कविता

प्रेमकाव्य

कथा-कादंबऱ्या आणि चित्रपट-नाटकांमध्ये दाखवतात तेवढं अवास्तव नसलं तरी प्रेमाचं आयुष्यात अतिशय महत्वाचं स्थान असतं एवढं नक्की. स्थळ, काळ, वय, ऐपत वगैरे कोणतीही बंधनं न पाळणारी ही भावना व्यक्त करण्याकरता शब्द अपुरे पडतात आणि मग काव्याचा आधार घ्यावा लागतो.

फेब्रुवारी १४, २०१९

गुपित

वॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा उत्सव. मात्र लग्न होऊन बरीच वर्षं झालेल्या अनेक जोडप्यांना – विशेषतः पुरुषांना - आजच्या दिवशी नक्की कसं वागावं हा मोठा प्रश्न पडलेला असतो. खरं तर प्रेमाला स्थल-कालाप्रमाणे वयाचंही बंधन नसतं. त्यामुळे बावरून जाऊ नका. प्रणयाच्या खेळात तुमची जुनीजाणती सहचारिणीही तुम्हाला चकित करू शकते...

नवतारूण्याचे दिन आपुले
   सरून गेले जरी असती
माझ्याकरता मदन आज तू
   तुझ्यासाठी मी आज रती

उधळू देत मनाला चौखूर
   आज मला सावरू नको
गुपित आपुले आज रात्रीचे
   विसरू नको रे विसरू नको ॥
जानेवारी ६, २०१७

तू ने तो कभी पी ही नही

प्रत्येक मध्यमवर्गीय गृहस्थाच्या आयुष्यात एक मित्र असा असतो जो प्रेमात पडण्याच्या बाबतीत त्या गृहस्थाचा सुप्त आदर्श असतो. सुप्त अशाकरता की प्रत्यक्षात आयुष्यभर त्या गृहस्थाने तो मित्र कसा चुकीचा वागत आहे हे त्या मित्राला आणि स्वतःलाही पटवून देण्याचा प्रयत्न केलेला असतो. तो मित्र मात्र त्याचा सल्ला प्रत्येक वेळी धुडकावून त्याला एकच सांगत असतो ... हाय कम्बख़्त 'तू ने तो कभी पी ही नहीं' ...

लागली नोकरी संपलं शिक्षण
माझी प्रेमासाठी तुझी पैशांसाठी वणवण
म्हणायचास भविष्याचा विचार कर
ह्यावर किती भांडायचो आपण

तुला मोठे हुद्दे तर प्रेयसींची यादी माझ्या संग्रही
तुला कधीच नाही समजलं
तेव्हाही मी म्हणायचो हाय कम्बख़्त तू ने तो कभी पी ही नहीं
सप्टेंबर १८, २०१५

आठव

'अतिपरिचयात अवज्ञा . . .' असं म्हटलं जातं पण ते प्रत्येक बाबतीत खरं असेलच असं नाही. आपल्याला अतिशय निकट असलेल्या व्यक्तीचा सहवास आपल्या अंगवळणी पडू लागतो. आणि मग त्या व्यक्तीपासून दूर गेलं की लहान सहान गोष्टींमधून त्या व्यक्तीचा विरह जाणवू लागतो. आपण 'आपलं माणूस' म्हणू शकतो अशा व्यक्तीची खरी ओळख हीच असावी...

कधी कानावर ये तान
   विसरून ऐकतो भान
स्मरणातील सुंदर गान
   मज येई तुझा आठव

कुणी सारी केस बोटाने
   अन् ओठ दाबी दाताने
हनुवटी धरी हाताने
   मज येई तुझा आठव
फेब्रुवारी २०, २०१५

ओळख

नवरसांतील (खाजगीत) सर्वात जास्त आवडणारा रस म्हणजे शृंगार रस. आणि मराठी भाषेत शृंगार रस म्हटलं की लावणीला पर्याय नाही . . . 

तुम्हासाठी केला शिणगार
वाट बघत झाला अंधार
तुमच्या मनात तिचे विचार

मन धावे तिकडं जाया
   तुम्हा ओळखलंय मी राया

नाही सुटणार आता अबोला
   तुम्हा ओळखलंय मी राया
जरी केलीत लाडीगोडी
   जरी पडलात माझ्या पाया
ऑक्टोबर ३, २०१४

जाणार नाहीस ना

हल्ली internet आणि mobileवर दहापैकी नऊ विनोद हे बायको ह्या व्यक्तीबद्दल असतात. पिकतं तिथे विकत नाही हेच खरं कारण ज्यावेळी पुरुषावर कौटुंबिक, सामाजिक किंवा आर्थिक संकट येतं तेव्हा collegeमधल्या मैत्रिणी किंवा सिनेमातल्या नायिका नाहीत तर हीच अर्धांगिनी पुरुषाच्या मागे ठामपणे उभी राहते. अशा वेळी धास्तावलेला पुरुष एकच प्रश्न विचारत राहतो . . . तू मला सोडून तर 'जाणार नाहीस ना?'

निकड भासते पदोपदी मज
   नसते जेव्हा सानिध्य
मला उगाच स्वावलंबी
   करून जाणार नाहीस ना

ह्या हृदयाच्या गाभाऱ्यातील
   सुगंध आहे तुझ्यामुळे
धुराप्रमाणे उदबत्तीच्या
   विरून जाणार नाहीस ना

वळण आलं वाटेमध्ये
   सरळ जाणार नाहीस ना
तेव्हा माझा हात सोडून
   दूर जाणार नाहीस ना
जानेवारी २०, २०१२

शेवटची भेट

मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या प्रेमात पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात "मी तुझ्याकडे 'तशा' नजरेने कधी पाहिलंच नाही" ह्या विधानाची जबरदस्त धास्ती असते. आणि मग एकदा का हे विधान ऐकावं लागलं तर ती मैत्री तरी अबाधित राहू शकते का?

...
नकार दिलास तू आणि आपल्यातला मोकळेपणा संपला
जोर लावून उघडला की जसा दुभंगून जातो शिंपला
भेटी संपल्या आपल्या काही कारणच नव्हतं मिळत
आणि खरं सांगू? कारण मिळालं तरी भेटायचं मीच होतो टाळत
...