जानेवारी 24, 2021

विस्तव – भविष्याचा इतिहास

सुलतानी लोभीपणामुळे आलेल्या आसमानी संकटात पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टी आणि विशेषतः मानवजात विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन ठाकली. मात्र अंगभूत जिजीविषेमुळे जीवसृष्टी तगली आणि त्याबरोबर मागे राहिलेल्या मूठभर मानवांनी पुढील काही सहस्राकांत पुन्हा एकदा संपूर्ण पृथ्वी पादाक्रांत केली. सुरुवातीला फळं-कंदमुळं आणि शिकारीवर उदरनिर्वाह करणारा तो मानवही पुढे शेती करायला शिकला आणि भटक्याचं आयुष्य त्यागून वस्ती करून राहू लागला. आलेल्या स्थैर्याबरोबर समाजाच्या कक्षा विस्तारू लागल्या. कला, क्रीडा, संकृती, युद्धं आली... धर्म आला! वेगवेगळ्या समाजांमध्ये संघर्ष आला. जेत्यांचा धर्म पराजितांच्या गळी उतरवला जाऊ लागला. लहान राज्यं जाऊन मोठे देश आले आणि त्यातील एका देशाने संपूर्ण जगभर आपल्या फांद्या पसरल्या. त्यांच्या पूर्वजांनी उपलब्ध माहितीवर विसंबून नैसर्गिक घडामोडींचा जो काही अर्थ लावला होता तो त्यांच्या धार्मिक आस्थांचं रूप घेऊन सर्वदूर पसरला. मानव बुद्धिमान तर होताच. त्यामुळे त्या मानवाचीही वैज्ञानिक प्रगती झाली. शोध लागले, तंत्रज्ञान विकसित होऊ लागलं. इतके दिवस धर्माची मक्तेदारी असलेल्या प्रश्नांना विज्ञानामुळे काही वेगळीच उत्तरं मिळू लागली. संघर्षाची ठिणगी पडली आणि लवकरच धर्म आणि विज्ञानातून विस्तवही जाईनासा झाला. त्या भविष्यातील माणसाचा हा इतिहास आहे.

‘विस्तवप्रकार: कादंबरी
स्वरूप: Kindle ई-पुस्तक
प्रकाशक: नवनिर्मिती.इन
पृष्ठसंख्या: ६३०
कमाल किंमत: ₹ २५०/-