संशयी ससा
एप्रिल 17, 2015गुलज़ारजी
ऑगस्ट 19, 2016राग
आपल्या आयुष्यात आपला एखादा मित्र, मैत्रीण किंवा आप्त आपल्यावर रागावतो, रुसतो. अनेकदा ही गोष्ट आपल्या बरीच उशिरा लक्षात येते. आपण समजूत काढण्याचा, मन वळवण्याचा प्रयत्न करतो पण ती व्यक्ती बधत नाही. त्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यात असणं किती महत्वाचं आहे हा विचार एकतर्फी तर नाही ना अशी शंका आपल्या मनात येऊ लागते. मन उदास होऊ लागतं . . .ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/ZEpH1FsUp0o ह्या ठिकाणी ऐकता येईल.
माझी काही चूक असेल तर ती सुधारायची संधी तरी होती का?
इतकी कशी रागावलीस
आपल्यात इतकी मैत्री तरी होती का? || धृ ||
काहीतरी खुपत होतं विचार केला दिवस दोन
खरंच खूप दिवसांत तुझा आला नाही साधा फोन
शेवटी कधी बोललो ते आता नक्की आठवत नाही
पण आता वाटतंय तेव्हा आपल्यांत जरूर बिनसलं होतं काही
तेव्हापासूनच बहुदा आपलं बोलणं बंद झालंय
उशिराने असेल पण आता माझ्या लक्षात आलंय
त्या दिवशीच्या माझ्या बोलण्याला इतकी धार तरी होती का?
इतकी कशी रागावलीस
आपल्यात इतकी मैत्री तरी होती का? || १ ||
रोज बोलू असे काही आपल्याकडे फारसे नव्हते विषय
तरी अधूनमधून तुझ्याशी बोलण्याची मला लागली होती सवय
तुझं ऑफिस माझं ऑफिस तुझं घर माझं घर
कधी एखादं पुस्तक एखादा सिनेमा एवढंच बोलायचो फार तर
माझं बोलणं एवढं महत्वाचं वाटत होतं तुला
ह्याचीच मुळात थोडीही जाणीव नव्हती मला
माझ्या बोलण्याला एवढी किंमत तरी होती का?
इतकी कशी रागावलीस
आपल्यात इतकी मैत्री तरी होती का? || २ ||
मैत्रीत एकमेकांवर रागवायचं ह्यात काही वावगं नसतं
खरं तर मैत्रीत हक्काने एकमेकांवर रागवायचं असतं
एवढी तरी मैत्री वाढू द्यायचीस की हा हक्क मिळेल
मी माझं अंतर राखून होतो की तुला काय वाटेल
तुला दुखावण्यामागे माझा काय असू शकतो स्वार्थ
त्यामुळे तुझ्या रागावण्याचा मला समजतच नाहीये अर्थ
अबोल्याचं टोक गाठण्याची गरज तरी होती का?
इतकी कशी रागावलीस
आपल्यात इतकी मैत्री तरी होती का? || ३ ||
मी बोलण्याचा प्रयत्न केला तरी मला देत नाहीस प्रतिसाद
जणू काही घोर घडला माझ्या हातून एखादा प्रमाद
तुझ्या आयुष्यात माझी माझ्या आयुष्यात तुझी फारशी नव्हती दखल
तरी ह्या अबोल्याने मनाच्या कोपर्यात कुठे तरी राहिला आहे सल
तुलाही असंच वाटतंय, की हे आहेत माझ्याच मनाचे खेळ?
तुझ्याकडे कदाचित माझा विचार करायलाही नसेल वेळ
असं असेल तर बोलून दाखवायला काही आडकाठी तरी होती का?
इतकी कशी रागावलीस
आपल्यात इतकी मैत्री तरी होती का? || ४ ||
माझी काही चूक असेल तर ती सुधारायची संधी तरी होती का?
इतकी कशी रागावलीस
आपल्यात इतकी मैत्री तरी होती का? || धृ ||