नोव्हेंबर १४, २०१८

शेपटी

बालदिनाच्या मनापासून शुभेच्छा! १४ नोव्हेंबरचा दिवस आला की बालपण आठवतं. तेव्हा FB आणि WhatsAppवर संदेश येत नसले तरी बालविशेषांक घरी येत असत. किशोर, कुमार, चंपक, चांदोबा.... त्यातील गोष्टी, कविता, चित्रं, कोडी... त्या आठवणी ताज्या करणारं हे एक बालकाव्य ‘शेपटी’ माझ्या बालमित्रांसाठी आणि बालपणीच्या मित्रांसाठीही...

गोळा करूनी प्राणी सारे
   माकड वनात भाषण ठोके
शस्त्र मानवाचे ते न्यारे
   वापरतो तो आपुले डोके

मारूनिया बुद्धीची बढार्इ
   पुढे बोलले माकड कपटी
फरक एवढा त्याला नाही
   मला मात्र ही असे शेपटी ॥

प्राणी सारे लहान मोठे
   ऐकुन पडले तेथ विचारी
माणसास घाबरूनी होते
   ओळख ज्याची महाशिकारी

माकड बोले काहीबाही
   फुगवून आपुली छाती चपटी
फरक एवढा त्याला नाही
   मला मात्र ही असे शेपटी ॥
सप्टेंबर १२, २०१८

बाप्पांचे पर्यावरण

उद्या येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! फार मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या ह्या उत्सवामुळे पर्यावरणाबद्दल चिंता वाटणं साहजिक आहे. काही दिवसांपूर्वी एका शाळेतील मुलांकरता गणपती दरम्यान आणि एरवीही पर्यावरणाची काळजी कशी घेता येईल ह्याबद्दल एक आरती लिहून देण्याची संधी मिळाली. ती आरती सादर करत आहे...

जय देव जय देव जय मंगलमुर्ती
प्रदूषणाने त्रासली धरती
   जय देव जय देव ॥

POPची मूर्ती हवी कशाला
   शाडूच्या मूर्तीत आणू तुम्हाला
Thermocolचे मखर नको आम्हाला
   Plastic Nylon सर्वांनी टाळा
   जय देव जय देव ॥

टाकणार नाही ताटात पोळ्या
   आवरून ठेवू आमुच्या खोल्या
बघाल फरक आपुल्या डोळ्या
   निर्माल्येही टाकू कचऱ्यात ओल्या
   जय देव जय देव ॥
एप्रिल १७, २०१५

संशयी ससा

शाळेत असताना वार्षिक परीक्षा नावाचं दिव्य पार पाडण्याकरता परीक्षेनंतर येणारी उन्हाळ्याची सुट्टी हे कारण पुरेसं असायचं. पिढ्यांमागून पिढ्या बदलल्या पण हा सुट्टीचा आनंद काही बदललेला नाही. अशीच एक सुट्टी उपभोगणाऱ्या बच्चा कंपनीकरता ही एक कविता, आपल्या सभोवतालच्या बाळगोपाळांना अवश्य वाचून दाखवा . . . 

डोंगरावरती स्वच्छ होता पाण्याचा एक झरा
   ससे म्हणाले हाच आहे पिकनिक स्पॉट बरा
खेळून डुंबून दमल्यावरती लागे त्यांना भूक
   खीर होती आणली म्हणती मारू ताव जरा

चमचेच नव्हते आणले त्यांनी खाणार खीर कसे
   डोंगरावरती पिकनिककरता गेले चार ससे
एप्रिल १९, २०१३

निकाल

परीक्षा संपून आता निकालांची वेळ जवळ आली आहे. एकीकडे 'मुलांचा निकाल आहे, आपला नाही' ह्याचा असुरी आनंद तर दुसरीकडे 'काय दिवे लावले आहेत कोण जाणे' ह्याची चिंता अशा कातरीत तुमच्यापैकी बरेच जण सापडले असतील. घरातील तणाव कमी व्हावा म्हणून खास बाळगोपाळांकरता लिहिलेली ही कविता त्यांना अवश्य वाचून दाखवा …

विसरून गेले त्याच्यानंतर बाकीचे पेपर
सुचत नव्हतं कोणावरती फोडू मी खापर
एवढुसे ते मार्क बघुनी होई तोंड कडू
आईला मी काय सांगू आलंच मला रडू

माझ्या जागी स्वतःस ठेवा तुम्ही सुद्धा रडाल
परीक्षेचा नाही लागलाय माझाच आज निकाल
सप्टेंबर ७, २०१२

बाप्पांची आरती

गणपतीबाप्पा म्हणजे आपल्या सर्वांचा अगदी लहानपणापासूनचा लाडका देव. आजच्या संगणक आणि टीवीच्या काळातील बाळगोपाळ मंडळीही बाप्पांच्या आगमनाने तेवढीच उल्हासित झालेली दिसतात. बाप्पा आले म्हणजे त्यांच्या आरत्याही आल्या. लहानपणी त्या संस्कृतप्रचुर 'रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा...' वगैरे आरत्यांमधील बरेच शब्द पार डोक्यावरून जात असत (काही शब्द तर अजूनही डोक्यावरून जातात). त्या आठवणी स्मरून खास बच्चेकंपनीकरता ही 'बाप्पांची आरती' तुमच्या घरातील आणि आजूबाजूच्या बाळगोपाळांना आवडते का ते पाहा...

कित्ती दिवस झाले गेलात परत
तुमच्यावाचून आता नाही हो करमत
   सांगायच्यात तुम्हाला बातम्या कितीतरी
   बाप्पा लवकर या ना परत माझ्या घरी

तुमचं येणं म्हणजे मज्जाच मोठ्ठी
मोदकांचं जेवण शाळेला सुट्टी
   पाहुणे घरी वर्दळ भारी
   बाप्पा लवकर या ना परत माझ्या घरी
ऑक्टोबर ७, २०११

प्रश्न

सणासुदीचे दिवस म्हणजे घरी देव-देवतांचा उल्लेख होणं ओघानेच आलं. अशा वेळी मोठ्या माणसांना न पडणारे प्रश्न लहान मुलांना साहजिकपणे पडतात. त्यात सुट्ट्या सुरु झाल्या की मग तर प्रश्नांना ऊत येतो. पहा ह्या प्रश्नांची उत्तरं देणं जमतंय का ...

आंघोळ सूर्यदेवाला आहे का हो माफ?
   पाणी घेतलं अंगावर तर नुसतीच होईल वाफ

शंकराला नाद लागला वाचन करण्याचा
   कसा मिळेल चष्मा त्याला तीन डोळ्यांचा?
मे २०, २०११

अजब जंगल

मे महिन्याची सुट्टी सुरु आहे आणि घरातल्या बाळगोपाळांना पाहून तुम्हालाही नक्कीच हेवा वाटत असेल. मुलांची मात्र धमाल सुरु आहे. खास तुमच्या घरातील बच्चे कंपनीकरता एक बालगीत सादर करत आहे, 'अजब जंगल'. त्यांना जरूर वाचून दाखवा ... पाहा आवडतंय का ते!

काळ्या फुलावरती एका बसला होता हत्ती
फुंकर मारता उडून गेला करू लागला मस्ती
मगरी उडत होत्या गगनी चालत नव्हती अक्कल
वाघ खाती गवत मोठं अजब होतं जंगल

भरधाव पळे कासव मागे लागली गोगलगाय
बिळात पळाला जिराफ माझा पडणार होता पाय
झाडावरच्या घरट्यात अंडी उबवत होतं अस्वल
चार पायांचा साप मोठं अजब होतं जंगल
फेब्रुवारी ४, २०११

चतुर कुत्रा

जंगलात हरवलेल्या कुत्र्याच्या अगदी जीवावर बेतलं होतं. पण आपला चतुरपणा वापरून कुत्र्याने - एकदा नाही तर दोनदा - आपली सुटका कशी करून घेतली त्याची ही गोष्ट.

दाट जंगलामध्ये हरवून
   गेला एक कुत्रा
डोक्याने तो चतुर जरी
   होता थोडा भित्रा

वाट चुकला होता सापडत
   नव्हता त्याला माग
दिसला त्याला येताना
   तिथून ढाण्या वाघ
फेब्रुवारी ४, २०११

आई नावाचं मशीन

मोठं झाल्यावर आपल्या लक्षात येतं की घरातील कामं आपण केल्याशिवाय होत नाहीत. मग वाटतं की लहानपणी ही कामं कशी अपोआप व्हायची. ह्याला कारण म्हणजे प्रत्येक घरात असतं एक आई नावाचं मशीन. हे मशीन कधी दमत नाही कधी थकत नाही आणि कधी कुरकुरतही नाही. पण मग हे मशीन चालतं तरी कशावर?

काल माझ्या घरी आल्या मैत्रिणी चिकार
   खूप पसारा केला आणि झाल्या मग पसार
आवर पसारा म्हंटलं म्हणजे येतो मजला शीण
   आमच्या घरी आहे आर्इ नावाचं मशीन