जुलै 7, 2018

चॉकलेट

जागतिक चॉकलेट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! युरोपमध्ये म्हणे आजच्या दिवशी चॉकलेटचं आगमन झालं. असो... आपल्याला काय करायचंय! चॉकलेट खाण्याकरता आपल्याला निमित्त पुरतं. आबालवृद्धांना आवडणारा हा पदार्थ कधी खावा हे सांगणारी ही जंत्री...

वाढे वजन करा उपास ।
     पण झकास चॉकलेट खावे ॥
वजन घटता मनी संतोष ।
     करुनी जल्लोष चॉकलेट खावे ॥

वय जाहले बाल्य आठवे ।
     मुलांच्या सवे चॉकलेट खावे ॥
वयाचे काय आकड्यांचा खेळ ।
     मिळता वेळ चॉकलेट खावे ॥
एप्रिल 23, 2018

पुस्तक

जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! किती पोकळ वाटतात ह्या शुभेच्छा... जागतिक भीमसरट दिनाच्या शुभेच्छा म्हटल्यासारखं... कुणे एके काळी भाषेची, समाजाची, राज्याची श्रीमंती लिहिल्या आणि वाचल्या जाणाऱ्या पुस्तकांवरून ठरत असे. आता मात्र संगणक आणि स्मार्टफोन्सच्या वावटळीत पुस्तकांची वाळलेली पानं भिरभिरत उडून गेलेली दिसतात. अशाच एका पुस्तकाचं हे आत्मकथन....

अजून वाटे मनाला
	सांगावे जनाला
मित्रच तुमचे आम्ही
	शंका का कुणाला

यावे परत फिरुनी
	हातामध्ये धरुनी
अमृतप्राशन तुम्ही
	अन् पाहावे करुनी

वाटत नाही परंतु मिळतील आम्हाला वाचक
मी तर आहे कपाटामधील जीर्ण शीर्ण पुस्तक ||

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/lWQzAtCCABA ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ऑक्टोबर 7, 2016

पिवळे पडलेले फोटो

चपलाही न घालता खेळणं, घरी टीवी, फोन, फ्रिज नसणं, स्टेशनवरील नळातून पाणी पिणं अशा मागील पिढीने अनुभवलेल्या गोष्टी नवीन पिढीला सुरस आणि चमत्कारिक कथांप्रमाणे भासतात. आता जमाना डिजिटल फोटोग्राफीचा आहे. जुनी पिढी केवळ अल्बममध्ये चिकटवून पिवळ्या पडलेल्या फोटोंमध्ये बंदिस्त आहे ...

घरी नोकर चाकर नव्हते उगीच उठता बसता
     आपणच पिटाळले जायचो काही आणायचं असता
आईवडिलांनी चोपलं घरी कुरवाळायची आजी
     शोधलीच नव्हती कोणी तोवर चाईल्ड सायकॉलॉजी
वाचन भरपूर गोट्या चिंगी फास्टर फेणे खास
     मिळे बघायला टीवी तेव्हा फक्त दोन तास
कोणत्याच घरी नव्हता तेव्हा साधा काळा फोन
     घरोघरी पण आपली आवड आणि रेडिओ सिलोन
आता वाटतं खरंच का हो आपण असे होतो
     जसे पिवळे पडलेले अल्बममधले फोटो

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/LZQ4XaMfkME ह्या ठिकाणी ऐकता येईल.
फेब्रुवारी 4, 2011

मोबाईल फोन

ही कविता वर्षं भावे ह्यांनी संगीत देऊन ‘अल्लड’ ह्या अवंती पटेलने गायलेल्या गीतसंचात समाविष्ट केली आहे.

आधी यंत्रयुग आणि मग संगणकयुगामुळे मानवाच्या सुविधा वाढत गेल्या आणि मग माणूस अधिकाधिक ह्या उपकरणांचा गुलाम होत गेला. सध्याचं युग आहे उपकरणांच्या सूक्ष्मीकरणाचं आणि ह्या युगाचा बिनीचा शिलेदार आहे भ्रमणध्वनी, अर्थात मोबाईल फोन. दूरध्वनी, घड्याळ, टीवी, कॅल्क्युलेटर, संगणक, संगीत प्रणाली, कॅमेरा वगैरे उपकरणं ह्या little championने आधीच गिळंकृत केली आहेत. आता घरातून बाहेर जाणारी व्यक्ती एकवेळ पैशांशिवाय राहू शकेल, पण मोबाईलशिवाय... अशक्य!

आधी तिच्याशी मैत्रीचे जुळवावयास धागे
     कोपऱ्यावरती तासंतास उभं राहावं लागे
आता एसेमेसनेच दिलं घेतलं जातं दिल
     शरीराचा एक हिस्सा झाला आहे मोबाईल

आजूबाजूला पाहा तुम्हाला लगेच दिसून येर्इल
     शरीराचा एक हिस्सा झाला आहे मोबाईल
फेब्रुवारी 4, 2011

पहिली गाडी

मध्यमवर्गीयांमध्ये दोन ठळक उपवर्ग आहेत - एक ज्यांच्याकडे गाडी नाही तो आणि दुसरा अर्थातच ज्यांच्याकडे आहे तो. टीवी, फ्रीज, फोन आता सगळ्यांकडे असतात. पण गाडीचं तसं नाही. गाडी असणं म्हणजे श्रीमंतीच्या वाटेवरचं पहिलं पाऊल. पहिल्या उपवर्गाची दुसऱ्यात जाण्याकरता नेहेमीच धडपड सुरु असते. आणि मग जेव्हा पहिली गाडी घरी येते तेव्हा त्या गाडीचं अप्रूप पुढे आयुष्यभर वाटत राहिलं नाही तरच नवल.

पहिला चरा पडला त्यावर
     घासून गेली बस
अन्न पाणी बेचव झालं
     आठवतोय दिवस

नंतरसुद्धा बरेच झाले
     आघात तिच्यावर
पण पहिला चरा पडला होता
     माझ्या काळजावर

अजून शिव्या ड्रायवरच्या त्या नावाने मी घालतो
     माझी पहिली वहिली गाडी गोंडस छान आल्टो