पाप
जुलै 4, 2014बहिरा
नोव्हेंबर 21, 2014वीज
भारतातील ज्या असंख्य खेड्यांमध्ये अजूनही वीज पोहोचलेली नाही त्यांनी वीज ही फक्त तालुक्याच्या ठिकाणी पाहिलेली असते. ज्या अनेक गावांत वीज काही तासांकरताच मिळते त्यांना विजेचं महत्व कळतं. शहरांची गोष्ट मात्र वेगळी आहे. इथे वीज जाणार ह्या विचारानेच आपल्याला घाम फुटतो. गंमत म्हणजे पूर्णपणे विजेचे गुलाम बनलेले आपण ह्या दास्यातून मुक्ती मिळाली तर पार सैरभैर होऊन जाऊ . . .
शांत होते रस्ते झाली होती निजानीज
आमच्या शहरामधून एकदम गायब झाली वीज || धृ ||
घामाघूम झालो आम्ही सारे बसलो उठून
एसीकरता बंद घर वारा येईल कुठून
थोड्याच वेळात येईल आमचा विचार होता पक्का
प्रात:काळी पेपर वाचून बसला मोठा धक्का
सात दिवस बंद राहील करा तुम्ही तजवीज
आमच्या शहरामधून एकदम गायब झाली वीज || १ ||
आंघोळीला पाणी तापवा उचला ती पातेली
बंद होता मायक्रोवेवही पंचाईत झाली
इस्त्री कशी चालेल कपडे आमचे चोळामोळा
मला ऑफिस मुलांना गाठायची होती शाळा
वाॅशिंग मशीन बंद आणि बंद झाला फ्रीज
आमच्या शहरामधून एकदम गायब झाली वीज || २ ||
सिग्नल सगळे बंद लागल्या होत्या लांब रांगा
गाठू कसं ऑफिस आता कुणीतरी ते सांगा
चालत गेलो शेवटी भलतीच झाली तंगडतोड
वजन माझं भारी चांगली जिरली माझी खोड
एका दिवसात बुटांची अन् झाली चांगलीच झीज
आमच्या शहरामधून एकदम गायब झाली वीज || ३ ||
घरी आलो लिफ्ट बंद जिने चढलो बारा
धाप लागली मला अन् घामाच्या येती धारा
रेडिओ टीवी करमणुकीची साधनं काही नव्हती
भुतांसारखे बसलो आम्ही मेणबत्तीच्या भोवती
काढायचे होते सहा दिवस अजून विजेखेरीज
आमच्या शहरामधून एकदम गायब झाली वीज || ४ ||
आयुष्यच बदलून गेलं त्या सहा दिवसांत
चालून चालून दमलो मात्र पोट गेलं आत
झोपत होतो लवकर म्हणून उठत होतो लवकर
मिळून काम करत होतो घरी नव्हते नोकर
बंद झालं पावभाजी पित्झा अन् चायनीज
आमच्या शहरामधून एकदम गायब झाली वीज || ५ ||
खेळत होतो पत्ते कधी कधी अंताक्षरी
एकमेकांच्या सहवासातच मजा असते खरी
विजेशिवाय जगू कसे हा मोठा बागुलबुवा
फायदे पाहून इतके आम्ही देत होतो दुवा
अभ्यास घेतला रोज मुलाचा शिकवली बेरीज
आमच्या शहरामधून एकदम गायब झाली वीज || ६ ||
बनून राहतो आपण सारे विजेचे गुलाम
विजेशिवाय समजत नाही होईल कसं काम
कळलंसुद्धा नाही दिवस उलटून गेले सात
आणि वीज फिरून आली मग आमच्या शहरात
सुरू झालाय टीवी त्रास देऊ नका प्लीज
आमच्या शहरामधून एकदा गायब झाली वीज || ७ ||
बारा वाजले तरी आता नाही निजानीज
आमच्या शहरामधून एकदाच गायब झाली वीज || धृ ||