कविता

काव्यकथा

लहानपणी चांदोबा, किशोरमध्ये वाचलेल्या छोट्या छोट्या गोष्टी, आई आणि आजीने सांगितलेल्या गोष्टी मनात अगदी घर करून राहतात. आणि आता मोठेपणी ह्या लहान गोष्टींची जागा घेतली आहे ईमेल आणि लघुसंदेशांनी. अशा ह्या मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या गोष्टींनी काव्यकथा बनलेल्या आहेत. ह्या कथा माझ्या नाहीत पण कविता नक्कीच माझ्या आहेत.

डिसेंबर 18, 2015

माकड आणि माणूस

माकड आणि माणसाचा पूर्वज एकच होता असं विज्ञान सांगतं. ह्याबाबतीत विज्ञानाची प्रमेयं आणि सिद्धांत काही असोत, पण बरेचदा माणूस आपल्या वागण्याने ह्या विधानाची सत्यता सिद्ध करताना दिसतो. माणसांवर उपचार करण्यापूर्वी बऱ्याच वैद्यकीय चाचण्या माकडांवर केल्या जातात. ह्यात वैद्यकीय मानसोपचाराचाही समावेश होतो. अशाच एका चाचणीचे निष्कर्ष काय आले ते पाहा...

पाहण्याकरता एकदा माणसं कशी वागतात
शास्त्रज्ञांनी डांबली एका खोलीत माकडं सात

खोलीमध्ये शिडी एक
    उभी होती केली
हुशार एका माकडाची
    नजर त्यावर गेली
शिडीवरती टांगला होता
    केळ्यांचा एक घड
खुणवत होता खायला मला
    शिडीवर तू चढ

माकडाला त्या झालं कधी लावीन त्याला दात
शास्त्रज्ञांनी डांबली एका खोलीत माकडं सात
डिसेंबर 4, 2015

पोटचा गोळा

"परत मुलगीच झाली . . . अरेरे!" हे विधान आजही काही तथाकथित सुसंपन्न, सुसंस्कृत, सुशिक्षित कुटुंबांमध्ये ऐकू येत असेल तर मग समाजातील इतर घटकांबद्दल काय बोलावं! स्त्रीभ्रूण हत्येपासून सुरु होणारे स्त्रियांवरील अत्याचारांचे हे कलंक आपल्या समाजातून कधीतरी कायमचे पुसले जातील का?

होती चौथी वेळ तरीही धास्तावलेली होती
कारण प्रत्येक वेळी पूर्वी मुलगी झाली होती

पहिली बेटी धनाची पेटी असं म्हणून कौतुक
दुसऱ्या वेळी मुलगी पाहून सासर झालं मूक

तिसऱ्या वेळी तर सासूच्या शब्द आले ओठी
आमच्या नशिबी का गं आलीस तू तर कपाळकरंटी

ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/KUexfT78vsk ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑगस्ट 21, 2015

बायकोचा मित्र

'घर की मुर्गी दाल बराबर' ही उक्ती लग्न झालेल्या प्रत्येक पुरुषाला लागू पडत असावी असा समज WhatsAppवर येणाऱ्या 'बायको' ह्या विषयावरील संदेशांच्या वर्दळीमुळे होणं साहजिक आहे. त्यामुळे 'बाहर की दाल मुर्गी बराबर' वाटणंही ओघानेच आलं. मात्र मध्यमवयीन पुरुषांच्या आयुष्यात येणारी बाहरवाली कुणाचीतरी बायको असते हे सोयीस्कररीत्या विसरलं जातं.

दुपारनंतर कुणास ठाऊक किती झाले चहा
आणि कूर्मगतीने वेळ सरकत वाजले एकदाचे सहा

थोडा वेळ चोळले कपाळावरचे आणि मानेचे स्नायू
मग हळूच लिहिलं लॅपटॉपवरील चॅटवर 'हॅलो, हाऊ आर यू'

'गिव मी टू मिनिट्स' असा मेसेज माझ्या स्क्रीनवर चढला
वाट पाहणारा माझा जीव भांड्यात पडला

रोज संध्याकाळचा हा सर्वात महत्त्वाचा टप्पा
आता रंगतील चांगल्या तास दीड तास गप्पा
जुलै 3, 2015

दरवडेखोर

खरं बोलणं कधीही चांगलं, पण एखाद्या निरुपद्रवी असत्याने जर कुणाच्या मनाला बरं वाटत असेल तर अशा खोटं बोलण्याला कुणाची हरकत नसावी. स्वामीजींनीही आश्रमात शिरलेल्या दरवडेखोराच्या बाबतीत असाच काहीसा विचार केला ... 

ग्रीष्मातील मध्यान्ह असो वा असो दिवाळी दसरा
     नाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा

ऐकून टापा घोड्यांच्या घाबरले लहान थोर
     आश्रमात शिरला जेव्हा तो एक दरवडेखोर
बंदूक त्याच्या पाठीवरती कमरेला अन् सुरा 
     कुणी धावला आडोशाला कुणी लपविते पोर

स्वामींपाशी एक जातसे मागून दुसरा तिसरा
     नाही बदलला स्वामीजींचा चेहरा प्रसन्न हसरा
मे 6, 2015

एक तास

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका बावीस वर्षीय भारतीय तरुणाला कामाच्या अतिरेकी ताणामुळे आपले प्राण गमवावे लागले. भविष्यात सुखाचा उपभोग घेता यावा म्हणून दिवसरात्र एक करून काम करायचं आणि ते करताना आसपासच्या लहान लहान आनंददायी सुखांकडे दुर्लक्ष करायचं ही पद्धत आपल्याकडेही सर्वमान्य झाली आहे. पण एखाद दिवशी अशी घटना घडते की कामाच्या धुंदीत असलेल्या आपले डोळे खाडकन उघडतात ...

नवरा तिचा महत्वाकांक्षी तिच्याच इतका भारी
     एका म्यानामध्ये कशा मग राहतील दो तलवारी

प्रेमविवाहच असे परंतु नावापुरता फक्त
     तीन वर्षं झाली असतील अन् झाले ते विभक्त

तेव्हापासून चिंटूला मग फक्त तिचा आधार
     चिंटूही पण फारच होता मुलगा समजूतदार
नोव्हेंबर 21, 2014

बहिरा

दुसऱ्याकडे बोट दाखवताना (निदान) तीन बोटं आपल्याकडे वळलेली असतात हे आपण सोयीस्करपणे विसरतो. त्यामुळे कधी कधी आपलेच शब्द आपल्याच घशात जायची वेळ येते. अशाच कुठेतरी वाचलेल्या एका विनोदावर आधारित ही कविता . . . 

बरेच दिवस घोळत होता संशय माझ्या मनात
     गडबड आहे नक्की माझ्या बायकोच्या कानात
ह्या बाबतीत समजत नव्हतं करू तरी काय मी
     माझ्या बायकोला ऐकू येतंय का हो कमी?

नाक कान घसा तज्ज्ञ होता माझा मित्र
     भेटून त्याला मनचं माझ्या स्पष्ट केलं चित्र
मित्राने सांगितली मला शक्कल एक नामी
     माझ्या बायकोला ऐकू येतंय का हो कमी?