चारोळया

एप्रिल 6, 2019

सणावली

सण साजरे करणं हा कोणत्याही संस्कृतीचा अविभाज्य घटक असतो. एखाद्या गावाची, शहराची, राज्याची किंवा देशाची संस्कृती तेथील समाज म्हणजेच लोक ठरवत असतात. त्यामुळे एखादा सण साजरा करण्याकरता जात, धर्म, वय, लिंग, आर्थिक परिस्थिती असे भेद आड येत नाहीत. त्या समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सण त्या समाजाचा सण बनतो. हिंदू बहुसंख्य भारतवर्षातील हिंदूंचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. त्यानिमित्त सादर आहे ही आपल्या सणांची सणावली...

नूतन वर्षारंभाची ती गुढी पाहा रोवली
सहस्रकांची संस्कृती भारतवर्षाची सावली
भाग्य आपुले थोर लाभते समृद्ध सणावली
   प्रत्येक ऋतूमध्ये ऐसा सण होई साजरा ॥

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/EqipUBxIFvI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मे 15, 2015

कायदा पाळणारा गाढव

तुम्ही वेळेवर कर भरता का? तुम्ही वाहतुकीचे नियम पाळता का? तुम्ही दुकानांत वस्तूंच्या पावत्या मागता का? तसं असेल तर तुम्ही गाढव आहात . . . दचकू नका. आपल्या देशात, जिथे जास्तीत जास्त कायदा मोडणाऱ्याला हुशार किंवा चतुर समजलं जातं, तिथे दुसरं काय म्हणणार?

आयुष्यभर झुरतोय घ्यायला घर मोठं
त्याने मात्र खोली बांधली जिथे अंगण होतं
तरीही घरपट्टीला उशीर झाला तर मीच घाबरतो
कारण, कायदा पाळणाराच शेवटी गाढव ठरतो

लहानपणापासून ऐकत आलो आहे बात
कायद्याचा म्हणे भारी लांब असतो हात
पण हा हात कायदा मोडणाऱ्यांना कधी धरतो?
कारण, कायदा पाळणाराच शेवटी गाढव ठरतो
नोव्हेंबर 7, 2014

वीज

भारतातील ज्या असंख्य खेड्यांमध्ये अजूनही वीज पोहोचलेली नाही त्यांनी वीज ही फक्त तालुक्याच्या ठिकाणी पाहिलेली असते. ज्या अनेक गावांत वीज काही तासांकरताच मिळते त्यांना विजेचं महत्व कळतं. शहरांची गोष्ट मात्र वेगळी आहे. इथे वीज जाणार ह्या विचारानेच आपल्याला घाम फुटतो. गंमत म्हणजे पूर्णपणे विजेचे गुलाम बनलेले आपण ह्या दास्यातून मुक्ती मिळाली तर पार सैरभैर होऊन जाऊ . . . 

शांत होते रस्ते झाली होती निजानीज
   आमच्या शहरामधून एकदम गायब झाली वीज।।

घामाघूम झालो आम्ही सारे बसलो उठून
   एसीकरता बंद घर वारा येईल कुठून
थोड्याच वेळात येईल आमचा विचार होता पक्का
   प्रातःकाळी पेपर वाचून बसला मोठा धक्का

सात दिवस बंद राहील करा तुम्ही तजवीज
   आमच्या शहरामधून एकदम गायब झाली वीज।।
ऑक्टोबर 17, 2014

एक भाऊ असावा

राखीपौर्णिमेला जाहिरातबाजी कितीही झाली तरी महाराष्ट्रात भाऊ-बहीण नात्याला खरा उजाळा मिळतो तो भाऊबिजेला! प्रत्येक मुलीला, स्त्रीला आपल्याला आधार देणारा एक भाऊ असावा असं नक्की वाटतं. पुढल्या आठवड्यात येणाऱ्या भाऊबिजेच्या निमित्ताने एका बहिणीच्या भावना अधोरेखित करणारी ही कविता . . .

सतत खोड्या काढल्या तरी
   पाठवणीची वेळ येताच
कोपऱ्यात बसून आपले डोळे
   पुसणारा एक भाऊ असावा

अरेतुरेची सलगी साऱ्या
   मोठ्यांकरता चालत नाही
मुलांकडून मामा म्हणवून
  घेणारा एक भाऊ असावा

आपलं सुख आपलं मानून
   घेणारा एक भाऊ असावा
आपल्या दुःखात ठाम उभा
   राहणारा एक भाऊ असावा
सप्टेंबर 29, 2014

अतर्क्य

'मानवी मनाची खोली अजून विज्ञानालाही मोजता आलेली नाही. समाजात वावरताना कसं वागावं एवढंच नव्हे तर कसा विचार करावा ह्याचंही साचेबद्ध प्रशिक्षण आपल्याला लहानपणापासून मिळालेलं असतं. आपल्या मनाला मात्र ही बंधनं मान्य नसतात. सामाजिकच काय पण भौतिकशास्त्राचे नियमही मन मानत नाही. कधी कधी स्वप्नांमध्ये दिसणारे अशक्य कोटीतील खेळ मन उघड्या डोळ्यांसमोर मांडू लागतं. आणि मग 'अतर्क्य' वाटणाऱ्या घटनाही तर्कसंगत भासू लागतात ... '

‘अतर्क्यप्रकार: लघुकथासंग्रह
स्वरूप: छापील, ई-पुस्तक, Kindle Edition
प्रकाशक: राफ्टर पब्लिकेशन्स
पृष्ठसंख्या: २०४
कमाल किंमत: ₹ २००/-
मे 2, 2014

दीर्घायुषी राजा

लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांतच पार पडतील. आता बहुतेक नवा भिडू, नवे राज्य आणि नवीन राजा. हा नवीन किंवा नव्याने येणारा जुना राजा ह्या गोष्टीतून काही बोध घेईल का?

. . .
 
दोन वर्षांपूर्वी शेवटी वदले त्यांना स्वामी
तुमच्या प्रश्नाकडे माझं खचितच आहे लक्ष
माझे विचार काही काळात येतील तुमच्या कामी
वठून जावा लागेल उद्यानातील तो वटवृक्ष

शब्द ऐकुनी त्या मंत्र्याचं डोकंच होतं फिरलं
समजत नव्हतं स्वामीजींच्या मनात काय दडलं
. . .
जानेवारी 18, 2013

स्वामी विवेकानंद

बारा जानेवारी रोजी नरेंद्र नाथ दत्त अर्थात स्वामी विवेकानंद ह्या महापुरुषाची शतकोत्तर सुवर्णजयंती साजरी झाली. स्वामी विवेकानंदांसारख्या विराट व्यक्तिमत्वाला शब्दांमध्ये बंदिस्त करणे म्हणजे अशक्यप्राय गोष्ट आहे. तरीही माझ्या वतीने हा आदरांजलीचा लहानसा प्रयत्न ...

वस्तुस्थिती घेण्यास जाणुनी फिरला साऱ्या देशी
प्रगल्भ करण्या विचार लांघे धर्मांच्याही वेशी
पाच वर्षं देशाटन केले चार धाम अन् काशी

पाहुनी द्रवला देशाच्या पिडीत मनीचा आक्रंद
तो भारतभूचा सुपुत्र होता स्वामी विवेकानंद
जानेवारी 4, 2013

डोरेमॉन

तुमच्या घरी किंवा आजूबाजूला लहान मुलं असतील तर डोरेमॉन म्हणजे कोण हे तुम्हाला सांगायची गरज नाही. नोबिता हा एक ८-१० वर्षांचा धांदरट मुलगा. तो कधीही संकटात सापडला की बाविसाव्या शतकातून आलेलं डोरेमॉन हे यंत्रमांजर त्याला एखादं जादुई उपकरण (गॅजेट - gadget) देऊन त्याची सुटका करण्यास मदत करतं. एका संकटातून दुसऱ्या संकटात जाणाऱ्या आपल्या देशाला पाहून अशाच एखाद्या डोरेमॉनची निकड फार प्रकर्षाने जाणवू लागली आहे ...

इथे आम्हाला देव दिसतो जमिनीवर उगवणाऱ्या साध्या दर्भात
पण देवीसारख्या मुलींना आम्ही मारून टाकतो गर्भात
स्त्री पुरुषांचं समाजातील स्थान समान करण्याकरता
   डोरेमॉन मला एक गॅजेट देशील काय?
डिसेंबर 21, 2012

मुंबईचा ट्रॅफिक

गाणी ऐकणं, फोनवर बोलणं, झोप काढणं, नाश्ता करणं ... थोडक्यात सांगायचं तर मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये दर दिवशी काही तास घालवणं हे आपल्यातील अनेकांच्या आता अंगवळणी पडलं आहे. मात्र बाहेरगावची एखादी हौशी व्यक्ती जेव्हा गाडी घेऊन मुंबईत येते तेव्हा काय हाल होत असतील ह्याची कल्पनाच न केलेली बरी ...

नवी कोरी गाडी घ्यायची केलीत एवढी घाई
आता मुंबई तरी दाखवून आणा म्हणाली मुलं आणि त्यांची आई
गाडी परवडली एवढं त्या प्रवासाचं झालं मोल
कारण दर दहा पावलांना आम्ही भरत गेलो टोल
वेशीवर पोहोचेपर्यंत आमचं गाडी नावाचं घोडं जसं अगदी दमलं
मुंबईच्या ट्रॅफिकशी आमचं कधीच नाही जमलं