंवा तुमच्या शिवायही’ जर जास्तीत जास्त लोक अशा प्रकारे विचार करायला लागले तर अभिनव बिंद्रा आणि ए आर रेहमान अपवादाने नियम सिद्ध करणारे रहाणार नाहीत एवढं नक्की.