निसर्ग
एप्रिल 15, 2011शहर
डिसेंबर 2, 2011फाळणी
लवकरच आपण स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहाने साजरा करू. आपली पिढी स्वातंत्र्य गृहीत धरते आणि त्यात काही वावगं नाही, पण त्याच वेळी हे स्वातंत्र्य मिळवताना आपल्याला काय किंमत मोजावी लागली हे विसरून चालणार नाही. फाळणीच्या होमात होरपळलेल्या शहिदांना ही श्रद्धांजली!
वाहत राही त्याला नाही औषध नाही मलम
अशी फाळणीची अंगावर भरतच नाही जखम || धॄ ||
इंग्रज सत्तेच्या पापाचा भरून वाहिला घडा
पेरावे जे तसे उगवते त्यांस मिळाला धडा
नामुष्कीने माघाराला जाणे हाच उपाय
पण जातानाही घालून गेले मम रक्ताचा सडा
यजमानाचे दुभंगले घर त्यांना नाही शरम
अशी फाळणीची अंगावर भरतच नाही जखम || १ ||
इंग्रज होते परके त्यांना नव्हती काही जाण
पण अपत्यांनीही माझ्या कैसे सोडून दिधले भान
आपुलेसे मी केले होते जवळी जे जे आले
तरी म्हणाले कुणी मी हिंदू कुणी मी मुसलमान
नांदत होते एकोप्याने कुणीही नाही अधम
अशी फाळणीची अंगावर भरतच नाही जखम || २ ||
रोगावर दुफळीच्या म्हणती होता तोच उपाय
उपायापुढे रोग परवडे असला कसला न्याय
शतकामागून शतके टिकली विश्वासाची घडी
विस्कटूनी त्या घडीस नक्की साधले कुणी काय
आयुष्यांचा खेळ मांडला ज्याला नाही नियम
अशी फाळणीची अंगावर भरतच नाही जखम || ३ ||
दीड कोटी जन होऊनी गेले घरामधे बेघर
पाच लक्ष चढले मॄत्यूच्या अघोर वेदीवर
सौहार्दाच्या अमॄतावरी हलाहल कसे पडले
कोण शत्रू अन् कोण मित्र अन् कसला हा संगर
वस्त्र विविधरंगी विणलेले उरले नाही तलम
अशी फाळणीची अंगावर भरतच नाही जखम || ४ ||
आजही कटुता दिसते घेता एकदुजाचे नाव
आजही धगधग शमली नाही असा जिव्हारी घाव
अशी जाहली ताटातूट की आप्तमित्र विस्मरले
पण आजही डोळे भरती आठवून बालपणीचा गाव
शस्त्र ठेवण्या खाली तयार कुणीच नाही प्रथम
अशी फाळणीची अंगावर भरतच नाही जखम || ५ ||
उशीर नाही झाला अजुनी थांबविण्या हे रण
काढून टाका मनातूनी पण शत्रुत्वाचे तण
भूतकाळ बाजूस सारूनी नजर भविष्यावरी
भरून येर्इल जखम खचित ती उरेल केवळ व्रण
चिघळत राहील ऐशी जोवर जात नाही अहम
अशी फाळणीची अंगावर भरतच नाही जखम || ६ ||
वाहत राही त्याला नाही औषध नाही मलम
अशी फाळणीची अंगावर भरतच नाही जखम || धॄ ||