नव्याण्णववासी
मार्च 18, 2016दृष्टी
सप्टेंबर 16, 2016पीळ
वाढती वयोमर्यादा आणि आण्विक कुटुंबसंस्था ह्यामुळे वार्धक्याचा सामना कसा करायचा हा प्रश्न भेडसावू लागला आहे. जात्यातल्यांना भरडताना पाहून आता सुपातलेही चिंतातुर होऊ लागले आहेत. स्वाभिमानाने आयुष्य जगल्यामुळे म्हातारपणी आपण कोणावर ओझं तर बनणार नाही ना हा विचार चाळिशीतच त्रास देऊ लागला आहे. मात्र काही बाबतीत अति स्वाभिमान दाखवणंही चुकीचं ठरू शकतं . .
झाले पाऊणशे वयमान
नेहेमी ताठ ठेविली मान
केला नाही सहन कोणता
आयुष्यात कधी अपमान || १ ||
आमुच्या ह्मा नजरेखाली
जेव्हा मुले थोर झाली
सोडूनी मला इथे मागुती
माझी पत्नी निघून गेली || २ ||
आहे पुत्र सूनही छान
ज्यांना असते माझे भान
नातवंडांच्या वाचून
माझे हलतच नव्हते पान || ३ ||
तरीही मनातून मी कुढे
एकच विचार मनी ह्मा रूढे
माझ्यामुळे आता सर्वांना
होर्इल त्रास किती ह्मापुढे || ४ ||
माझा मित्र मला भेटला
तो वॄद्धाश्रम संस्थेतला
जाऊन राहीन त्या संस्थेत
माझा निर्णय मी घेतला || ५ ||
माझे मुलगा आणि सून
मजला सांगती समजावून
त्यांना म्हटलं तुमच्यासाठी
जायला हवे मला येथून || ६ ||
केला मीच खर्च मग सगळा
झालो पाशांतून मोकळा
माझ्यासाठी आता पुढला
अनुभव असे पूर्ण वेगळा || ७ ||
वॄद्धाश्रमात राहणी उच्च
तिथल्या खोल्या फारच स्वच्छ
खोलीत रोज आणि ठेवला
जार्इ एक फुलांचा गुच्छ || ८ ||
मिळती मित्र मला ते नवे
समयही जार्इ ज्यांच्यासवे
आरोग्याची छान काळजी
आणखीन काय मला मग हवे || ९ ||
सगळे मजला होते मान्य
तरीही मनात वाटे शून्य
थोडे दिन गेले मग मनात
येऊ लागे औदासिन्य || १० ||
कोणा हृदयाचे हो दुखणे
कोणा ऐकावया न येणे
कोणा होता संधीवात
कोणा डोळ्यांनी ना दिसणे || ११ ||
हे तर शरीराचे आजार
देता औषध जाती हार
सर्वांना पण दुखणी मनाची
झेपत नव्हता ज्यांचा भार || १२ ||
ऐसे होते थोडे जण
ज्यांना होती अपत्ये पण
असल्यामुळे दूर ती नशिबी
वाट पाहाणे हरएक क्षण || १३ ||
काहींच्यातर मुलीमुलांनी
होते हात ठेवले कानी
अशक्य होते निघणे भरून
त्यांच्या आयुष्याची हानी || १४ ||
मुलेच नव्हती उरले बाकी
त्यातल्या त्यात असे जे सुखी
मुलेच त्यांना नसल्यामुळे
होते जगत जगी एकाकी || १५ ||
मनात प्रत्येकाच्या सल
वाटे आयुष्य ते दलदल
केवळ एक मागणे होते
देवा मजला आता उचल || १६ ||
मजेत आलो मी इथवर
वय जरी असेल पंच्याहत्तर
होती जगण्याची आसक्ती
येवो मरणही बेहत्तर || १७ ||
वाटू लागे मजला खेद
माझी खचत होती उमेद
समजत नव्हते नैराश्याचा
आता कसा करावा भेद || १८ ||
कसला चढला होता जोर
रोखत असे पोटचा पोर
कापून नाही ना बसलो मी
ते फिरण्याचे सारे दोर || १९ ||
आजही जरी परतलो तर
आहे खुलेच माझे घर
पण जर फिरलो आता मागे
हसतील सारे माझ्यावर || २० ||
मनात दाटे औदासिन्य
मन तरी वागते अहंमन्य
इकडे आड विहीर अन् तिकडे
नव्हता विकल्प कुठला अन्य || २१ ||
मनीचा सुंभ जळून जार्इल
तरीही तसाच राहील पीळ
आठवणीने घरच्यांच्या अन्
खचितच झुरेन मी तीळ तीळ || २२ ||
माझे जरा सांगणे ऐका
उगाच धरू नका हा हेका
नसेल खरोखर नार्इलाज
आपुले कुटुंब सोडू नका || २३ ||