लघुलेख

जानेवारी 1, 2011

जनरेशन गॅप – एक वरदान

सुनील गावस्करला एकदा एका सहसमालोचकाने भोचकपणे विचारलं की आजकालच्या क्रिकेटपटूंचं क्षेत्ररक्षण पाहून तुम्हाला तुमच्या क्षेत्ररक्षणाची लाज वाटत असेल नाही. मिस्किलपणची वानवा नसलेल्या सुनील गावस्करने त्याला ताबडतोब उत्तर दिलं की भारतातील प्रत्येक नवीन पिढी आधीच्या पिढीवर प्रत्येक क्षेत्रात कुरघोडी करत असते. आमच्या वेळेला आम्हाला सांगितलं जायचं की आमच्या आधीच्या पिढीतले काही खेळाडू फलंदाजांनी चारपेक्षा अधिक धावा काढू नयेत म्हणून सीमारेषेवर अडवलेला चेंडू चक्क लाथेने सीमारेषेच्या पार उडवत असत. त्या मानाने आम्ही भलतेच चुश्तिले फुर्तिले होतो.
जानेवारी 1, 2011

चराचर

इयत्ता तिसरीतल्या माझ्या मुलीला शाळेत living things (सजीव अर्थात चर) आणि non-living things (निर्जीव अर्थात अचर) ह्यामधला फरक शिकवला जात होता. पक्क्या पाठांतरानंतर ती घडाघड सांगत होती - सजीवांना जगण्याकरता अन्नाची गरज असते; सजीव प्रजनन करतात; सर्व मानव निर्मित वस्तू अजीव आहेत; हालचाल करणं हा सजीवांचा गुणधर्म आहे; अजीव श्वासेच्छवास करत नाहीत; सजीव वाढत जाऊन मरण पावतात. शाळेत शिकवायला व्यवहार्य पर्यावरणापुरता (practical environment) शास्त्रज्ञांनी जीवन म्हणजे काय हा प्रश्न सोडवलेला आहे.
जानेवारी 1, 2011

नवनिर्मितीचा तिढा

आदिमानवांची एक टोळी दगड धोंडे घेऊन शिकार करायला निघाली. खाचखळग्यातून जात असता त्यातल्या एकाच्या हातातला दगड त्याच्याच पायावर पडला आणि तो जे कळवळून ओरडला ते अगदी सुरात ओरडला. बाकीच्यांना त्याचं ते सुरेल ओरडणं फार भावलं आणि त्यांनी आपल्या हातातले दगड धोंडेही त्याच्या पायावर मारण्यास सुरवात केली. त्या कळवळणार्‍या आदिमानवाचं काय झालं असेल ते असेल पण अशा प्रकारे संगीताचा जन्म झाला.