मार्च 8, 2022

पुरुषप्रश्न

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! महिलांचे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत हे एकदा पुरुषांनी मान्य केलं की उरतात ते पुरुषांचे प्रश्न. पण मग आजच्या महिलादिनी हे प्रश्न उपस्थित करण्याचं काय औचित्य आहे? औचित्य आहे. कारण आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाबद्दल कधी ऐकिवात आलेलं नाही.

तुम्हीच सांगा आम्ही पुरूषांनी वागावं तरी कसं
कसंही वागलं तरी शेवटी आमचंच होतं हसं ॥

बायकोचं ऐकावं तर आर्इ म्हणते गेलास तू माझ्यापासून लांब
आईचं ऐकावं तर बायको म्हणते तू तर अगदीच भोळा सांब
तुम्हीच सांगा आम्ही पुरूषांनी वागावं तरी कसं
दोघींना आवडेल असं वाक्य तरी सुचवा एक छानसं ॥

माझी ‘पुरुषप्रश्न’ ही कविता यूट्यूबवर ह्या https://youtu.be/qpK1i8iHqoo ठिकाणी ऐकता येईल.
ऑगस्ट 1, 2021

जेवण

गेल्या काही महिन्यांत मध्यमवर्गीय पुरुषांना घरातील स्त्रीचं महत्त्व काही प्रमाणात समजू लागलं आहे. अनेक पुरुष घरातील स्त्रीला चक्क घरकामात मदत करू लागले आहेत. त्याबद्दल स्वतःचीच पाठ थोपटून घेताना ते अजिबात दमत नाहीत. मात्र संसारात बुडून गेलेल्या ह्या स्त्रीच्या आयुष्यातील काही अगदी साध्या साध्या अपेक्षा समजून घेऊन पूर्ण करण्यात आपण पुरुष खरच यशस्वी झालो आहोत का?!

त्याच्या कमाईतच त्यांचं सुख होतं तिला सतत होती जाण
मग ती आपल्या दोन मुलांच्या विश्वातच झाली रममाण

त्याला मिळाला कुटुंबप्रमुख, अनभिषिक्त राजाचा मान
तिने स्वीकारलं कुटुंबातील तिचं दुय्यम स्थान

कुटुंबाला एकत्र बांधणारा दुवा म्हणून आपण राहावं
तिची एकच अपेक्षा होती, रात्रीचं जेवण सर्वांनी एकत्र करावं

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/YAvi8iAzEjM ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मार्च 21, 2021

कवीराज

आज आंतरराष्ट्रीय कविता दिन आहे. बरेचदा असं होतं की मित्र-मैत्रिणींचा एक छान समूह असतो. सगळं अगदी मजेत चाललेलं असतं आणि अचानक एक दिवस त्या समूहावर संकटाचा डोंगर कोसळतो. त्या समूहातील एका व्यक्तीला कविता होते. म्हणजे अगदी एखाद्याला सर्दी होते किंवा कावीळ होते ना, तशी कविता होते. दुर्दैवाने त्या असाध्य रोगाच्या परिणामांची जराही कल्पना त्या रोगी व्यक्तीला नसते. भोगतात ते बिचारे त्या समूहातील इतर जण ...

कवीराज ते आले आले झाली पळापळ
आप्तमित्र अन् सवंगड्यांच्या छातीत आली कळ ॥

काही लपले खुर्चीखाली टेबलखाली काही
बाथरूममध्ये गेला जो तो बाहेर आला नाही
कवीराज ते आले आले झाली पळापळ
खिडकीतूनच सूर मारती होते जे चपळ ॥

उरले होते त्यांना वाटे रडू या काढून गळे
तरीही कवीला पाहून हसती सारेच बळेबळे
कवीराज ते आले आले झाली पळापळ
केविलवाणे भाव जैसी शिक्षा आता अटळ ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/Pp-ZLpZqC9k ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑगस्ट 1, 2020

लोकमान्य

आज लोकमान्य टिळकांची शंभरावी पुण्यतिथी आहे. असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या ह्या लोकोत्तर पुरुषाला वकिल, गणितज्ञ किंवा शास्त्रज्ञ ह्यापैकी कोणत्याही क्षेत्रात धनसंचय करता आला असता. परंतु आपले देशबांधव दारिद्र्यात आणि अज्ञानात खितपत पडलेले असताना ते करणं त्यांनी नाकारलं आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजकारणात प्रवेश केला. अशा ह्या असामान्य व्यक्तिमत्त्वाला एक अल्पशी श्रद्धांजली...

स्वराज्य माझा हक्क ज्यापुढे विकल्प नाही अन्य
जनमानस जाणून वागले करारी लोकमान्य ॥

इंग्रज पाहती भले स्वत:चे ह्या देशाचे नव्हे
नोकरशाही अत्याचारी स्वत: इंग्रज नव्हे
जाणून होते पिचलेल्या जनतेची करूण कहाणी
इलाज असतो रोगाकरता रोग्याकरता नव्हे

चकित पाहूनी झेप बुद्धीची आंग्ल ते अहंमन्य
जनमानस जाणून वागले करारी लोकमान्य ॥

लोकाभिमुख मते म्हणूनी जहाल त्यांना म्हणती
विलग जाहले नाइलाज राष्ट्रीय सभेतून अंती
जनतेला संघटित करण्या ध्यास घेतला मनी
गणेश उत्सव सुरू करविले आणखीन शिवजयंती

समाजातले जाऊ लागले अकर्म औदासिन्य
जनमानस जाणून वागले करारी लोकमान्य ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/uM_DD1-Fmh4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
सप्टेंबर 28, 2019

हा नाही अहंकार

आज शहीद भगत सिंग जयंती आहे. त्यांच्या स्मृतीस सादर प्रणाम. साँडर्स हत्या प्रकरणी त्यांच्यावर खटला सुरु होता. दोन दिवसांनी काय निकाल लागणार आहे हे सांगण्याकरता कुण्या ज्योतिष्याची गरज नव्हती. बाबा रणधीर सिंगांनी त्यांना ईश्वराला शरण जाण्याचा सल्ला दिला. भगत सिंगांचा नकार बाबांना दर्पोक्तीपूर्ण वाटला. भगत सिंगांच्या मनात विचारमंथन सुरु झालं ज्यातून जन्माला आला एक निबंध ‘मी नास्तिक का आहे’. त्या गद्यरुपी कवितेचा काव्यरूपी संक्षेप करण्याचा हा नम्र प्रयत्न...

नास्तिक माझे बोल ऐकुनी बाबा मजला वदले
देवाच्या चरणी अर्पण कर दिन शेवटचे उरले
अहंकार हा तुझ्या मनीचा आड येई भक्तीच्या
तेच खरे पुण्यात्मे ज्यांनी त्या शक्तीला स्मरले

प्रामाणिक माझी नास्तिकता ठाम मनात विचार
	हा नाही अहंकार ॥

पतितांचा उद्धार जपावी मानवतेची नाती
प्रयत्न करणे केवळ असते तुमच्या आमच्या हाती
यशही मिळेल तुम्हां मिळाली जर नशिबाची साथ
देव कशाला हवा मारण्या अपयश त्याच्या माथी

जबाबदारी झटकून टाकी हा कैसा आजार
	हा नाही अहंकार ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/jhvmLiuBCi0 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑक्टोबर 2, 2018

साबरमतीचा संत

अल्बर्ट आईन्स्टाईनच्या अमेरिकेतील घरात तीन व्यक्तींच्या तसबिरी लावलेल्या आहेत असं म्हणतात. त्यापैकी दोन आहेत मायकल फॅरेडे आणि जेम्स मॅक्सवेल ह्या शास्त्रज्ञांच्या तर तिसरी आहे महात्मा गांधींची. अशा ह्या जगन्मान्य महात्म्याचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष आजपासून सुरु होत आहे. त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली ही आदरांजली...

कष्ट हरण्या जनतेचे साहिले जाच अनंत
     लढला शस्त्राविना पाहा साबरमतीचा संत ॥

सौम्य भाव वदनी वसती अन् शरीरयष्टी किरकोळ
     भारदस्त जरी आवाज नव्हता कणखर तरीही बोल
बटुमूर्ती ती पाहून हसती इंग्रज हिणवून त्याला
     किंमत लागे मोजावी सत्तेचे देऊन मोल

अखंड चळवळ चाले नाही देत काही उसंत
     लढला शस्त्राविना पाहा साबरमतीचा संत ॥
जून 2, 2018

नसणार तू ….

“पिल्लं मोठी झाली की घरटं सोडून जाणारच”, हे बोलायला आणि ऐकायला किती सोपं वाटतं. पण आपलं रिकामं घर बघून ज्याचं मन जळतं त्यालाच कळतं...

त्याच भिंती त्याच खोल्या
     त्याच जागा दिसती डोळ्यां

त्या कपाटामागुती शोधी मी जर लपलीस तू
     पण तिथे नसणार तू ||


त्याच खुर्च्या तेच टेबल
     पुस्तकांवर तेच लेबल

आर्इही चिडणार नाही पसरल्या जर वस्तू तू
     पण तिथे नसणार तू ||
फेब्रुवारी 26, 2018

सागरा प्राण तळमळला

भारतमातेची परकीय जोखडातून मुक्तता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून विकास ह्या दोन ध्येयांकरता वाटेल त्या हालअपेष्टा सहन करण्याची तयारी ठेवणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज पुण्यतिथी आहे. ‘न धरी शस्त्र करी मी’ अशा ह्या वीराचा इंग्रजांनी इतका धसका घेतला होता की त्यांना पार अंदमानात पन्नास वर्षांकरता काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. अंदमानातही वीर सावरकर अमानुष अत्याचार सहन करत अथक कार्यरत होते. मात्र मातृभूमीपासून दूर ठेवणाऱ्या सागराला पाहिलं की मनात एकच विचार येत होता....

केवळ सत्तावीस वयाला नशीब फिरवी पाठ
दहा साल पण सुटकेचे सन एकोणीसशे साठ
काळ्या पाण्याकरता सोडी भारतभूचा काठ

दिसेल का कधी भारतमाता आत्मा गहिवरला
एकच विचार मनी सागरा प्राण तळमळला ||
ऑगस्ट 19, 2016

गुलज़ारजी

काल गुलज़ारजींचा वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काही दिवसांपूर्वी त्यांचा कवितासंग्रह वाचायचा योग आला. त्यांच्या कविता वाचून माझ्या मनात आलेले हे काही विचार ...

गुलज़ारजी, तुमचं कवितांचं पुस्तक वाचलं

कडक उन्हाचे चटके अवचित आलेल्या सरी ... जणू श्रावण आला
ओठांच्या कडांना हसू डोळ्यांच्या कडांना पाणी ... एकाच वेळी
अतिभव्य ब्रह्माण्डाएवढं सामावणारं एका सूक्ष्म कणात

शब्दांना एवढं वजन असतं ... ठाऊक नव्हतं
शब्दांना रंग आकार स्पर्श असतो ... ठाऊक नव्हतं
शब्दांत भावना व्यक्त करता येतात, ठीक आहे
शब्द श्वास घेतात ... ठाऊक नव्हतं