मे 19, 2017

आपण एक काम करूया

माणूस हा समुदायात राहणारा प्राणी आहे. समुदायात प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या भावना, स्वतःच्या श्रद्धा, स्वतःची विचार करण्याची पद्धत असते. अशा विभिन्न व्यक्ती आणि व्यक्तिमत्वांमुळेच समाज बनतो. कधी कधी मुद्दाम भडकवलेल्या भावनांच्या भरात आपण समुदायाचा हा नियम विसरून जातो ...

आपल्याला एक धोका आहे
आपला देश धोक्यात आहे
आपल्या देशाचा आपल्याला अभिमान, नाही ... गर्व, नाही ... माज हवा
आपण एक काम करूया
आपल्या देशाला आपण वाचवूया
बाकी सारे देश बेचिराख करून ...
जून 17, 2016

व्यसन

माकडापासून मानव उत्क्रांत होताना शेपटी हा शरीराचा एक अवयव गेला पण व्यसन हा मनाचा एक अवयव मात्र चिकटला. बढाईखोरांचं "मला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही." इथपासून "मी WhatsApp दिवसातून फक्त तीनदाच check करतो." इथपर्यंत स्थित्यंतर आपण बघितलं आहे. सर्व व्यसनांपासून मुक्ती ही एक अद्भुतरम्य कल्पना आहे. व्यसनामुळे आपल्याला आनंद मिळत असताना दुसऱ्यांना त्रास होऊ नये एवढी काळजी मात्र नक्कीच घेता येईल...

व्यसन नावाच्या सापळ्याचे
     असतात खूप प्रकार
बाहेरख्यालीपणापासून
     सिगरेट दारू जुगार

व्यसन कॉम्प्युटरचं असलं
     तहान नाही भूक
माणसं झाली बेटं
     कारण नाती झाली मूक
जून 3, 2016

कठीण प्रश्न

सध्या प्रसारमाध्यमांचं युग सुरु आहे. टीवी, व्हॉट्सॲप, फेसबुक वगैरे माध्यमांवर अनेक प्रश्नांबाबत तावातावाने चर्चा चाललेली असते. प्रत्येकाकडे प्रत्येक प्रश्नाचं काही ना काही उत्तर असतं. आणि तरीही काही प्रश्न सोपी उत्तरं न दिल्याने कठीण होऊन बसलेले आहेत. मला पडलेले असेच काही 'कठीण' प्रश्न... 

माझ्या मनात काही प्रश्न आहेत मोठे रास्त
उत्तर ज्यांचं मिळणं मोठं झालंय दुरापास्त

विडी सिगारेट आरोग्याला अपायकारक फार
कानीकपाळी ओरडून सांगे आपल्याला सरकार
तंबाखूचा उद्यम कैसा चाले मग निर्धास्त
उत्तर ज्यांचं मिळणं मोठं झालंय दुरापास्त
मार्च 4, 2016

सोयीस्कर देशभक्ती

आपल्या देशभक्तीच्या संकल्पना अगदी ठसठशीत आहेत. देशदर्शक कोणत्याही प्रतीकाला जराही धक्का लागला तर आपण ते खपवून घेत नाही. मात्र देशप्रेमाची भावना कायदे आणि नियम पाळण्याच्या लहान लहान कृतीमधून जास्त दृगोच्चर होऊ शकते हे आपण 'सोयीस्कर'पणे विसरत तर नाही ना?

त्या देशद्रोह्यांविरुद्ध सात्त्विक संताप अनावर झाला
     व्यक्त करण्याकरता जो तो सामाजिक माध्यमांवर आला

प्रत्येकाची देशप्रेमाची व्याख्या होती सुस्पष्ट आणि नीट
     देशप्रेम म्हणजे झेंडा देशप्रेम म्हणजे राष्ट्रगीत

देशभक्तीची परिमाणे बदलून कशी चालतील
     उगीच सर्वांना कायदे आणि नियम पाळावे लागतील
जानेवारी 15, 2016

अफूची गोळी

घरचे आणि ऑफिसचे ताण-तणाव, गरिबी, महागाई, देशातील सद्यस्थिती, मुलभूत सुविधांसाठी करावी लागणारी धडपड, स्पर्धा अशा अनेक समस्यांना तोंड देणारे आपण वेडे होऊन आत्महत्या करत नाही ह्याला एक कारण आहे. आपल्या प्रत्येकाकडे एक तरी अफूची गोळी असते.

कठीण प्रसंगी नशा करावी असते समजूत भोळी
प्रत्येकाची अशा प्रसंगी असे अफूची गोळी

नवे वर्ष हे आपुल्याकरता आहे फार कठीण
येतील आव्हाने तुमच्या सामोरी नवीन नवीन
कर्मचारी आपुले पण साऱ्या देशी सर्वोत्तम
सांगावे किती काम तयांना येतच नाही शीण

हरेक मॅनेजर सांगे दर वर्षी अशाच ओळी
काम कर्मचाऱ्यांकरता ती असे अफूची गोळी
नोव्हेंबर 20, 2015

आठवणी

भाषा ही शेवटी भावना व्यक्त करण्याचं केवळ एक साधन आहे. आपण बोललेल्या, ऐकलेल्या शब्दांतून मनाला जो संदेश मिळतो तो शब्दांपलीकडला असतो. कालांतराने शब्द विसरले जातात पण त्या संदेशाचा ठसा आठवणीच्या रूपाने मनावर कायम उमटलेला राहतो. शब्दांवर शब्दांचा उतारा असू शकतो पण ह्या आठवणींवर उतारा नसतो ...

मोठा झालो कमवू लागलो
रंगलो माझ्या रंगी
वाटू लागले सर्व जगाची
बुद्धी माझ्या अंगी
विचार करण्या फुरसत नव्हती
असा जीवनी वेग
शब्दांचे पण तीर लागले
दगडावर जणू रेघ

उशिरा कळले समय प्रवाही शब्द वाहून जातात
     आठवणी राहून जातात
ऑक्टोबर 2, 2015

चांगलं तेवढं घ्यावं

थोर व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचं विश्लेषण करण्यात काही वावगं नाही. मात्र ते करताना त्यांच्या केवळ त्रुटी दाखवून देऊन आपलं पुरोगामित्व सिद्ध करणं ह्यात काही अर्थ नाही. थोर व्यक्तींना थोरपण ज्या गुणांमुळे लाभतं तेवढे गुण घावेत, त्याचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा आणि बाकी सारं सोडून द्यावं...

हाताला बोचले की चिडून प्रत्येकाला वाटे
किती क्लेशदायक आहेत हे गुलाबपुष्पाचे काटे
आपण रंगसुवासाचं अद्भुत मिश्रण पाहावं
     प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं

दुर्गुणांचा विचार करणं सोडावं
     प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यावं
ऑगस्ट 7, 2015

युधिष्ठीर आणि दुर्योधन

'सर्वसाधारण नागरिक भ्रष्टाचारामुळे भरडला जात आहे' ह्याबाबत सर्वांचं एकमत आहे. पण अनेकदा सर्वसाधारण नागरिकाला भरडणाराही एक सर्वसाधारण नागरिकच असतो असा अनुभव येतो. भ्रष्टाचार म्हटलं की आपण लगेच राजकारण्यांच्या नावाने बोटं मोडतो पण नीट डोळे उघडून पाहिलं तर आजूबाजूला प्रत्येक पातळीवर भ्रष्टाचार सुरु असल्याचं जाणवतं. मग भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन व्हावं असं नक्की कोणाला वाटतंय? . . .

रिक्षाचालक दुर्योधनाने मीटरमध्ये केला होता फेरफार
युधिष्ठीर कारकून जेव्हा रिक्षाने स्टेशनवरून घरी गेला

कारकून दुर्योधनाने कार्ड देण्यापूर्वी चहापाण्याकरता पैसे मागितले
युधिष्ठीर पोलीस जेव्हा रेशन कार्ड बनवायला गेला

पोलीस दुर्योधनाने गाडी अडवून लाच मागितली
युधिष्ठीर डॉक्टरची गाडी जेव्हा चुकून सिग्नल तोडून पुढे गेली

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/pCaVDvsMjP4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जुलै 17, 2015

मत्सर

अमेरिकेतील एका संशोधनानुसार सामाजिक माध्यमांवर (social media) अतिरिक्त वेळ घालवणाऱ्या व्यक्तींना एक प्रकारच्या न्यूनगंडाची बाधा होते. सामाजिक माध्यमांवरील ओळखीच्या इतर सर्व व्यक्ती पराकोटीच्या सुखात नांदत आहेत असं चित्र त्या व्यक्तीच्या डोळ्यांसमोर उभं राहतं. ती व्यक्ती स्वतःसुद्धा इतरांना तसंच भासवायचा प्रयत्न करत असली तरी कुठेतरी मनात स्वतःबद्दल कमीपणा बळावू लागतो. तुमच्या बाबतीत असं घडतं का?

त्या कुणाला आप्त-मित्रांच्या मृत्यूचा शोक नसतो
कारण कुणी मुळात आजारीच पडत नाही
सर्दी नाही खोकला नाही ताप नाही जुलाब नाही
कावीळ नाही नागीण नाही कॅन्सर नाही एड्स नाही

प्रत्येक जण सुसंस्कृत कुणी अपशब्द वापरत नाहीत
बायकोला मारणं सोडा साधं तिच्याशी भांडतही नाहीत
आईवडिलांची सेवा करतात मुलांचे पापे घेतात
सगळ्यांचे वाढदिवस साजरे करतात

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/4YG0m3GMx24 ह्या ठिकाणी ऐकता येईल.