सापळा
ऑगस्ट 16, 2013मृतात्मा
सप्टेंबर 4, 2015साठा उत्तराची कहाणी
आज मराठीचा पेपर होता. शेवटचा. म्हणजे परीक्षेचा हत्ती गेला आणि फक्त शेपूट राहिलं होतं. माझी आजी मराठीची शिक्षिका त्यामुळे माझा मराठीचा अभ्यास नेहेमी तीच घेत असे. आजीकडून मराठी शिकणं म्हणजे मी आपली मूग गिळून गप्प बसत असे. मी तिच्या मराठीबद्दल बोलायचं म्हणजे काजव्याकडून सूर्याची समीक्षा. लहान तोंडी मोठा घास कोण घेणार. नाही तरी तिला मी काहीही विचारलं तरी गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता हे ऐकावं लागे.त्यामुळे मी आपली तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असे. तिच्या मते एकंदरच हल्लीच्या लोकांना आणि विशेषत: माझ्या आर्इ-बाबांना मराठी लिहिणं तर सोडा धड साधं बोलताही येत नाही. आणि ह्माचं कारण होतं पुस्तकं न वाचणं. ती नेहेमी म्हणत असे, अगं वाचण्यात किती मजा असते पण गाढवाला गुळाची चव काय. मी मराठीची एम् ए आणि तुझं मराठी हे असं. दिव्याखाली अंधार असतो हेच खरं. परीक्षेचा रिझल्ट आला की बाकी काही विचारलं नाही तरी मराठीचे मार्क ती न चुकता विचारत असे. आणि माझ्या मार्कांपेक्षा दुसर्या कोणाला माझ्यापेक्षा जास्त मार्क मिळाले नाहीत ना ह्माची काळजी तिला जास्त असे. जर दुसर्या कोणाला जास्त मार्कं असतील तर तिला कमीपणा वाटत असे आणि जर नसतील तरी मला म्हणायची की लगेच ‘ग’ची बाधा नको व्हायला. तुला जर सर्वात जास्त मार्कं मिळत असतील तर बाकीच्यांचं मराठी कसं असेल ह्माची मला कल्पनाच करवत नाही. वासरांत लंगडी गाय शहाणी आहेस झालं. पराचा कावळा कसा करावा हे माझ्या आजीकडून शिकावं. आता अभ्यास करणं काय सोपं असतं? शेळी जाते जीवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड. शहाण्याला शब्दांचा मार पण मला कधी आजीच्या बोलण्याचा राग येत नसे. कितीही वैतागली तरी माझा मराठीचा अभ्यास दुसर्या कोणी घेतलेला तिला अजिबात खपत नसे. धरलं तर चावतं सोडलं तर पळतं अशी तिची गम्मत होती. मी खरं तर सर्वात जास्त मार्कं मिळवण्याच्या दृष्टीने कधीच प्रयत्न करत नसे. आपण आपलं अंथरूण पाहून पाय पसरावेत. आपली भाषा किती सुंदर, प्रगल्भ आहे हे ती मला सतत सांगत असे. इंग्रजीचं नवं ते हवं हे मान्य केलं तरी आपलं जुनं ते सोनं ह्मावर तिचा ठाम विश्वास होता. म्हणी हा तर तिचा अगदी लाडका विषय. ती बोलतानाही सतत काहीबाही म्हणी वापरत असे ज्यातील बहुतेक सार्या माझ्या डोक्यावरून जात असत, अगदी पालथ्या घड्यावर पाणी. त्यामुळे मराठीच्या पेपरापेक्षा नंतर आजी काय म्हणेल ह्माचीच काळजी मला जास्त वाटत असे. तसे मला मराठी विषयात चांगले मार्कं मिळत असत पण जिथे पिकतं तिथे विकत नाही हेच खरं. आजही त्याच काळजीत मी शाळेत जाण्याची तयारी करत होते.
संन्याशाचा लग्नाला शेंडीपासून सुरूवात. आधी मला माझी कंपॉस बॉक्सच सापडेना. रोज मरे त्याला कोण रडे म्हणून आर्इ तर आधी लक्षच देत नव्हती. पण शेवटी तिनेच रागारागाने शोधून ती कंपॉस बॉक्स माझ्यासमोर आपटली तर मग मला शाळेचं आयकार्ड जागेवर नाही असा शोध लागला. आर्इ घरभर शोधत असताना शेवटी ते मलाच माझ्या बॅगेत सापडलं. काखेत कळसा आणि गावाला वळसा. उशीर झाला होता पण परीक्षा तर होती म्हणून किचनमधून बाहेर येताना देखल्या देवा दंडवत घालून आले. शेवटी माझं विंचवाचं बिर्हाड पाठीवर घेऊन लिफ्टने वेळ लागेल म्हणून धावत जिन्याने खाली जायला लागले तर मध्येच पाय घसरून सात-आठ पायर्या धडधडत खाली घसरले. माझ्या हातात घातलेला सानिकाने दिलेला फ्रेंडशिप बॅंड कुठेतरी पडला. शोधायला वेळच नव्हता मग तो तसाच अक्कलखाती जमा केला आणि खाली उतरले. नशीब काही लागलं नाही. आंधळ्याच्या गायी देव असाच राखत असावा. धावत धावत शाळेच्या बसकडे जात होते तोच वरून आर्इची हाक ऐकू आली. मी जेवणाचा डबा घरीच विसरून आले होते. मग आर्इ डबा घेऊन खाली येर्इपर्यंत बसवाल्या काकांना थांबवून ठेवलं. बसमधली सगळी मुलं माझ्याकडे खाऊ का गिळू अशा नजरेने बघत होती. आणि एवढं करून शाळेत पोहोचले तर दुष्काळात तेरावा महिना. माझं परीक्षेचं लकी पेन घरीच विसरले असं माझ्या लक्षात आलं.
वर्गात जाऊन बघते तर सगळ्यांनी आपापल्या जागा बदलल्या होत्या. बदलणारच. गुळाला मुंगळे चिकटावेत तसं कादंबरीच्या आजूबाजूला बसायला सगळ्याच मुलींना हवं असे. ती होती हुशार पण अगदी वेंधळी, त्यामुळे तिच्या पेपरावरची उत्तरं सगळ्यांना सहज वाचता येत असत. म्हणजे आंधळं आपलं दळतंय आणि कुत्री पीठ खातायत. एकदाची परीक्षा संपली की मात्र कोणी तिच्याकडे ढुंकूनही पाहायचं नाही. गरज सरो आणि वैद्य मरो. अगदी कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी. कधी कधी मलाही तिची मदत घ्यावी लागत असे. काय करणार, अडला हरी गाढवाचे पाय धरी. आज मात्र तिच्या शेजारी बसायला इतक्या जणींची चढाओढ पाहून मला खरंच अती झालं आणि हसू आलं. गरजवंताला अक्कल नसते. त्या चढाओढीत ऋजुता तर बेंचवरून खाली पडली. अती तिथे माती दुसरं काय. त्या मुलींचा चावटपणा मला चांगलाच ठाऊक होता पण माझी आपली अळी मिळी गुपचिळी. मी त्या फंदात कधीच पडले नाही. जर असेल माझा हरी तर देर्इल खाटल्यावरी. मी इकडे तिकडे पाहिलं. मला खरं तर पूजाच्या जवळ बसायचं होतं. ती मला खूप आवडायची. ती अभ्यासात हुशार होती त्यामुळे आर्इलाही मी तिच्याशी मैत्री करावी असं वाटायचं. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला तर वाण नाही पण गुण नक्की लागेल असं तिला वाटायचं. तसं पाहायला गेलं तर परीक्षेच्या वेळेला पूजाचं अभ्यासाची पुस्तकं सोडून कुठेही लक्ष नसायचं. आज मात्र तिने आपण होऊन मला आपल्या शेजारी बसायला बोलावलं. हे म्हणजे अगदी आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन असं झालं. मग काय मी अगं अगं म्हशी मला कुठे नेशी म्हणत तिथे जाऊन बसले. खरं तर गार्गीला पूजाची आणि माझी फ्रेंडशिप आवडत नाही. पण आज मात्र पूजाने गार्गी आणि मी वर्गात एकत्र आलो असताना फक्त मला जवळ बसायला बोलावलं. तिची बहुतेक गार्गीबरोबर अती परिचयात अवज्ञा झाली असावी. दोघींच्या भांडणात माझा तिसरीचा लाभ झाला असावा. गार्गी तशी अभ्यासात ढ होती. नुसतीच स्टार्इल मारायची. अती शहाणा त्याचा बैल रिकामा असतो तशी. आणि त्यात खाली मुंडी पाताळ धुंडी. बोलायची इतकी गोड पण कडू कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच असतं. कावळ्याने कितीही अंग घासलं तरी तो बगळा थोडाच होणार आहे. असल्या कपटी मैत्रीणीपेक्षा दिलदार शत्रू मला बरा वाटला असता. इतके दिवस स्वत:ला आमची मैत्रीण म्हणवून घेत होती पण कुत्य्राचं शेपूट वाकडं ते वाकडंच. मी नसले की सारखे माझ्याविरूद्ध पूजाचे कान भरत असे. स्वत:च्या डोळ्यातील मुसळ तिला दिसत नसे पण माझ्या डोळ्यातील मात्र कुसळही दिसायचं. कोळसा कितीही उगाळला तरी काळाच राहातो हेच खरं. मी तर ठरवलं होतं की आपणही जशास तसं वागायचं. काट्याने काटा काढलेला बरा. त्यामुळे आमचं अगदी कुत्य्रा मांजराचं वैर होतं. जाऊ दे ना, किती दिवस शिळ्या कढीला ऊत आणायचा.
पूजा मात्र मला खरंच खूप आवडायची. त्यामुळे तिने बोलावल्यावर मला अगदी आनंद झाला. अर्थात मी काही अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणार नव्हते. पेपर संपल्यावर जर पूजाने माझ्याबरोबर लंच केलं तरच माझा विश्वास बसला असता. हो ना, मग हातच्या काकणाला आरसा लागला नसता. आणि मग मी गार्गीला म्हणाले असते, बघ, हा सूर्य आणि हा जयद्रथ. गार्गी गेली त्या कादंबरीजवळ बसायला. बरं झालं, सुंठीवाचून खोकला गेला. काही वेळाने मराठीच्या टीचर आल्या तरी वर्गातला गोंधळ थांबेचना. त्यांना कोणीच जुमानत नसे. त्यांचा वर्ग म्हणजे अगदी अंधेर नगरी चौपट राजा. मग वर्गातील मुलींचा कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नसे. यथा राजा तथा प्रजा.
शेवटी टीचरनी वर्गात पेपर वाटायला सुरूवात केली. आधी उत्तरपत्रिका आणि मग प्रश्नपत्रिका. माझा बेंच वर्गात अगदी शेवटी होता. भित्यापाठी ब्रम्हराक्षस असतो असं म्हणतात. पहिल्या रांगेतील मुलांना पेपर मिळाला आणि माझ्या मनात पाल चुकचुकू लागली. पहिल्या रांगेतील मुलं जात्यात गेली होती आणि मी सुपात असूनही हसत नव्हते. पेपर छोटा आणि सोपा असू दे अशी मी मनाशीच प्रार्थना करत होते. मनी वसे ते स्वप्नी दिसे. मला खरंच अशी आखुडशिंगी आणि बहुदुधी गाय मिळणार होती का? मी पेपरवर नजर फिरवणार एवढ्यात मला बार्इंचे शब्द ऐकू आले की आजचा पेपर म्हणींवर आधारित आहे. म्हणजे भरवशाच्या म्हशीला टोणगा. तुम्हाला खरं सांगते त्यानंतर नक्की काय घडलं ते मला नीटसं आठवतच नाही. पेपर वाचला आणि मला पळता भुर्इ थोडी झाली. अहो पुस्तकातील शेवटचा चॅप्टर म्हणींचा होता जो मी काल पहिल्यांदा उघडून पाहिला होता. आता तहान लागल्यावर विहीर खणली तर ती तहान भागणार तरी कशी. बाकी सगळ्या चॅप्टर्सचा अभ्यास अगदी नीट केला होता. पण काय उपयोग. इकडे आग लागली होती रामेश्वरी आणि माझे बंब गेले होते सोमेश्वरी. तो म्हणींचा चॅप्टर माझ्या अगदी डोळ्यांसमोर येत होता पण आठवत काही नव्हतं. लंकेत सोन्याच्या विटा काय कामाच्या? वाचेल तो वाचेल म्हणजे नक्की काय ते आज मला समजत होतं. एवढा अभ्यास केला पण सगळं मुसळ केरात. आजी काय बोलते ते आठवून आठवून लिहायचा मी खूप प्रयत्न केला पण जर आडातच नाही तर पोहोर्यात कुठून येणार? ओ म्हणता ठो येर्इना. काल रात्री जर कंटाळा केला नसता तर आज पेपर नक्की सोपा गेला असता आणि आत्याबार्इला जर मिशा असत्या तर काका म्हटलं असतं. आराम हराम आहे हेच खरं. एक तर म्हणींचा पेपर त्यात एवढा मोठा म्हणजे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. केल्याने झालं असतं पण आधी केलं तर पाहिजे. स्वत:चाच एवढा राग आला पण काय करणार आपलेच दात आणि आपलेच ओठ. आजूबाजूला पाहिलं. सगळे आपले पेपर लिहिण्यात गुंग होते. कठीण समय येता कोण कामास येतो? आणि त्यांनी तरी मला का म्हणून मदत करावी? स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हे मला ठाऊक का नव्हतं? गार्गीसुद्धा अगदी मन लावून लिहित होती. माझी अगदी आपण हासे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला अशी अवस्था झाली होती. काय करणार आलिया भोगासी असावे सादर असं म्हणून जमेल तसा पेपर लिहिला. अक्षर मात्र अगदी छान काढलं. तेवढाच बुडत्याला काडीचा आधार. चांगला दोन तास पेपर लिहिला. मेलेलं कोंबडं आगीला थोडंच भीतं. आता जे काही व्हायचं होतं ते रिझल्टच्या वेळेला समजलंच असतं. करावं तसं भरावं.
पेपर असल्यामुळे आज शाळा लवकर सुटली. घरी आले ती आजीला उत्तर काय द्यायचं ह्माचा विचार करत. खरं तर ही नुसती युनिट टेस्ट होती. त्याला एवढं महत्व द्यायची गरज नव्हती. पण शितावरूनच भाताची परीक्षा होते ना? आधीचा सहामाही परीक्षेचा अनुभव आठवला. आजीने तेव्हा पेपर झाल्यावर नुसतं दे माय धरणी ठाय करून सोडलं होतं. मी दुधाने तोंड पोळलं म्हणून ताकही फुंकून प्यायचं ठरवलं. कदाचित आजीने मला काळजी वाटत होती तेवढी जास्त चौकशी केलीही नसती पण म्हणतात ना चोराच्या मनात चांदणं. थोड्या वेळाने आजी झोपून उठली. मी म्हंटलं आधी पोटोबा मग विठोबा. ताकास तूर लागून दिला नाही पण माझा चेहरा बघून बहुतेक माझं पितळ उघडं पडलं असावं. शिर्याची प्लेट हातात देताच तिने लगेच प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. पण मीही काही कच्च्या गुरूचा चेला नव्हते. आणि जातो एखादा पेपर वार्इट. कर नाही त्याला डर कशाला? आजीच्या सगळ्या प्रश्नांना मी अगदी हसत खेळत उत्तरं द्यायला लागले. आपण किती हुशार म्हणून मनात मांडे खात होते पण करायला गेले एक आणि झालं भलतंच. माझ्या अशा वागण्याने आजी उलट माझ्यावर चिडली. अगं, जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेव. तुला नीट बोलायचं नसेल तर नको बोलूस. मी आता विचारणारच नाही. ज्याचं करावं बरं तो म्हणतो माझंच खरं असं म्हणाली. म्हणजे पेपरचा विषय बाजूलाच राहिला आणि तुम्ही आजकालची मुलं वगैरे सुरू झालं. एक गोष्ट चांगली झाली की पेपरचा विषय बाजूला राहिला! सिर सलामत तो पगडी पचास. आता राहाता राहिला आजीचा बिघडलेला मूड. तो सुधारण्याकरता करावी लागणारी तारेवरची कसरत मला चांगलीच ठाऊक होती. आजीचं बोलणं सुरू असताना जणू मी त्या गावचीच नाही असं दाखवून मध्येच तिला विचारलं. आज्जी गं, बाबा लहानपणी एकदम गुड बॉय होते का गं? झालं! गंगेत घोडं न्हायलं. एका सेकंदात आजीचा मूड बदलला. कोण गुड बॉय! तुझा बाबा? नाव घेऊ नकोस त्याच्या शाळेच्या दिवसांचं. आजीचे बोल रागाचे होते पण चेहर्यावर मात्र कौतुकाचं हसू होतं. बाबा म्हणजे आजीचा वीक पॉइंट हे मी अगदी जाणून होते. ती पुढे बोलतच होती. त्या वेळी आतासारखे लाड नव्हते. छडी लागे छमछाम विद्या येर्इ घमघम हे सगळ्यांना माहित होतं. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. नाहीतर हा तुझा बाबा पार वायाच गेला असता.
आजीने दिलेला शिरा खात मनात हुश्श केलं. पण आजीचा विषय बदलला तरी माझी मात्र सतत आजचा पेपर आठवून पाचावर धारण बसत होती. खरंच म्हणी कशा वापरायच्या ह्माचा अभ्यास नीट केला असता तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. पण विनाशकाले विपरीत बुद्धी. पेरावं तसं उगवतं. खोट्याच्या कपाळचा गोटा काही चुकणार नव्हता. कधी तरी रिझल्ट येणारच होता. कोंबडं झाकल्याने उजाडायचं काही राहात नाही. आता घोडामैदान जवळच होतं. आणि तोपर्यंतच माझी झाकली मुठ सव्वा लाखाची राहणार होती.
2 Comments
आपण एक काम करूया — अप्रतिम ! आजच्या वास्तवाला किती चपखल आहे.
साठा उत्तराची कहाणी …खूपच मस्त …किती म्हणी आल्यात या लेखात…मजा आली वाचताना .
शाळेतल्या बाईंची आठवण आली आणि छडी वाजे छ मछ म ची हि … अप्रतिम !
मनःपूर्वक धन्यवाद, योगिनी.