नवनिर्मितीचा तिढा
जानेवारी 1, 2011जनरेशन गॅप – एक वरदान
जानेवारी 1, 2011चराचर
इयत्ता तिसरीतल्या माझ्या मुलीला शाळेत living things (सजीव अर्थात चर) आणि non-living things (निर्जीव अर्थात अचर) ह्यामधला फरक शिकवला जात होता. पक्क्या पाठांतरानंतर ती घडाघड सांगत होती – सजीवांना जगण्याकरता अन्नाची गरज असते; सजीव प्रजनन करतात; सर्व मानव निर्मित वस्तू अजीव आहेत; हालचाल करणं हा सजीवांचा गुणधर्म आहे; अजीव श्वासेच्छवास करत नाहीत; सजीव वाढत जाऊन मरण पावतात. शाळेत शिकवायला व्यवहार्य पर्यावरणापुरता (practical environment) शास्त्रज्ञांनी जीवन म्हणजे काय हा प्रश्न सोडवलेला आहे. परंतु मानवाला प्राप्त ज्ञानाच्या मर्यादा आता शास्त्रज्ञही जाणून आहेत. साडेतीनशे वर्षं अबाधित राहिलेले आणि आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचे आकलन चपखलपणे समजावून सांगणारे न्यूटनचे गतीचे नियम जर आइनस्टाइनच्या एक पानी मिमांसेने अर्थहीन ठरू शकतात तर जीवनासारख्या गहन विषयाचा काय पाड.
पृथ्वीवर जीवनाचा आरंभ कसा झाला ह्याबद्दल बरेच तर्कवितर्क आहेत. तसं पहायला गेलं तर सजीव आणि निर्जीवांच्या भौतिक जडणघडणीकरता जे मुलभूत घटक लागतात त्यात फारसा फरक नाही. सर्वात प्रगत आणि जीवसृष्टीचं शेंडेफळ असलेल्या मानवजातीचं शरीर निसर्गात मुबलक प्रमाणात मिळणार्या हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन वगैरे मूलद्रव्यांचंच बनलेलं आहे. मात्र एक सजीव शरीर तयार होण्याकरता ह्या सार्या सामग्रीची जी प्रचंड गुंतागुंत जरूरीची आहे ती विस्मयचकित करणारी आहे. मानवी शरीराच्या पेशीतील सर्वात महत्वाचे घटक म्हणजे गुणसूत्र (DNA) आणि प्रथिनं (proteins). मानवी शरीर बनण्याकरता लक्षावधी सर्वस्वी भिन्न अशा प्रथिनांची गरज असते. आणि हे प्रत्येक प्रथिन गुंतागुंतीच्या बाबतीत थक्क करणारं असतं. अर्थात एवढी प्रचंड गुंतागुंत शक्य होण्याकरता कालावधीही तसाच प्रचंड लागला असणार. सध्याच्या सर्वमान्य कयासाप्रमाणे साधारण चार अब्ज वर्षांपूर्वी सजीव सृष्टी आकार घेऊ लागली असावी. त्या वेळी जे एकपेशीय जीव निर्माण झाले ते गुंतागुंतीच्या बाबतीत तुमच्या आमच्यापेक्षा भलतेच मागासलेले होते. त्या प्रकारचे जीव बनण्याकरता लागणारे घटक पृथ्वीवर आजही मुबलक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे असं वाटण्याची शक्यता आहे की पृथ्वीच नाही तर पृथ्वीसारख्या इतर ग्रहांवरही जीवन केवळ शक्यच नाही तर अपरीहार्य आहे. आणि इथेच जीवशास्त्राला भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न अनुत्तरीत रहातो.
आत्तापर्यंतचे जे काही जीव पृथ्वीतलावर वावरले आहेत – अगदी एकपेशीय जीवाणूंपासून ते वृक्षवल्ली, जलचर, डायनॉसॉर, पक्षी, प्राणी आणि प्रगत मानवापर्यंत – त्यांच्या गुणसूत्रांची चिकित्सा केली तर ते सारे जीव त्या चार अब्ज वर्षांपूर्वी तयार झालेल्या पहिल्या सजीवांचेच वंशज आहेत असं दिसून येतं. गेल्या चार अब्ज वर्षात नवीन जीवनाला पुन्हा सुरूवात झाल्याची एकही घटना घडलेली नाही. अर्थात तुमच्या घरातलं मोरीमधलं झुरळ, कुंडीमधली तुळस, तुमचा कुत्रा आणि तुम्ही हे सारे एकमेकांचे दूरचे का होर्इना पण नातेवार्इक आहात. जीवन अपरिहार्य वाटत होतं अशा पृथ्वीवरच जर सृष्टीच्या निर्मितीपासून ही घटना एकदाच घडली असेल तर ते जीवन निर्माण होणं हे अपरिहार्य म्हणण्यापेक्षा त्याला एक अपघात म्हणणंच जास्त संयुक्तिक आहे. काही वैज्ञानिकांच्या मते जीवन ही एक हाताबाहेर गेलेली रासायनिक प्रक्रिया (a chemical reaction gone awry) आहे.
जीवन ही जर एक रासायनिक प्रक्रिया असेल तर जगात कैक प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया अव्याहतपणे सुरू असतात. अगदी पृथ्वीच्या उदरातल्या लाव्ह्यापासून ते सूर्यासारख्या तार्यापर्यंत सार्या घडामोडी रासायनिक प्रक्रियांमुळेच सक्रीय असतात. मग सजीव आणि निर्जीवांमध्ये फरक कसा करावा? सजीव आणि निर्जीवांची जी बाळबोध लक्षणं वर नमूद केली आहेत, त्यांच्यावर नजर टाकली तर भरपूर अपवाद सापडतात. दगड, पर्वत, सागर, भूखंड, ग्रह, तारे ह्या सार्या निर्जीव गोष्टी ‘जन्म घेतात’, ‘जगतात’ आणि ‘मरणही पावतात’. सजीवांना श्वासोच्छवासाकरता प्राणवायूची गरज असते, पण चार अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा जीवसृष्टी अस्तित्वात आली तेव्हा पृथ्वीवर औषधापुरताही प्राणवायू नव्हता. तरीही कोट्यानुकोटी वर्षं ‘सजीव’ अस्तित्वात होते. सजीवांचा एक महत्वाचा गुणधर्म म्हणजे सजीव प्रजनन करतात. सृष्टीमधलं पर्जन्यचक्र (वाफ – ढग – पाऊस – पाणी – वाफ) पाहिलं तर अव्याहतपणे सुरू असलेली ही क्रिया प्रजननासारखीच वाटू लागेल. एका तार्याच्या स्फोटातून पुढे नवीन तारे निर्माण होतात हाही प्रजननाचाच एक प्रकार असू शकतो.
सजीवांचं आणखीन एक आणि सर्वात महत्वाचं लक्षण समजलं जातं ते त्यांची विचार करण्याची, भावना जाणवण्याची शक्ती. प्रगत जीवसृष्टीकरता (पक्षी, प्राणी, मानव) कदाचित हे लक्षण लागू पडेल पण सर्वसामान्य जीवसृष्टीचा विचार केला तर त्यांचं ‘वागणं’ हे विशिष्ट परिस्थितीची प्रतिक्रिया ह्याहून अधिक काही नसतं. लाजाळूला स्पर्श झाला की काही विशिष्ट रासायनिक प्रक्रिया सुरू होते आणि धोक्याची जाणीव होऊन पानं मिटतात, काही विशिष्ट रसायनांचा ग्रंथींद्वारे स्त्राव सुरू झाला की कीटक प्रणयाराधन सुरू करतो. मानव आणि काही प्रमाणात चिम्पान्झींचं वागणं सोडलं तर बाकी सर्वसामान्य सजीवांचं वागणं हे निर्बुद्ध स्वयंचलन (mindless automation) ह्या सदरात मोडतं. आणि मानवांच्याही भावना म्हणजे मेंदूत होणार्या काही रासायनिक प्रक्रीयांचीच प्रतिक्रिया असते (मुन्नाभार्इच्या डॉक्टरांच्या शब्दांत सांगायचं तर ‘केमिकल लोचा’!). त्याचं संपूर्ण स्वरूप अजून वैज्ञानिकांना समजलेलं नाही इतकंच. विचार करण्याच्या बाबतीत केवळ सत्तर वर्षांहूनही कमी इतिहास असलेल्या संगणकांनी मानवावरही कुरघोडी करण्यास सुरूवात केली आहे. डीप ब्लू (Deep Blue) संगणकाने १९९७ साली महान बुद्धीबळपटू गॅरी कास्पारोवला सहा डावांच्या स्पर्धेत हरवून मानवजातीकरता भविष्यकाळातील धोक्याची घंटाच जणू वाजवली.
लहानपणापासून आपल्या मनावर सजीव आणि निर्जीवांमधील फरक बिंबवला जातो. पण अजून शाळेत जायला सुरवात न केलेल्या एखाद्या लहानग्याचं वागणं लक्ष देऊन पहा. त्यांच्याकरता मनुष्य, इतर सजीव आणि निर्जीव वस्तू ह्मांत काही भेदभाव नसतो. सजीवांप्रमाणेच त्यांच्याशी निर्जीव वस्तूही ‘वागतात’. त्याच्याकरता फसफसणारा नळ अंगावर चढलेल्या झुरळाइतकाच भीतीदायक असतो आणि रोजचा दूध पिण्याचा ग्लास खेळायला येणार्या सवंगड्याइतकाच प्रिय असतो. आणि लहान मुलांचंच कशाला, आपणही बरेचदा हा फरक विसरतो. आपल्या वाहनावर अपत्याप्रमाणे प्रेम करणारे लोक आपल्यापैकी प्रत्येकाने बघितले असतील. चालताना खड्ड्यात पाय गेला तर त्या खड्ड्याकडे रागाने बघणारे लोकही बरेच दिसतील. कपाटाचा तोच खण कधी हात लावताच झर्रकन उघडतो तर कधी दहा वेळा ओढला तरी अडकून बसतो – हे त्या ‘निर्जीव’ खणाचं ‘रूसणं’ तर नसेल ना? असंख्य वेळा ज्या जिन्यावरून आपण चढ उतार करतो त्यावरच एखाद्या दिवशी धडपडतो – हे त्या ‘निर्जीव’ जिन्याचं ‘रागावणं’ तर नसेल ना?
शास्त्रज्ञ जेव्हा अंतराळात सजीव सृष्टी शोधण्याचा प्रयत्न करतात तेव्हा पृथ्वीसदॄष्य परिस्थिती असलेल्या ग्रहांचा शोध घेतात – जिथे ऑक्सिजन असेल, पाणी असेल, जिथलं तापमान पृथ्वीसारखं असेल. पण जीवन फक्त आपल्याला जसं समजतं त्याच स्वरूपाचं असू शकतं असं गॄहीत धरणं हे मानवाच्या ब्रह्मांडातील स्वत:च्या स्थानाला अवास्तव महत्व देण्याच्या प्रवॄत्तीचं प्रतिक म्हणता येर्इल. दुसर्या एखाद्या जीवसृष्टीकरता अमोनिया हाच प्राणवायू नसेल कशावरून, किंवा आपण पाणी पितो तसे ते जीव तेल पीत नसतील कशावरून? इतकंच काय आपल्याला आपल्या सभोवतालचं जग समजतं ते आपल्या दृष्टी, ध्वनी, गंध, चव आणि स्पर्श ह्या पाच जाणीवांमुळे. आपल्याला न समजणार्या सहाव्या जाणीवेच्या पातळीवर एखादी जीवसृष्टी नसेल कशावरून? आइनस्टाइनने उकललेलं गुरूत्वाकर्षण (gravity), समय (time) आणि अंतराळ (space) हयांचं कोडंच जर एका मानवाने समजावून सांगूनही आपल्या डोक्यावरून जात असेल तर आपल्या जाणीवांच्या मर्यादांमुळे आणखीन कितीतरी ज्ञानापासून आपण वंचित असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
भारतीय तत्वज्ञानात चर आणि अचर ह्मांत फारसा भेदभाव केलेला दिसत नाही. म्हणूनच पौराणिक गोष्टींमधले समुद्र बोलतात आणि पर्वतांनाही अपत्यं होऊ शकतात. सुप्रसिद्ध विज्ञानकथा लेखक आर्थर क्लार्कच्या स्पेस ओडिसी (A Space Odyssey) मालिकेत गुरू ग्रहावरच्या ढगांमध्ये ‘जीव’ असल्याची कल्पना चितारलेली आहे. जीवन म्हणजे काय ह्याचा ह्या मार्गाने शोध घेणारे जे वैज्ञानिक आहेत त्यांना पृथ्वीवरच अशा एखाद्या जीवसृष्टीचा शोध लागला तर जगाकडे बघण्याच्या आपल्या दृष्टीकोनातच अमुलाग्र बदल घडेल.
मग सकाळी गाडी सुरू होत नाही म्हणून वैतागून तिला लाथ मारण्यापूर्वी आपल्याला शंभर वेळा विचार करावा लागेल ह्यात शंका नाही!