तुळस
जून 5, 2023डीपी
सप्टेंबर 15, 2023मुहूर्त
शुभकार्याकरता पंचांग पाहून मुहूर्त शोधणं जमलं नाही तर निदान साडेतीन मुहूर्तांपैकी एखादा मुहूर्त साधणं ही अगदी पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. हल्लीच्या काळातही व्यायाम, ऑफिसमधून घरी लवकर येणं, जिभेवर ताबा ठेवणं ह्याकरता नवीन वर्षाच्या मुहूर्ताची वाट पाहणारे काही अपवादात्मक नाहीत. ह्या कवितेकरताही मी एका चांगल्या मुहूर्ताच्या शोधात होतो. पण मग म्हटलं ..
मुहूर्त शोधत असशील चांगलं करण्याकरता काही
तर आजच्यासारखा दिवस शोधून सापडणार नाही ॥
जिभेवर नाही ताबा रोज वाढत चाललंय वजन
सोप्पं आहे म्हणत म्हणत सुटत नाही व्यसन
फेक सिगरेट उठ लवकर चालण्याकरता पायी
आजच्यासारखा दिवस शोधून सापडणार नाही ॥
गायन वादन चित्रकलेने मिळे किती आनंद
आयुष्यात एक चांगला जोपासायचाय छंद
काढ गिटार, कॅन्वास, ब्रश मागे सारून बाही
आजच्यासारखा दिवस शोधून सापडणार नाही ॥
मैत्रिणीला फोन करायचा राहून गेला पाहा
मित्राशी त्या भांडून बघ वर्षं झाली सहा
फोन सोड भेटूनच ये कर आता घाई
आजच्यासारखा दिवस शोधून सापडणार नाही ॥
भेटीन सावकाश एवढं काय बुडतंय त्याने जग
ज्यांना नसतात त्यांना एकदा विचारून तर बघ
तुला भेटण्या आतुर तुझे बाबा आणि आई
आजच्यासारखा दिवस शोधून सापडणार नाही ॥
ऑफिसमध्ये उशीर व्हायला कारण काही नसतं
पत्नी मुलांना घेऊन जरा फिरायला जा मस्त
कुटुंबीयांच्यासोबत एकदा काढण्या वेळ असाही
आजच्यासारखा दिवस शोधून सापडणार नाही ॥
करायचंय ते कर जोवर आहेस धट्टाकट्टा
कुणीच घेऊन येत नाही अमरत्वाचा पट्टा
न्याहाळण्याला नजर वर करून दिशा दाही
आजच्यासारखा दिवस शोधून सापडणार नाही ॥
मुहूर्त शोधत असशील चांगलं करण्याकरता काही
तर आजच्यासारखा दिवस शोधून सापडणार नाही ॥