एकमत
ऑगस्ट 21, 2024
खिडकी
डिसेंबर 4, 2024बावळट

मराठी माध्यमाच्या शाळेतून इंग्रजी माध्यमाच्या महाविद्यालयात गेल्यावर कानावर पडण्याऱ्या भाषांच्या कक्षा वाढल्या. नोकरी लागल्यावर काही राष्ट्रीय तर काही आंतरराष्ट्रीय भाषांची त्यात भर पडली. ह्या भाषांची समाज जरी मर्यादित असली तरी एका बाबतीत माझं मत ठाम होत चाललं आहे. ‘बावळट’सारखा अपमानजनक शब्द दुसऱ्या कोणत्याही भाषेत नसावा..
वाच्य-अर्वाच्य शिव्यांचा मराठीत तुटवडा नाही
पण ‘बावळट’सारखा खजील करणारा दुसरा शब्द नाही ॥
शाळेतील नाटकात मला साधा शिपायाचा रोल मिळाला
आई म्हणाली बावळट आहेस तो शेजारचा राजू बघ राजा झाला
कोणाला रोल कुठला ते ठरवतात शाळेतल्या बाई
पण ‘बावळट’सारखा खजील करणारा दुसरा शब्द नाही ॥
गर्लफ्रेंड चढली, गर्दीमुळे माझी मात्र ट्रेन चुकली
बावळटच आहेस मला म्हणाली पुन्हा जेव्हा भेटली
कुठेच जाण्याची आम्हा दोघांना कसलीच नव्हती घाई
पण ‘बावळट’सारखा खजील करणारा दुसरा शब्द नाही ॥
हायवेवर माझ्या पुढे जाणारा म्हणतो बावळट रात्री पोहोचेल
हायवेवर माझ्याहून हळू जाणारा म्हणतो बावळट नक्कीच मरेल
आठदहा मिनिटांच्या फरकाने जो तो पुण्यास जाई
पण ‘बावळट’सारखा खजील करणारा दुसरा शब्द नाही ॥
आमचा शेजारी सुट्टीच्या दिवशी त्याची व्रात्य मुलं आमच्याकडे धाडतो
बायको म्हणते जिथे तिथे तुझा बावळटपणा नडतो
फार नाही, फक्त झोपेचं खोबरं होतं मुलांच्या दंग्यापायी
पण ‘बावळट’सारखा खजील करणारा दुसरा शब्द नाही ॥
मराठी सोडून इतर काही भाषा मला समजतात छान
कुठल्याच भाषेत ‘बावळट’सारखा नाही चपखल अपमान
अर्थात भाषा असंख्य आहेत, मी काही भाषाप्रभू नाही
पण माझी खातरी आहे की इतर कोणत्याही भाषेत
‘बावळट’सारखा खजील करणारा पर्यायी शब्द नाही ॥
वाच्य-अर्वाच्य शिव्यांचा मराठीत तुटवडा नाही
पण ‘बावळट’सारखा खजील करणारा दुसरा शब्द नाही ॥