जून 27, 2020

चुटपुटती ती भेट

आपल्या रोजच्या ताणतणावाने भरलेल्या आयुष्यात कधीतरी एखादी व्यक्ती अशी भेटते की तिच्या सांनिध्यात काही वेळाकरता का होईना आपण आपले सारे ताणतणाव विसरून जातो. इतकंच नव्हे तर ती व्यक्ती परत कधी भेटेल ह्याची शाश्वती नसेल तरीही त्या चुटपुटत्या भेटीची आठवण आपल्याला आयुष्यभर पुरते...

ओळख तुझी करून घेणं अर्धंच राहून गेलं बघ
चुटपुटत्या त्या भेटीत बोलणं अर्धंच राहून गेलं बघ ॥

कॉफीशॉपच्या टेबलपाशी एकटीच वाचत बसली होतीस
फ्लाईट लेट झालं म्हणून जगावर हिरमुसली होतीस
कुठे जाणार होतीस विचारणं अर्धंच राहून गेलं बघ
चुटपुटत्या त्या भेटीत बोलणं अर्धंच राहून गेलं बघ ॥

भाळावरची एक बट गालावरती येत होती
गालावरच्या खळीपासून लक्ष विचलित करत होती
बट तुझी ती मागे सारणं अर्धंच राहून गेलं बघ
चुटपुटत्या त्या भेटीत बोलणं अर्धंच राहून गेलं बघ ॥

ही कविता यूट्यूबवर ह्या https://youtu.be/ErJh-nU6XEk ठिकाणी ऐकता येईल.
जून 12, 2020

माझी शाळा

आज जागतिक बालमजुरीविरोधी दिन आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात ‘माझी शाळा’ म्हटलं की अनेक आठवणी दाटून येतात. पुस्तकं, वह्या, मित्र, शिक्षक, खेळ, अभ्यास, गमतीजमती... काही वाईट पण बहुतेक सगळ्या छान आठवणींनी आपलं ऊर दाटून येतो. पण प्रत्येकाच्या मनात ‘माझी शाळा’ ह्या शब्दांचा अर्थ सारखाच असतो का?

शाळेच्या पुढ्यात एक मोठं अंगण होतं पसरलेलं लांबच लांब
अंगणाच्या मध्यभागी चौथऱ्यावर होता एक उंचच उंच खांब ॥

खुलून दिसत होता इमारतीला दिलेला रंग पांढरा आणि निळा
डोळे भरून बघत होतो दिमाखदार अशी ती माझी शाळा ॥

दोन वर्षांपूर्वी आलो तेव्हा इथे होतं नुसतं माळरान
झाडंझुडूपं तोडून आम्ही इथेच बांधली एक झोपडी लहान ॥

सहा वर्षांचा होतो बहुतेक जेव्हा पहिल्यांदा इथेच घेतलं खांद्यावर छोटं पोतं
आईने मोठ्या कौतुकाने मोडली होती कानशिलावर बोटं ॥
ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/JQ18As1xBMM ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जून 5, 2020

माया

जागतिक पर्यावरणदिनाच्या शुभेच्छा! निसर्ग ज्या निरिच्छ वृत्तीने आपल्याला सारं काही देत असतो ती निरिच्छ वृत्ती आपल्याला केवळ आपल्या पालकांमध्ये – आपल्या माता-पित्याने आपल्यावर केलेल्या मायेमध्ये दिसून येते. त्यामुळे निसर्गाला आपले माता किंवा पिता समजून त्याचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. झाडं आपल्यावर जी माया करतात ती काही औरच असते...

घराभोवती माळ होता शुष्क आणि ओसाड
     माळावर त्या एकच होते बहरलेले झाड ॥

घरामध्ये राहात होता मुलगा छान गोंडस
     मित्र नव्हते कोणी त्याला राहायचा उदास
कंटाळून तो झाडापाशी गेला एक दिवस
     झाड म्हणाले खेळू आपण दोघे चल बिनधास

मित्र नव्हते दोघांनाही जमली त्यांची गट्टी
     जातो कैसा वेळ संगती दोघांना ना कळे
झोपायचा तो पानफुलांच्या मऊ शय्येवरती
     भूक लागता झाड तयाला खाण्या देई फळे

हट्टी होता मुलगा झाड करी त्याचे लाड
     माळावर त्या एकच होते बहरलेले झाड ॥

ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/RSxdr7pp4HU ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मे 15, 2020

जन्मठेप

आंतरराष्ट्रीय कुटुंबदिनाच्या शुभेच्छा! कुटुंब ह्या संस्थेला ह्या टाळेबंदीच्या काळात एक वेगळाच आयाम प्राप्त झाला आहे. इतका की अनेकांना (विशेषतः पुरुषांना) त्याचा कंटाळा येऊ लागला आहे. ‘कोई लौटा दे मेरे बीते हुवे दिन’ असं म्हणत संध्याकाळी खिडकीतून बाहेर बघत बसणारे पुरुष आता अनेक घरांत (घरांच्या खिडक्यांत) दिसून येत आहेत...

व्हरांड्यात उभा होतो न्याहाळत रात्रीचा देखावा तो रम्य
मनात उठलं होतं आठवणींचं काहूर अदम्य ॥

ढगांच्या मागून डोकावण्याचा चंद्राला लागला होता जणू छंद
शरीराला सुखावत होता शीतल वारा झुळझुळता मंद ॥

माझ्या शेजारी उभी राहून तीही डोळ्यांनीच पीत होती पौर्णिमेची ती रात
कसला विचार करतोयस एवढा मला म्हणाली घेऊन हातात माझा हात ॥

म्हटलं आठवतंय असाच उगवला होता त्याही दिवशी पौर्णिमेचा चांद
आणि भावना झाल्या होत्या अनावर भेदून मनाचे बांध ॥
मे 1, 2020

पाचावर धारण

बाळ श्रीकृष्णाचा उच्छाद कमी करण्याकरता यशोदा त्याला दगडी उखळीला बांधून ठेवत असे. सरकारने कोविड विषाणूमुळे टाळेबंदी जाहीर केली आणि प्रत्येक पालकाला आपल्या घरात ह्या उखळीची निकड भासू लागली. ह्या बाटलीतल्या राक्षसांचं काय करायचं असा यक्षप्रश्न घरोघरी पडला. मात्र घरोघरी ह्या प्रश्नांचं उत्तरही लवकरच मिळालं...

कोविड विषाणूशी लढायला सरकारने लॉकडाऊनची वेसण कसली
     आणि घरोघरी पालकांची पाचावर धारण बसली ॥

शाळा, खेळ, सिनेमे, हॉटेलं बाहेरचं काहीच नाही हे जेव्हा कळलं
     तेव्हा आ वासून पालकांच्या तोंडाकडे बघू लागली ही त्यांचीच पिल्लं
रोज ह्यांची करमणूक कशी करायची बुद्धीचा लागू लागला कस
     प्रत्येक घरात कोंडले होते हे छोटे छोटे बाटलीतले राक्षस
त्यांच्याशी केलेली वाटाघाटींची बोलणी पार फसली
     आणि घरोघरी पालकांची पाचावर धारण बसली ॥

कुणी महत्त्वाच्या कागदांची विमानं तर कुणी कपांचा केला चेंडू
     कुठे कुठे लक्ष पुरवायचं पालकांचा शिणू लागला मेंदू
त्याने मला मारलं, ती मला बोचकारते सुरु झाल्या आरोळ्या
     क्वालिटी फॅमिली टाईमचं श्रीखंड गायब, राहिल्या नुसत्याच चारोळ्या
कॅलेंडरची पानं तारखा सरकवायचं सोडून जणू रुसली
     आणि घरोघरी पालकांची पाचावर धारण बसली ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/r1xJ7p22ZkE ह्या ठिकाणी ऐकता येईल.
एप्रिल 7, 2020

एकांतवास

आज जागतिक आरोग्य संस्थेचा (WHO) स्थापना दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. भौतिक उन्नतीमागे भ्रमिष्टाप्रमाणे धावताना आपलं मानसिक आरोग्य हरवून बसलेल्या लोकांना कोरोना विषाणूच्या रुपात जणू आपल्या आयुष्याकडे नव्याने बघण्याची एक शेवटची संधी मिळाली आहे – गर्दीतील एकांतवास संपवण्याची ...

नोकरी करायला लागलो तेव्हा डोक्यावर प्रगतीचं भूत होतं स्वार
     दिवस नाही रात्र नाही कष्ट केले अपार
सगळे उपाय वापरले साम दाम दंड भेद
     थांबलो नाही कोणाकरता नाही केला कधी खेद
चढलो वर इतरांच्या खांद्यांवर डोक्यांवर देत पाय
     पदोन्नतीच्या शक्यतेला होऊ दिला नाही अपाय
दमछाक झाली पण थांबलो नाही गाठलं पार शिखर
     बाकी सारे राहिले होते मागे दूरवर
पण ओसरल्यावर विजयाचा उन्माद वाटू लागलं उदास
     उन्नतीचं मोल म्हणून पदरी पडतो एकांतवास ॥
मार्च 8, 2020

स्त्री

आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हा दिवस गेली एकशे दहा वर्षं साजरा केला जात आहे. एकशे दहा वर्षांत बरंच काही बदललं आहे... पण आपल्या पुरुषप्रधान संकृतीत – मुख्यतः समाजाच्या मानसिकतेत - आणखीन बरंच काही बदलण्याची गरज आहे. पुढल्या एकशे दहा वर्षांत तरी ते बदलेल का?! 

आदिमानव गुहेत होते केला होता जाळ
‘ती’ आणि 'तो' आणि सोबत होतं छोटं त्यांचं बाळ
गुहेबाहेर गुरगुर ऐकून दोघं झाले सावध
दबा धरूनिया बसलं होतं तेथे एक श्वापद

बघती दोघे एकमेकांस मनातूनी घाबरले
अपत्य बघता भीती गिळूनी सज्ज तरी ते झाले
उचलून घेई ती बाळाला कवटाळे उराशी
उचलून पलिता आगीचा तो झेपावे दाराशी

नव्हता तोही वरचढ आणि नव्हती तीही अबला
प्राक्तनामध्ये लिहिला होता प्रसंग त्यांच्या सगळा
त्याच दिवशी पण ठरून गेली सामाजिक वहिवाट
तो चालवितो बाह्यप्रपंच ती घराच्या आत

ममतेपायी सहन करत ती राहीली मानहानी
स्त्रीजन्माची सुरूच आहे अजून करूण कहाणी ॥
फेब्रुवारी 14, 2020

प्रेमाचा पाढा

आज प्रेमाचा उत्सव! प्रेमात पडलं की जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी तेच दिसू लागतं. लहानपणी शिक्षकांच्या, घरच्यांच्या धाकाने पाठ केल्यावर जसे सतत पाढेच डोक्यात फिरायला लागायचे, तसंच कोणाच्याही धाकाशिवाय हा प्रेमाचा पाढा अखंड डोक्यात घर करून बसतो ...

एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
पाढा तिच्या नावाचा मी म्हणतोय येता जाता ॥

एक दिवस करायचाय गं नक्की तुला फोन
विचाराने कावरे बावरे डोळे माझे दोन
एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
आवाज तुझा ऐकल्याशिवाय करमत नाही आता ॥

पाच देव पूजतोय भेट व्हावी म्हणून पाहा
कॉलेजमध्ये वाट पाहातो तुझी तास सहा
एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
झालंय काय काळजीत पडले माझे पिता माता ॥

एके दुणे त्रिक चोक पाचा सक साता
पाढा तिच्या नावाचा मी म्हणतोय येता जाता ॥
डिसेंबर 12, 2019

सल

सामाजिक माध्यमांनी (social media) लोकसंवादात क्रांती घडवून आणली आणि कधी नव्हे ते राजकारणाने मध्यमवर्गीयांच्या घरात प्रवेश केला. ह्या गोष्टीचा फायदा जरी झाला असला तरी मनामनांतील तेढ वाढवण्याकरता त्याचा वापर ज्याप्रकारे होत आहे त्याचा सल आता मनाला बोचू लागला आहे ...

अचानक पांगलेले सारे मित्र ह्या सोशल मिडियावर लागले भेटू
वर्तमानाला भूतकाळाशी जोडणारा तो होता जणू एक सेतू ॥

सोशल मिडियावरील लिखाणामुळे समजू लागली त्यांची हालहवाल
आणि इथेच पहिल्यांदा चुकचुकली मनात शंकेची एक पाल ॥

कुणी धर्माबद्दल कुणी जातीबद्दल कुणी भाषेबद्दल होतं बोलत
आमच्या शाळेत आम्हाला हे कुणीच कधीच नव्हतं शिकवत ॥

असे कसे झाले होते ह्यांचे विचार एवढे कोते
वयाने वाढलेले माझे काही मित्र विचारांनी मात्र झाले होते छोटे ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/QNgYIUgYAjw ह्या ठिकाणी ऐकता येईल.