शून्य
फेब्रुवारी 4, 2011योगायोग
मार्च 3, 2013थोडा धीर धर
आपल्या देशाचा बट्ट्याबोळ करायला ब्रिटिशांना दोन शतकं लागली. मग त्या मानाने स्वातंत्र्य मिळून झालेली चौसष्ठ वर्षं कमीच नाहीत का? म्हणूनच आपला देश प्रगत देशांच्या पंगतीत बसवण्याकरता अधीर झालेल्या काही मंडळींना सांगावसं वाटतं की बाबा रे, धीर धर, ‘थोडा धीर धर’!
जन्मदिन असे ब्रह्मांडाचा एक जानेवारी
आणि पुढील घडामोड समजा वर्षात झाली सारी
पहिले आठ महिने सूर्यच अस्तित्वात नव्हता
ऑगस्ट वीस दिवशी आली सूर्याची मग स्वारी || १ ||
एकतीस ऑगस्ट सकाळचे अन् वाजले पावणेअकरा
जन्म पृथ्वीचा झाला सूर्याभोवती मारत चकरा
सोळा सप्टेंबर खदखदू लागली रसायने
जीवनाच्या धुगधुगीला उशीरच झाला खरा || २ ||
झाडं तयार झाली तारीख पाच डिसेंबर
प्राणी तयार झाले तारीख आठ डिसेंबर
सारे होते जगत समुद्राच्या पाण्याखाली
सतरा डिसेंबर उजाडला येण्या जमिनीवर || ३ ||
बावीस डिसेंबर सरपटणारे प्राणी आले
तेवीस तारखेपर्यंत सस्तन प्राणी तयार झाले
पंचवीस तारखेस सुरू झालं डायनॉसॉर्सचं राज्य
तीस तारीख आली डायनॉसॉर्स लयास गेले || ४ ||
एकतीस डिसेंबरचे रात्री वाजून गेले दहा
पृथ्वीवरती मनुष्याचा पत्ता नाही पाहा
पावणेअकरा वाजता आले मनुष्यांचे पूर्वज
अकरा बावन्न वाजले शेवटी आपण आलो अहा || ५ ||
वर्ष संपण्याकरता फक्त पंचवीस सेकंद उरता
तेव्हा कुठे माणूस पृथ्वीवरती वसला पुरता
ऋग्वेद लिहून झाले आहेत नऊ सेकंद केवळ
केवळ एक सेकंद चालली ब्रिटिशांची निष्ठुरता || ६ ||
स्वतंत्र होऊन भारताला पापणी केवळ लवली
पारतंत्य्राच्या जखमेवर धरली नाही खपली
विचार कर व्यापक वाटतील क्षुल्लक साठ वर्षं
निर्धाराची वॄत्ती तुझी एवढ्यात कुठे लपली || ७ ||
ब्रह्मांडाच्या सेकंदांचा पुढे विचार कर
लाग आता कामाला तू कसून तुझी कंबर
येर्इल आपल्या देशामध्ये निश्चित सुवर्णकाळ
थोडा धीर धर राजा थोडा धीर धर || ८ ||