ऑक्टोबर 24, 2020

जगपंचायत

आज राष्ट्रसंघ दिवस आहे. ग्लोबल विलेज किंवा वैश्विक गावाची संकल्पना स्वीकारली तर राष्ट्रसंघ म्हणजे त्या गावची ग्रामपंचायत ठरतं. आता ग्रामपंचायत म्हटली की गावातील लोकांचे हेवेदावे, भांडणं, रुसवे-फुगवे ह्या साऱ्याचं प्रतिबिंब त्यात पडणारच. दुसऱ्या महायुद्धानंतर बेचिराख झालेल्या राष्ट्रांना सुचलेलं शहाणपण असलेली राष्ट्रसंघ नावाची ही जगपंचायतही शीतयुद्ध, अखाती युद्ध, कोरियन युद्ध, अमेरिका-चीन वाद असे अनेक तंटे सहन करत कशीबशी काम करत राहिली आहे.

येका आगळ्यायेगळ्या गावचा न्यारा होता ढंग
ग्रामपंचायतीस म्हनतात तिकडं राष्ट्रसंघ ॥

आटपाट ब्रह्मांडात येक न्यारं व्हतं गाव
निळ्या निळ्या त्या गावाचं प्रिथवी व्हतं नाव
गाव मोठं सुरेख त्याचं पानी लई लई ग्वाड
पन गावातील त्या मानसं व्हती येकाहून येक द्वाड
येगळ्या येगळ्या दिशेस होती त्या समद्यांची तोंडं
लाथाळ्या अन् तंटे करती जशे गावगुंड
येकदा मोठा राडा झाला असा वाटे धाक
निम्म्याहून जास्त घरं झाली बेचिराख

गावकरी मग जमले सारे बांधला त्यांनी चंग
ग्रामपंचायतीस म्हनतात तिकडं राष्ट्रसंघ ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/hqqxYRbcLXY ह्या ठिकाणी ऐकता येईल.
सप्टेंबर 2, 2016

अशीच एक इमारत

खुल्या अर्थव्यवस्थेमुळे नव्या पिढीकरता कारकिर्दीची अनेक दालनं उघडत आहेत. शिक्षण आणि नोकऱ्यांचे सरधोपट मार्ग बदलत चालले आहेत. हे नवीन मार्ग निवडण्याकरता घरापासून दूर जाणं हे आता अपवादात्मक राहिलेलं नाही. एक किंवा दोनच मुलं आणि तीही परगावी / परदेशी स्थायिक होणं हे अनेक मध्यमवर्गीय घरांचं आजचं वास्तव आहे. अशा घरांनी बनलेली ही अशीच एक इमारत ...

नवीन पिढीच्या पंखांत आता उसळत होती वीज
     खुणवत होतं त्यांना रोज एक नवं क्षितिज
किती दिवस त्या इमारतीच्या भिंती त्यांना ठेवणार होत्या धरून
     एक एक करत सारी पिल्लं घरट्यांतून गेली उडून

उभी होती त्यांच्या बालपणीच्या स्मृती गोंजारत
     अशीच एक इमारत

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/0zKQHfoncWs ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑक्टोबर 16, 2015

घर

काही लोकांच्या घरची टापटीप बघितली की मला कमीपणा वाटत असे. सगळं कसं आखीव रेखीव . . . प्रत्येक वस्तू जागच्या जागी . . . स्वच्छता तर इतकी की जमीन पाहून भांग पाडावा . . .  पण अशा घरांमध्ये मला अवघडून गेल्यासारखं का वाटतं? आपल्या हातून कोचावर चहा सांडेल, काचेची फुलदाणी फुटेल, चमचा हातातून पडेल अशी भीती सारखी का वाटत राहते? मग मी माझं घर नीट निरखून पाहिलं . . . आणि हळूहळू मला ह्या प्रश्नांची उत्तरं मिळू लागली... 

कोपऱ्यात एक जळमट
खुर्चीवर डाग कळकट
भिंत थोडीशी तेलकट
पण इथल्या प्रत्येक वस्तूवर मायेचा थर आहे
     ही शोरूम नाही घर आहे

थोडे कपडे अस्ताव्यस्त
पलंगावर चादरी स्वस्त
पुस्तकं इतस्ततः मस्त
पण इथे हवी ती वस्तू हव्या त्या जागेवर आहे
     हे हॉटेल नाही घर आहे
जून 6, 2014

इस्पितळाची वारी

अपघाताप्रमाणे इस्पितळात भरती व्हावं लागणं हे केवळ इतरांच्या बाबतीत घडतं असा आपला समज असतो. इतरांना भेटायला आपण अनेकदा इस्पितळात जातो. मात्र इस्पितळ ह्या जागेचं गांभीर्य आपल्याला स्वतःला भरती होण्याची वेळ येते तेव्हाच समजतं. आणि त्यानंतर इस्पितळ ह्या वास्तूकडे आपण वेगळ्याच आदराने पाहू लागतो . . .

गप्पा मारणं, बसणं, भेटीला जाणं
     फालतू विनोद सांगून परतून येणं
एखाद्या रात्रीला झोपायला जाणं
     कधी सकाळ होते वाट पाहाणं

आत्तापर्यंत होती माझ्या विचारी
     इतुक्यापुरती इस्पितळाची वारी
जून 7, 2013

फिरदौस काश्मीर

काश्मीर अजून पाहिलेलं नसताना तुम्ही परदेशवारीचा बेत आखत आहात काय? तसं असेल तर पुन्हा एकदा विचार करा. परदेशात सृष्टीसौंदर्य असेलच ... पण आपल्या काश्मीरातील सृष्टीची श्रीमंती त्यांपेक्षा काकणभर सरसच ठरेल असा माझा दावा आहे.

करण्याला सतत परदेशवारी
     बहु उत्सुक असती नरनारी
काश्मीरास जाऊन पाहावे येथे
     सृष्टीची सुंदरता एकवटली सारी

आधी पाहावे येथले सौंदर्य
     मग खुशाल व्हावे परदेशी मार्गस्थ
गर फिरदौस बर रू-ए-जमीं अस्त
     हमीं अस्तो हमीं अस्तो हमीं अस्त

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/Tu4ozzEjWpM ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 21, 2012

मुंबईचा ट्रॅफिक

गाणी ऐकणं, फोनवर बोलणं, झोप काढणं, नाश्ता करणं ... थोडक्यात सांगायचं तर मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये दर दिवशी काही तास घालवणं हे आपल्यातील अनेकांच्या आता अंगवळणी पडलं आहे. मात्र बाहेरगावची एखादी हौशी व्यक्ती जेव्हा गाडी घेऊन मुंबईत येते तेव्हा काय हाल होत असतील ह्याची कल्पनाच न केलेली बरी ...

नवी कोरी गाडी घ्यायची केलीत एवढी घाई
आता मुंबई तरी दाखवून आणा म्हणाली मुलं आणि त्यांची आई
गाडी परवडली एवढं त्या प्रवासाचं झालं मोल
कारण दर दहा पावलांना आम्ही भरत गेलो टोल
वेशीवर पोहोचेपर्यंत आमचं गाडी नावाचं घोडं जसं अगदी दमलं
मुंबईच्या ट्रॅफिकशी आमचं कधीच नाही जमलं
डिसेंबर 7, 2012

वैमानिका…

पूर्वीच्या काळी दूरदेशी गेलेला घरातील कमावता पुरुष घरी परतताना बैलगाडीच्या गाडीवानाला वेगाने गाडी हाकण्याची आर्जवं करत असे. आता काळ बदलला. बैलगाडीची जागा विमानांनी घेतली. पण त्या दूरदेशी गेलेल्या व्यक्तीच्या भावना बदलल्या आहेत का?

गेलो तुझ्याच संगे
रंगलो तिथल्या रंगे
परत यायचे माझे
स्वप्न कितीदा भंगे

येईन वर्षभरात
म्हणून हलविला हात
तीन वर्षं पण सरली
परते मी देशात

कितीक आल्या चिठ्ठ्या तरीही केली डोळेझाक रे
वैमानिका तू ऐक सांगतो विमान वेगे हाक रे

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/mtuPbhL2XZ4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 2, 2011

शहर

ही कविता २०११ साली सकाळ प्रकाशनाच्या 'शब्ददीप' ह्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली आहे.

ग्रामीण भागातील समस्यांचा रामबाण उपाय म्हणून शहरांकडे बघितलं जातं. आणि मग गावातून शहरात येणारे लोंढे वाढतच जातात. आपल्या आई-वडिलांनी बहुतेक तेच केलं. पण सुव्यवस्था कोलमडलेल्या ह्या नगरांमध्ये गावातून येणारा माणूस खरच सुखी होतो का?

दहा बाय बाराची लहानशी खोली
     म्हातारीचा बिछाना बाळाची झोळी
मुलांचा अभ्यास बायकोचा स्वयंपाक
     तिथेच झोपतो करून अंगाची मोळी

झोपलो तरी असतो निदान पसरून पाय
     गाव सोडून मी मिळवलं काय?
ऑगस्ट 5, 2011

फाळणी

लवकरच आपण स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहाने साजरा करू. आपली पिढी स्वातंत्र्य गृहीत धरते आणि त्यात काही वावगं नाही, पण त्याचवेळी हे स्वातंत्र्य मिळवताना आपल्याला काय किंमत मोजावी लागली हे विसरून चालणार नाही. फाळणीच्या होमात होरपळलेल्या शहिदांना ही श्रद्धांजली!

दीड कोटी जन होऊनी गेले घरामध्ये बेघर
     पाच लक्ष चढले मृत्युच्या अघोर वेदीवर
सौहार्दाच्या अमृतावरी हलाहल कसे पडले
     कोण शत्रू अन कोण मित्र अन कसला हा संगर

वस्त्र विविधरंगी विणलेले उरले नाही तलम
     अशी फाळणीची अंगावर भरतच नाही जखम