रोप
मे 30, 2021जेवण
ऑगस्ट 1, 2021लाट
आपल्या मनात एक शांत डोह असतो. रोजच्या धावपळीत आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीवही नसते. मात्र कधीतरी… एखाद्या कातर संध्याकाळी… जेव्हा आपल्याला मोकळा वेळ असतो तेव्हा आपण त्या डोहाच्या किनाऱ्यावर जाऊन उभे राहतो. कसे कुणास ठाऊक अचानक त्या डोहात तरंग उठू लागतात. किनाऱ्यावर उभं असलेल्या आपल्यापर्यंत त्या लाटा पोहोचतात. आठवणींच्या लाटा! सुरुवातीला अगदी हळूवार… आणि मग…ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/ekAFpxpSmHE ह्या ठिकाणी ऐकता येईल.
शांत एका संध्याकाळी आठवणींची लाट उठली
आणि मनाच्या किनाऱ्यावर अलगद येऊन फुटली ||
वाऱ्याची एक झुळूक आली अंगावर आला काटा
डोळ्यांसमोर दिसू लागल्या मागे पडलेल्या वाटा ||
नक्की समजत नव्हतं पण वाटू लागलं उदास
जणू कसलीशी पूर्वसूचना मिळत होती मनास ||
बघता बघता काळे ढग मन भरून आलं दाट
मग आठवणींची धडकू लागली लाटेमागून लाट ||
सोसाट्याचा वारा सोबत वीज उडे थरकाप
किनाऱ्याच्या उंबरठ्यावर सांडून गेलं वाळूचं माप ||
असा पसरला अंधार साऱ्या दिशा गेल्या हरवून
जागा प्रसंग चेहेरे कुणी गेलं सभोवती गिरवून ||
भीषण वादळच ते इतक्यात नव्हतं शमणार
माझ्या नकळत सुरु झाली अश्रूंची संततधार ||
भेलकांडत होतो स्थिर राहणं जात होतं कठीण
चाचपडत होतो पायाखाली वर्तमानाची जमीन ||
असा किती वेळ गेला ह्याचं राहिलं नाही भान
माझं अस्तित्वच झालं होतं वावटळीतील एक पान ||
मग एकदम आकाश निवळलं धुळीचे बसू लागले कण
वादळ शमलं पण मागे राहिले किनाऱ्यावर जखमांचे व्रण ||
बेचैन झालेलं माझं मन अजूनही मधूनच शहारतंय
स्तब्ध आसमंताला बिचकून पुनः पुन्हा विचारतंय ||
शांत जलाशयात पुन्हा कधी आठवणीची लाट उठेल
आणि मनाच्या किनाऱ्यावर अलगद येऊन फुटेल ||