काळजी घे
एप्रिल 4, 2016नाव
मार्च 31, 2018जीवन एक अपघात
मानवाला आपल्या प्रगतीचा फार अभिमान आहे. आपल्या बुद्धीच्या जोरावर तो साऱ्या जीवसृष्टीचा अनभिषिक्त सम्राट बनला आहे. मात्र ज्या जीवसृष्टीवर मानव आपली सत्ता गाजवत आहे तिचं अस्तित्व हा ब्रह्माण्डातील केवळ एक अपघात आहे. सुईच्या अग्रावर तोलल्याप्रमाणे उभा असलेला हा डोलारा एका साध्या करणानेही कोसळू शकतो हे विसरून चालणार नाही . . .
पक्षी प्राणी वॄक्ष कीटक अन् समुद्रातही ते वसते
सूक्ष्म जीवाणूंच्या रूपाने चराचरातच ते असते
वावडे तया अति ऊष्ण अन् अति गारव्याचे नसते
पॄथ्वीवरच्या अशक्य जागांवरतीसुद्धा ते दिसते
वाटे सार्या आव्हानांवर केली त्याने मात
जीवन आहे ब्रम्हांडाच्या खेळातील अपघात || १ ||
पॄथ्वी जर का अजून थोडी सूर्याच्या जवळी असती
जीवन उपजू शकले नसते तप्त किती झाली असती
आणि जर ती सूर्यापासून दूर जरा गेली असती
मंगळ ग्रहाप्रमाणे नक्की गोठून मग गेली असती
सूर्यच असता लहान मोठा झाला असता घात
जीवन आहे ब्रम्हांडाच्या खेळातील अपघात || २ ||
पॄथ्वी ग्रहाच्या गाभ्यामध्ये अतिऊष्ण लाव्ह्माचा रस
सोडत आला सर्व वायू ते बनले वातावरण सरस
फक्त पॄथ्वीचा उपग्रह तो आकारातही असे सकस
पॄथ्वी अन्यथा फिरली नसती झाली असती पूर्ण निरस
फिरली नसती पॄथ्वी नसता दिन अन् नसती रात
जीवन आहे ब्रम्हांडाच्या खेळातील अपघात || ३ ||
सजीवसुद्धा अचेत वस्तूंपरी अणूरेणूंचे जाळे
कुणी फुंकिली त्यात चेतना कोणालाही ते न कळे
फक्त एकदा चारशे अब्ज वर्षांपूर्वी हे घडले
तेव्हापासून होते प्रजनन नवीन जीवन कधी न मिळे
काय असावे घडले तेव्हा हीच मजेची बात
जीवन आहे ब्रम्हांडाच्या खेळातील अपघात || ४ ||
हद्द पॄथ्वीची ओलांडुनिया कक्षा तुम्ही विस्तारा
कळेल केवळ नशीब चांगले जीवन येण्या आकारा
ठाऊक जे ब्रम्हांड जेवढे नाही कुणीही शेजारा
ठिपक्याइतुकी पॄथ्वी आपुली त्यात पसारा हा सारा
अनंत सार्या विस्तारातील अंशच केवळ ज्ञात
जीवन आहे ब्रम्हांडाच्या खेळातील अपघात || ५ ||
कधी उपजले कसे उपजले हाच प्रश्न सुटला नसला
तर कारण त्याच्या अस्तित्त्वाचे कयास बांधावा कसला
ह्मापुढे कधी डास एक जर हातावर तुमच्या बसला
जीवन आहे अमूल्य आता मारू नका तो जरी डसला
नष्ट व्हावया सारे जीवन पुरे एक अपघात
जीवन आहे ब्रम्हांडाच्या खेळातील अपघात || ६ ||