कविता

प्रेमकाव्य

कथा-कादंबऱ्या आणि चित्रपट-नाटकांमध्ये दाखवतात तेवढं अवास्तव नसलं तरी प्रेमाचं आयुष्यात अतिशय महत्वाचं स्थान असतं एवढं नक्की. स्थळ, काळ, वय, ऐपत वगैरे कोणतीही बंधनं न पाळणारी ही भावना व्यक्त करण्याकरता शब्द अपुरे पडतात आणि मग काव्याचा आधार घ्यावा लागतो.

जून १७, २०११

तिची आणि माझी भेट

काही दिवसांपूर्वी मला लग्नाच्या सुवर्णमहोत्सवी सोहोळ्याला उपस्थित राहण्याची एकदा नाही तर दोनदा संधी मिळाली. लग्नाला पन्नास वर्षं होणं म्हणजे समजुतदारपणा आणि आरोग्य ह्यांचा दुर्मिळ संगम. पन्नास वर्षांपूर्वी जग कसं होतं ह्याचा विचार केला तर पन्नास वर्षं म्हणजे केवढा मोठा कालखंड आहे ते लक्षात येईल. सादर आहे ह्याच विचारांवर बनलेली एक कविता 'तिची आणि माझी भेट'.

नरी कॉन्ट्रॅक्टर होता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार
पुलंची अपूर्वाई आणि गणगोत ही पुस्तकं लोकप्रिय झाली होती फार
मुघल-ए-आझमच्या भव्यतेने लोक वेडे झाले होते पार
लताचं अल्ला तेरो नाम रेडिओवर वाजत आणि गाजत होतं सातही वार
जेव्हा दिलीप वेंगसरकरचं वय होतं फक्त चार
तेव्हा तिची आणि माझी भेट झाली
   पन्नास वर्षांपूर्वी
फेब्रुवारी ४, २०११

बदलू नकोस

लग्नाआधी एकमेकांना भेटायला जाताना प्रियकर आणि प्रेयसी सिंड्रेला बनून जातात. आणि मग लग्नाचे बारा वाजले की बग्गीचा भोपळा आणि घोड्यांचे उंदीर होतील की काय अशी सतत भीती वाटत राहते. म्हणूनच ह्या प्रियकराचं आपल्या प्रेयसीकडे एकच मागणं आहे ...

भेटतो जेव्हा तुला माझं प्रसन्न होतं मन
   असणं तुझं सुवास आणि हसणं सूर्यकिरण
जग वाटतं निर्मळ आणि जगणं वाटतं सोपं
   अशक्य गोष्टींवरचं तुटतं अशक्यतेचं बंधन

आयुष्य माझं उजळवणं हे थांबवू नकोस तू
   एकच मागणं आहे पुढे बदलू नकोस तू
फेब्रुवारी ४, २०११

एकच मजला सांग …

स्त्रियांचा नटण्याचा आणि पुरुषांचा त्यांचं नटणं पाहण्याचा हे दोन्ही छंद पूर्वापार चालत आलेले आहेत. आणि पुरुषांनी तसं पाहणं आणि स्त्रियांनी लटक्या रागाने नाकं मुरडणं हा खेळही प्राचीन काळापासून सुरु आहे. अशा वेळी पुरुषांना म्हणावसं वाटतं ...

निसर्गनिर्मित घटना आहे छंद तुला नटण्याचा
   निसर्गनिर्मित घटना आहे छंद मला बघण्याचा
मीच एकटा बघत नाही गं तुझ्या रूपाची किमया
   तूच एकटी दिसत नाही गं ह्मा नयनांच्या द्वया

मी पाहतो म्हणून चिडतेस एकच मजला सांग
   नरनारीतील आकर्षण ते कळला कोणा थांग