जीवन एक अपघात
नोव्हेंबर 18, 2016बाप्पांचे पर्यावरण
सप्टेंबर 12, 2018नाव
काही जणांना ‘मीच माझ्या आयुष्याचा शिल्पकार आहे’ असा आत्मविश्वास असतो तर काही जण ‘देवाला काळजी’ अशी सपशेल शरणागती पत्करतात. विचार करण्याची कुवत असलेला एकमेव जीव, मानव, पूर्वापारपासून आपल्या आयुष्याचा अर्थ लावण्याकरता कधी अध्यात्माची तर कधी विज्ञानाची कास धरत आला आहे. पण खरं सांगायचं तर ….ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/JhauMnqzsP0 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
नाही सुकाणू नाही शीड ना वल्ह्यांचाही ठाव
आयुष्य जैसे नावाड्यावाचून असावी नाव || धृ ||
ऐलतीराचा पत्ता नाही पैलतीर ना ठावे
कशास आलो कुठे चाललो कुणी कुणा सांगावे
प्रवाह जैसा जैसा वारा तैसीच घेई धाव
आयुष्य जैसे नावाड्यावाचून असावी नाव || १ ||
कधी जाई वर आनंदाच्या लाटेवर आरूढ
खोल खोल कधी जाई पडता दुःखाचे गारुड
कुणास न कळे कोण खेळतो सापशिडीचा डाव
आयुष्य जैसे नावाड्यावाचून असावी नाव || २ ||
भव्य सागरी असंख्य नौका तरंगती भोवती
कुणी जातसे दूर सोडूनी कुणी बने सोबती
किती दिसांचे नाते त्यांचे नसे समजण्या वाव
आयुष्य जैसे नावाड्यावाचून असावी नाव || ३ ||
कुणी जमवितो पैसा अडका मेहनत अति करून
कुणी खर्चीतो पैसा अडका दिसण्यासाठी तरुण
विस्मरती धन सौंदर्याला पैलतीरी ना भाव
आयुष्य जैसे नावाड्यावाचून असावी नाव || ४ ||
कुणी म्हणे की देशाकरता चाले माझी होडी
कुणी म्हणे की धर्मासाठी प्रवासात ह्या गोडी
देश धर्मही शाश्वत नाही कितीही आणला आव
आयुष्य जैसे नावाड्यावाचून असावी नाव || ५ ||
कशीही असू दे नावेवरती ऐसी जडली प्रीती
बुडेल का कधी ज्याच्या त्याच्या मनात जडली भीती
सर्वां ठाऊक अमर ना कुणी रंक असो वा राव
आयुष्य जैसे नावाड्यावाचून असावी नाव || ६ ||
नाही सुकाणू नाही शीड ना वल्ह्यांचाही ठाव
आयुष्य जैसे नावाड्यावाचून असावी नाव || धृ ||