ऑक्टोबर २, २०१८

साबरमतीचा संत

अल्बर्ट आईन्स्टाईनच्या अमेरिकेतील घरात तीन व्यक्तींच्या तसबिरी लावलेल्या आहेत असं म्हणतात. त्यापैकी दोन आहेत मायकल फॅरेडे आणि जेम्स मॅक्सवेल ह्या शास्त्रज्ञांच्या तर तिसरी आहे महात्मा गांधींची. अशा ह्या जगन्मान्य महात्म्याचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष आजपासून सुरु होत आहे. त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली ही आदरांजली...

कष्ट हरण्या जनतेचे साहिले जाच अनंत
   लढला शस्त्राविना पाहा साबरमतीचा संत ॥

सौम्य भाव वदनी वसती अन् शरीरयष्टी किरकोळ
   भारदस्त जरी आवाज नव्हता कणखर तरीही बोल
बटुमूर्ती ती पाहून हसती इंग्रज हिणवून त्याला
   किंमत लागे मोजावी सत्तेचे देऊन मोल

अखंड चळवळ चाले नाही देत काही उसंत
   लढला शस्त्राविना पाहा साबरमतीचा संत ॥
जून २, २०१८

नसणार तू ….

“पिल्लं मोठी झाली की घरटं सोडून जाणारच”, हे बोलायला आणि ऐकायला किती सोपं वाटतं. पण आपलं रिकामं घर बघून ज्याचं मन जळतं त्यालाच कळतं...

त्याच भिंती त्याच खोल्या
   त्याच जागा दिसती डोळ्यां

त्या कपाटामागुती शोधी मी जर लपलीस तू
   पण तिथे नसणार तू ||


त्याच खुर्च्या तेच टेबल
   पुस्तकांवर तेच लेबल

आर्इही चिडणार नाही पसरल्या जर वस्तू तू
   पण तिथे नसणार तू ||
फेब्रुवारी २६, २०१८

सागरा प्राण तळमळला

भारतमातेची परकीय जोखडातून मुक्तता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून विकास ह्या दोन ध्येयांकरता वाटेल त्या हालअपेष्टा सहन करण्याची तयारी ठेवणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज पुण्यतिथी आहे. ‘न धरी शस्त्र करी मी’ अशा ह्या वीराचा इंग्रजांनी इतका धसका घेतला होता की त्यांना पार अंदमानात पन्नास वर्षांकरता काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. अंदमानातही वीर सावरकर अमानुष अत्याचार सहन करत अथक कार्यरत होते. मात्र मातृभूमीपासून दूर ठेवणाऱ्या सागराला पाहिलं की मनात एकच विचार येत होता....

केवळ सत्तावीस वयाला नशीब फिरवी पाठ
दहा साल पण सुटकेचे सन एकोणीसशे साठ
काळ्या पाण्याकरता सोडी भारतभूचा काठ

दिसेल का कधी भारतमाता आत्मा गहिवरला
एकच विचार मनी सागरा प्राण तळमळला ||
ऑगस्ट १९, २०१६

गुलज़ारजी

काल गुलज़ारजींचा वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काही दिवसांपूर्वी त्यांचा कवितासंग्रह वाचायचा योग आला. त्यांच्या कविता वाचून माझ्या मनात आलेले हे काही विचार ...

गुलज़ारजी, तुमचं कवितांचं पुस्तक वाचलं

कडक उन्हाचे चटके अवचित आलेल्या सरी ... जणू श्रावण आला
ओठांच्या कडांना हसू डोळ्यांच्या कडांना पाणी ... एकाच वेळी
अतिभव्य ब्रह्माण्डाएवढं सामावणारं एका सूक्ष्म कणात

शब्दांना एवढं वजन असतं ... ठाऊक नव्हतं
शब्दांना रंग आकार स्पर्श असतो ... ठाऊक नव्हतं
शब्दांत भावना व्यक्त करता येतात, ठीक आहे
शब्द श्वास घेतात ... ठाऊक नव्हतं
नोव्हेंबर ६, २०१५

राग

आपल्या आयुष्यात आपला एखादा मित्र, मैत्रीण किंवा आप्त आपल्यावर रागावतो, रुसतो. अनेकदा ही गोष्ट आपल्या बरीच उशिरा लक्षात येते. आपण समजूत काढण्याचा, मन वळवण्याचा प्रयत्न करतो पण ती व्यक्ती बधत नाही. त्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यात असणं किती महत्वाचं आहे हा विचार एकतर्फी तर नाही ना अशी शंका आपल्या मनात येऊ लागते. मन उदास होऊ लागतं ...
 
तुलाही असंच वाटतंय, की हे आहेत माझ्याच मनाचे खेळ?
तुझ्याकडे कदाचित माझा विचार करायलाही नसेल वेळ

माझी काही चूक असेल तर ती सुधारायची संधी तरी होती का?
इतकी कशी रागावलीस
   आपल्यात इतकी मैत्री तरी होती का?
ऑक्टोबर १७, २०१४

एक भाऊ असावा

राखीपौर्णिमेला जाहिरातबाजी कितीही झाली तरी महाराष्ट्रात भाऊ-बहीण नात्याला खरा उजाळा मिळतो तो भाऊबिजेला! प्रत्येक मुलीला, स्त्रीला आपल्याला आधार देणारा एक भाऊ असावा असं नक्की वाटतं. पुढल्या आठवड्यात येणाऱ्या भाऊबिजेच्या निमित्ताने एका बहिणीच्या भावना अधोरेखित करणारी ही कविता . . .

सतत खोड्या काढल्या तरी
   पाठवणीची वेळ येताच
कोपऱ्यात बसून आपले डोळे
   पुसणारा एक भाऊ असावा

अरेतुरेची सलगी साऱ्या
   मोठ्यांकरता चालत नाही
मुलांकडून मामा म्हणवून
  घेणारा एक भाऊ असावा

आपलं सुख आपलं मानून
   घेणारा एक भाऊ असावा
आपल्या दुःखात ठाम उभा
   राहणारा एक भाऊ असावा
मार्च ७, २०१४

गृहिणी

आपल्यापैकी किती पुरुष नोकरी सोडून घर सांभाळू शकतील? हसण्यावारी नेऊ नका, नुसत्या विचारानेही घाम फुटेल. अनेक कमावते पुरुष घरची आघाडी भक्कम ठेवणाऱ्या गृहिणीला सोयीस्करपणे कमी लेखतात. आठ मार्च रोजी 'जागतिक महिला दिन' संपन्न होत आहे. त्यानिमित्त ह्या 'गृहिणी'चं केलेलं हे थोडंसं कौतुक . . .

बाहेरचे अन् घरचे सारे काम पाडिते पार
   सुट्टी नाही त्या कामाला ना सण ना रविवार
स्वागत करते आगंतुकाचे तरी प्रसन्न हसुनी
   राहती जागा घर बनविते घरामधील गृहिणी

पदोन्नतीची आशा नाही पदक नाही ना चषक
   गृहीतच धरती सारे तिजला राबे तरीही अथक
कौतुक सारे तिचे करूया निदान ह्या स्त्रीदिनी
   राहती जागा घर बनविते घरामधील गृहिणी
नोव्हेंबर २५, २०१३

सचिन

सचिनबद्दल मी तुम्हाला काय सांगावे? सव्वीस वर्षांपूर्वी सुनील गावस्कर निवृत्त झाला (अति प्रेमापोटी सचिन आणि सुनीलचा एकेरी उल्लेख करण्याचं धाडस करत आहे) तेव्हा एवढंच वाईट वाटल्याचं आठवतंय. गेली चोवीस वर्षं आपल्या धकाधकीच्या जगण्यात आनंदाचे असंख्य क्षण दिल्याबद्दल सचिनला धन्यवाद देण्याचा हा छोटासा प्रयत्न . . .

चोवीस वर्षे आपल्या मनात ज्या व्यक्तीने केलंय घर
नाव आहे त्या व्यक्तीचे सचिन रमेश तेंडुलकर

विक्रम अळवावरचे पाणी मोडीत निघती नित्यनवे
अनंतकाळी अभेद्य टिकतील विचार हे असती फसवे
गर्वाचे घर वर ना येते आदर मिळतो राहुनी लीन
कीर्ती पचवुनी शांत राहावे उदाहरण ते दावी सचिन

धावांपेक्षा रचले ज्याने हर्षोल्हासाचे डोंगर
नाव आहे त्या व्यक्तीचे सचिन रमेश तेंडुलकर
मे ३, २०१३

बालपणीची मैत्रीण

फेसबुक आणि इंटरनेट सोडा, साधे फोनही दुर्मिळ असलेल्या आपल्या बालपणीच्या काळात मित्र किंवा मैत्रीण हरवून जाणं हे काही अपवादात्मक नव्हतं. तुमचे आहेत का हो असे मित्र किंवा मैत्रीण जे आजही आठवण आली की मनाला हुरहूर लावून जातात?

आठवत नाही आता
   आयुष्य सरकत जाता
कशा आणखी कोठे
   भिन्न जाहल्या वाटा

वाढे जगविस्तार
   असंख्य मनी विचार
नवलाईच्या डोही
   हरवून गेलीस पार