डिसेंबर 2, 2016
निवृत्तीनंतर मी गावी जाऊन राहणार आहे; माझ्या मुलीला मी डॉक्टर बनवणार आहे; येत्या तीन वर्षांत युरोप फिरून येण्याचा विचार करतोय; पुढल्या वर्षी तुझा वाढदिवस येईल तेव्हा जेवायला हॉटेलात जाऊ या; उद्या मी लवकर घरी येणार आहे ... आपल्यापैकी प्रत्येकजण अमरत्वाचा पट्टा घेऊन आल्याप्रमाणे वागत असतो. आयुष्याचा बुद्धिबळाचा डाव आपण 'नियती' ह्या अपराजित खेळाडूबरोबर खेळत आहोत हेच विसरत असतो ...
समोरची ती वयस्क बाई सांगत होती नवऱ्याला
किती दिसांनी भेटेल आता आपला मुलगा आपल्याला
इतके दिवस तिकडे राहिला कसा असेल तो दिसत
आवाज आला मला कुणीतरी होतं छद्मी हसत
वेटिंगरूमच्या फोनवरती लागला एकजण ओरडायला
पोहोचतोच आहे थोड्या वेळात पाहून घेतो तुम्हाला
पैसे तयार ठेवा नाहीतर नाही तुम्ही वाचत
आवाज आला मला कुणीतरी होतं छद्मी हसत








