मुंबईचा ट्रॅफिक
डिसेंबर 21, 2012इस्पितळाची वारी
जून 6, 2014फिरदौस काश्मीर
काश्मीर अजून पाहिलेलं नसताना तुम्ही परदेशवारीचा बेत आखत आहात काय? तसं असेल तर पुन्हा एकदा विचार करा. परदेशात सृष्टीसौंदर्य असेलच … पण आपल्या काश्मीरातील सृष्टीची श्रीमंती त्यांपेक्षा काकणभर सरसच ठरेल असा माझा दावा आहे.ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/Tu4ozzEjWpM ह्या ठिकाणी ऐकता येईल.
गर फिरदौस बर रू-ए-जमीं अस्त
हमीं अस्तो हमीं अस्तो हमीं अस्त || धृ ||
पृथ्वीतलावर जर स्वर्ग कुठे आहे
तो इथेच आहे इथेच आहे इथेच आहे
काश्मीरचे प्रथमरूप पाहता
बादशहा जहांगीर शब्द बोलला हे
अचल इतुके पर्वत सारे
ऋषिवर जणू असती व्रतस्थ
गर फिरदौस बर रू-ए-जमीं अस्त
हमीं अस्तो हमीं अस्तो हमीं अस्त || १ ||
पोहोचे दूर जेथवर दृष्टी
दिसे नववधूसम नटलेली सृष्टी
कधी रविकिरण हसवती खुदकन तिला
कधी लाजेच्या पडद्यात लपविते वृष्टी
जिथे पर्वतातून उदय पावतो रवी
अन् पर्वतातच पावतो अस्त
गर फिरदौस बर रू-ए-जमीं अस्त
हमीं अस्तो हमीं अस्तो हमीं अस्त || २ ||
नितळ आभाळी उडे पाखरांचा थवा
शुभ्र हिमास देर्इ छेद रंग हिरवा
सुमनरूपी इंद्रधनू भूवरी अवतरले
पानापानांतून रंग खुले नवा
नवयुवती फुलल्या जणू सार्या
अन् भ्रमर घालती भवती गस्त
गर फिरदौस बर रू-ए-जमीं अस्त
हमीं अस्तो हमीं अस्तो हमीं अस्त || ३ ||
जलसदनात मिळावा थारा
वाहतुकीला असावा एक शिकारा
काही न करता बसावे शांतचित्ते
झेलत पर्वताचा मंद वारा
होण्यास जागे स्वप्नातून रम्य ह्या
लागे करावी यत्नांची शिकस्त
गर फिरदौस बर रू-ए-जमीं अस्त
हमीं अस्तो हमीं अस्तो हमीं अस्त || ४ ||
ही देखील आहे भारतभूची माती
विचार मनी येता फुलली छाती
दुरावलेला नातलग जणू भेटे
अन् जुळती मनामनांची नाती
डौलदार पाहुनी देशाचा माथा
मन माझे झाले मग आश्वस्त
गर फिरदौस बर रू-ए-जमीं अस्त
हमीं अस्तो हमीं अस्तो हमीं अस्त || ५ ||
करण्याला सतत परदेशवारी
बहु उत्सुक असती नरनारी
काश्मीरास जाऊन पाहावे येथे
सृष्टीची सुंदरता एकवटली सारी
आधी पाहावे येथले सौंदर्य
मग खुशाल व्हावे परदेशी मार्गस्थ
गर फिरदौस बर रू-ए-जमीं अस्त
हमीं अस्तो हमीं अस्तो हमीं अस्त || ६ ||
कधी राजकारणास्तवे भरडला
कधी दहशतवादाखाली चिरडला
तरी आपुली ओळख असे टिकवूनी
हात पसरूनी कधी न रडला
आपुलीसुद्धा जबाबदारी
स्वर्ग न व्हावा कधीही उद्ध्वस्त
गर फिरदौस बर रू-ए-जमीं अस्त
हमीं अस्तो हमीं अस्तो हमीं अस्त || ७ ||
गर फिरदौस बर रू-ए-जमीं अस्त
हमीं अस्तो हमीं अस्तो हमीं अस्त || धृ ||
2 Comments
खूप सुंदर कविता
धन्यवाद विवेक.