डिसेंबर 15, 2011

सैनिक

(ही कविता २०१२ साली 'पुढचं पाऊल' ह्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली आहे. )

बांगलादेशच्या युद्धाला चाळीस वर्षं झाली. भारताच्या दृष्टीने ती 'मदत' होती; पाकिस्तानकरता ती 'घुसखोरी' होती; तर बांगलादेशकरता तो 'स्वातंत्र्यलढा' होता. पण ह्या युद्धाचं चर्वितचर्वण करताना त्यात तिन्ही देशांच्या मिळून मृत्युमुखी पडलेल्या ४०,००० सैनिकांचा विचार कोणी करतंय का?

मनात माजे काहूर तुझिया आठवणींचे लाख
विचार करणे सोड सैनिका पाऊल पुढती टाक

तरुण पत्नी तुझ्या विचारी बसली झुरत असेल
अंध आईच्या घशामधुनी घासही सरत नसेल
उभे पिक ते कापणीविना झाले असेल खाक
विचार करणे सोड सैनिका पाऊल पुढती टाक

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/y3_iUpzX8hA ह्या ठिकाणी ऐकता येईल.
फेब्रुवारी 4, 2011

ती

एखादी व्यक्ती दुःखी आहे ह्या कल्पनेवर आपला फार पटकन विश्वास बसतो. मग ती व्यक्ती आपल्या जवळच्या नात्यातील असो नाहीतर केवळ कधीतरी ओझरती पाहिलेली असो. अर्थातच ह्या कल्पनेत नेहेमी तथ्य असतंच असं नव्हे ...

मी रस्त्यावरती
     अन् खिडकीमध्ये ती
दिसली ओझरती
     पण मनी अल्हाद झाला

मोकळे होते केश
     साधा घरचा वेष
ठाऊक नाही शेष
     पण चेहरा आपला वाटला