इस्पितळाची वारी
जून 6, 2014अशीच एक इमारत
सप्टेंबर 2, 2016घर
काही लोकांच्या घरची टापटीप बघितली की मला कमीपणा वाटत असे. सगळं कसं आखीव रेखीव . . . प्रत्येक वस्तू जागच्या जागी . . . स्वच्छता तर इतकी की जमीन पाहून भांग पाडावा . . . पण अशा घरांमध्ये मला अवघडून गेल्यासारखं का वाटतं? आपल्या हातून कोचावर चहा सांडेल, काचेची फुलदाणी फुटेल, चमचा हातातून पडेल अशी भीती सारखी का वाटत राहते? मग मी माझं घर नीट निरखून पाहिलं . . . आणि हळूहळू मला ह्या प्रश्नांची उत्तरं मिळू लागली . . .
कोपर्यात एक जळमट
खुर्चीवर डाग कळकट
भिंत थोडीशी तेलकट
पण इथल्या प्रत्येक वस्तूवर मायेचा थर आहे
ही शोरूम नाही घर आहे || १ ||
एखादा मोजा हरवला
एखादा कप तडकला
एखादा स्क्रू निखळला
पण इथे प्रत्येक पाहुण्याच्या सोयीवर नजर आहे
हे ऑफिस नाही घर आहे || २ ||
थोडे कपडे अस्ताव्यस्त
पलंगावर चादरी स्वस्त
पुस्तकं इतस्तत: मस्त
पण इथे हवी ती वस्तू हव्या त्या जागेवर आहे
हे हॉटेल नाही घर आहे || ३ ||
कुणी कधी कान खाजवतं
कुणी कधी जोरात शिंकतं
कुणी रोज रात्रभर घोरतं
पण इथे सार्यांना एकमेकांबद्दल आदर आहे
हे थेटर नाही घर आहे || ४ ||
कधी आमटीत जास्त मीठ
भाजी शिजली नाही नीट
भाताचं कच्चं शीत
पण इथे पदार्थांना मायेची झालर आहे
हे रेस्टॉरंट नाही घर आहे || ५ ||
फ्रेंड्स बनत नाहीत
लाइक्स मिळत नाहीत
कॉमेंट्स दिसत नाहीत
पण इथे आपल्या माणसांचा वावर आहे
हे फेसबुक नाही घर आहे || ६ ||
घरी येण्याचे नियम
नीट खाण्याचे नियम
वेळेत झोपण्याचे नियम
पण इथे नियमांच्या आड प्रेमाची पाखर आहे
हे हॉस्टेल नाही घर आहे || ७ ||
ऊब आहे आच नाही
नियम आहेत जाच नाही
कारणं आहेत उगाच नाही
एवढीशी घागर त्यात जीवनाचा सागर आहे
हेच माझं जग माझं घर आहे || ८ ||