ऑगस्ट 2, 2013

जबाबदारी

स्वातंत्र्यदिन साजरा करणं हा आता केवळ एक उपचार राहिला आहे. सिग्नलला गाडी थांबवून झेंडा विकत घेणं म्हणजे स्वातंत्र्यदिन . . . महत्प्रयासाने मिळालेलं हे स्वातंत्र्य टिकवण्याकरता आपली काही जबाबदारी आहे हेच आपण विसरत चाललो आहोत.

मंदिराच्या रांगेमध्ये मित्र उभे होते चार
गप्पा रंगल्या होत्या त्यांच्या विषय होता भ्रष्टाचार
पुजाऱ्याला पाहून एक हळूच म्हणाला दुसऱ्याला
पैसे देऊन आधी दर्शन मिळेल का ते जरा विचार

लाच देणारे घेणारे दोघे असतात तितकेच ठग
नियम असतात सर्वांकरता त्याचं पालन करून बघ

काम करायला घे आधी तू विचार करत बस मग
देशाची ह्या जबाबदारी थोडी तरी घेऊन बघ
जुलै 19, 2013

टोणगा

'भरवशाच्या म्हशीला टोणगा' ही म्हण कुणीतरी खास मध्यमवर्गीयांकरता लिहून ठेवलेली असावी. आपण मनाशी काही ठरवून मनोरथांचे इमले बांधावेत आणि व्हावं काहीतरी भलतंच ह्या गोष्टीची प्रयत्न करूनही सवय होत नाही. असेच काही टोणगे ...

रोज पहायची मला
     बसस्टॉपवर ती बाला
आज विचारू उद्या
     म्हणता उशीर झाला

मला मामा म्हणणारा तिला पोरगा झाला
माझ्या भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला

विचार करता समजून आला जो दगा झाला
माझ्या भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला
एप्रिल 5, 2013

मन

एक वेळ धूर मुठीत धरून ठेवणं जमेल, पाणी झारा वापरून भरणं जमेल, वाळू ओंजळीतून नेणं जमेल ... पण मन ताब्यात कसं ठेवावं? काही जण मनन चिंतन करतात, काही जण साधू-बाबांचा आसरा घेतात. कुणी योग तर कुणी व्यायाम करतात. तुम्हा कोणाला जमलंय का ह्या मनाला वेसण घालणं?

दिवसभर असा
     सोडला नाही वसा
संध्याकाळ झाली
     खाल्लाच सामोसा

डॉक्टर सांगतात मला
     कमी करा वजन
यत्न केले पण
     ताब्यात नाही मन
फेब्रुवारी 15, 2013

परकी मावशी

दर वर्षी येणारा फेब्रुवारी २१ हा दिवस राष्ट्रकुल संघाने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला आहे. हा दिवस जरी पूर्वीच्या पूर्व पाकिस्तानातील (सध्याच्या बांग्लादेशातील) बंगाली भाषिकांच्या लढ्याशी संबंधित असला तरी भारतासारख्या देशात जिथे इंग्रजी नावाच्या परक्या मावशीने आपल्या मराठी मातेची गळचेपी चालवली आहे, तिथे विशेष महत्वाचा आहे. आपल्या घरात ठाण मांडून बसलेल्या ह्या परक्या मावशीला मारलेली ही एक कोपरखळी ...

माध्यम घेतलं इंग्रजी तर कच्चा राही पाया
शिक्षण घेतलं मराठीमध्ये सारंच जाई वाया
साधे साधे शब्द मराठी कळत आता नाहीत
daddy झाले बाबा आणि mummy झाल्या आया

आपली भाषा विसरून जाती पडले सारे फशी
आपल्या घरात ठाण मांडुनी बसली परकी मावशी
जानेवारी 4, 2013

डोरेमॉन

तुमच्या घरी किंवा आजूबाजूला लहान मुलं असतील तर डोरेमॉन म्हणजे कोण हे तुम्हाला सांगायची गरज नाही. नोबिता हा एक ८-१० वर्षांचा धांदरट मुलगा. तो कधीही संकटात सापडला की बाविसाव्या शतकातून आलेलं डोरेमॉन हे यंत्रमांजर त्याला एखादं जादुई उपकरण (गॅजेट - gadget) देऊन त्याची सुटका करण्यास मदत करतं. एका संकटातून दुसऱ्या संकटात जाणाऱ्या आपल्या देशाला पाहून अशाच एखाद्या डोरेमॉनची निकड फार प्रकर्षाने जाणवू लागली आहे ...

इथे आम्हाला देव दिसतो जमिनीवर उगवणाऱ्या साध्या दर्भात
पण देवीसारख्या मुलींना आम्ही मारून टाकतो गर्भात
स्त्री पुरुषांचं समाजातील स्थान समान करण्याकरता
     डोरेमॉन मला एक गॅजेट देशील काय?
नोव्हेंबर 2, 2012

बाथरूममधला मी

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे स्वतःकरता एकांताचा क्षण मिळणं दुर्लभ झालं आहे. आपण दिवसभर सतत कोणत्या ना कोणत्या व्यक्तीबरोबर 'वागत' असतो. समोरच्या व्यक्तीनुसार आपले मुखवटे बदलत असतो. म्हणूनच आपण खरे कसे आहोत हे समजून घ्यायचं असेल तर एका जागेला पर्याय नाही ... बाथरूम!

लिफ्टमध्ये जेव्हा शिरते शेजारीण ती छान
     पोट आत छाती बाहेर माझा सुपरमॅन
घरी दरी एरवी असतो चेहरा गोरामोरा
     पण लिफ्टमन अन् चौकीदारासमोर मोठा तोरा
गाडी अशी चालवतो की मर्कट मद्य प्याला
     एसीमध्ये बसून शिव्या देतो ज्याला त्याला
रूपं माझी असंख्य ती दाखवी समाजाला मी
     बाकी सगळे खोटे खरा बाथरूममधला मी

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/a7-x3p8r2Os ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑक्टोबर 5, 2012

इन द लाँग रन…

लहान सहान गोष्टींवरून तक्रारी, थोड्या मनाविरुद्ध बोललं गेलेल्या शब्दांवरून भांडणं, एवढ्याशा कारणावरून रुसवे फुगवे... हे सारं करताना आपण जणू अमरत्वाचा पट्टा घेऊन आल्याप्रमाणे वागतो. आणि रोजच्या आयुष्यात छोट्या छोट्या क्षणांमधील आनंद हरपताना एक त्रिकालाबाधित सत्य विसरतो की 'इन द लाँग रन...'

त्याच्या पापाचा घडा आधी भरला पाहिजे
मी जिंकलो नाही तरी चालेल पण तो हरला पाहिजे
हेवे दावे द्वेष मत्सर ह्यांनी जीवन भरलंय
वैर नंगा नाच करतंय प्रेम मात्र हरलंय

आयुष्यात सारं जिंकाल...
     मरणाला जिंकाल काय
अरे सोड...
     इन द लाँग रन एवरिवन इज गोइंग टू डाय!
सप्टेंबर 21, 2012

बातम्या

काल सकाळी नेहमीच्या सवयीने मी वर्तमानपत्र वाचायला घेतलं. बराच वेळ वाचल्यानंतर कधीतरी माझ्या लक्षात आलं की ते तीन दिवसांपूर्वीचं वर्तमानपत्र होतं. आपल्यापैकी कित्येकांना वर्तमानपत्र वाचल्याशिवाय दिवस सुरु झाला आहे असं वाटत नाही पण मला आता संशय येऊ लागला आहे की आपण तारीख बदलून रोज एकच वर्तमानपत्र तर वाचत नाही ना! वानगीदाखल ह्या 'बातम्या' वाचा...

वादावादी अहा / खाल्ल्या खाणी दहा
नैतिकतेचे वक्ते / सारे पक्ष पाहा

पाहा काय तो खेळ / खेळाडूंची भेळ
रोजच्या रोज पाहायला / असतो कोणा वेळ

वेळ काय हो आली / मुलगी मुलीस म्हणाली
तुझ्याच नावाचे मी / कुंकू लावीन भाळी
जुलै 20, 2012

निवडक दृष्टी

मी आणि माझा एक भारतभेटीस आलेला परदेशस्थित मित्र गप्पा मारत उभे होतो. काही वेळाने त्याचा अस्वस्थपणा माझ्या लक्षात आला. आमच्या शेजारीच एक आठ-नऊ वर्षांचा मुलगा आशाळभूतपणे भिक मागत उभा होता. खरं तर तो आम्हा दोघांपासून सारख्याच अंतरावर उभा होता पण मला तो दिसलाच नव्हता. म्हणजे दिसला होता ... पण त्याचं असणं मला जाणवलंच नव्हतं. भारतातील आणि विशेषतः मुंबईसारख्या महानगरातील इतरही मध्यमवर्गीय नागरिकांना माझ्यासारखीच निवडक दृष्टीची दैवी देणगी प्राप्त झाली आहे का?

हॉटेलाची सारखी वारी
     कपडेलत्तेसुद्धा माझे भारी
समोरचा जर्जर भिकारी
     मला कधीच दिसला नाही

निवडक आहे माझी दृष्टी
     दिसतात फक्त छान गोष्टी
दृष्टीआडची कुरूप ती सृष्टी
     मला कधीच दिसली नाही