चराचर
जानेवारी 1, 2011नवनिर्मितीचा तिढा
आदिमानवांची एक टोळी दगड धोंडे घेऊन शिकार करायला निघाली. खाचखळग्यातून जात असता त्यातल्या एकाच्या हातातला दगड त्याच्याच पायावर पडला आणि तो जे कळवळून ओरडला ते अगदी सुरात ओरडला. बाकीच्यांना त्याचं ते सुरेल ओरडणं फार भावलं आणि त्यांनी आपल्या हातातले दगड धोंडेही त्याच्या पायावर मारण्यास सुरवात केली. त्या कळवळणार्या आदिमानवाचं काय झालं असेल ते असेल पण अशा प्रकारे संगीताचा जन्म झाला. अगदी त्या काळापासून मानवजातीला नवनिर्मितीची फार आवड आहे. एखादी व्यक्ती जेव्हा नवीन काही घडवते तेव्हा त्या व्यक्तीबद्दल आदर वाटू लागतो. अगदी आजमितीलाही एखाद्या गाण्याची चाल ओरिजनल आहे का, ह्याला महत्त्व दिलं जातं. एखादं गाणं आपल्याला खूप आवडतं पण थोड्या दिवसांनी जर आपल्याला कळलं की ते जुन्या एखाद्या गाण्याची नक्कल करून बनवलेलं आहे तर लगेच ते आपल्या मनातून उतरतं. मग ते जुनं गाणं आपण आयुष्यात कधी ऐकलेलं नसेल तरी काही फरक पडत नाही.
पण आजकालच्या ह्या जगात अगदी अस्सल नवीन असं काही असू शकतं का? आपण नवीन जे काही करत असतो ते आपल्या आयुष्यातल्या अनुभवांच्या गोळाबेरजेतून होत नसतं का? लहानपणी ऐकलेली एखादी धून, एखादी तान लक्षात ठेवून एखाद्या संगीतकाराने जर नवीन गाणं बनवलं तर ते नवीन म्हणायचं की नक्कल करून बनवलेलं गाणं म्हणायचं? आणि हे फक्त संगीताच्या बाबतीत होतं असं नाही. तुमचे आमचे साधे विचारही आपल्या पूर्वानुभवांपासून मुक्त असू शकत नाहीत. आपण जे वागतो, बोलतो त्यावर लहानपणापासून आपले आर्इवडील, शिक्षक, भावंडं, नातेवार्इक, मित्रमंडळ अगदी आपल्या सानिध्यात आलेल्या ति-हाइतांचाही प्रभाव असतो. आपण बोलतो ती अक्षरं, शब्दं, वाक्यं आणि ते बोलायची आपली पद्धत ह्यावर आपल्याही नकळत आपल्या भूतकाळाने संस्कार केलेले असतात. एखादं लहान मुल बोलताना, वागताना – त्याच्या शब्द उच्चारण्यावर, त्याच्या काही लकबींवर आपल्याला त्याच्या पालकांचा प्रभाव जाणवतो. ‘अगदी आपल्या आर्इवर गेली आहे हो’ अशी वाक्यं आपल्याला मुलांच्या बाबतीत हमखास ऐकू येतात. लहानपणी आपण आपल्या पालकांच्या सानिध्यात सर्वात जास्त असतो, त्यामुळे हे साहजिकच आहे. आपण जसजसे मोठे होत जातो तशा आपल्या सामाजिक वर्तुळाच्या कक्षा रूंदावत जातात. आणि ह्या वर्तुळात येणार्या प्रत्येक व्यक्तीचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडत जातो. हा प्रभाव इतक्या प्रकारचा आणि इतका सूक्ष्म असू शकतो की शेवटी आपलं स्वत:चं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व बनलं आहे असं भासू लागतं.
एखादा लेखक किंवा कवी जेव्हा लिखाण करतो तेव्हा आपण खरंच नवनिर्मिती करत आहोत का हा प्रश्न नक्की भेडसावत असेल. लेखक एखादी व्यक्तिरेखा जेव्हा खुलवतो तेव्हा भूतकाळात त्याच्या सानिध्यात आलेल्या व्यक्तींची स्वभाववैशिष्ट्यं त्यात नक्कीच वापरत असेल. एखादा कवी जेव्हा एखाद्या प्रसंगाचं वर्णन करतो तेव्हा आपल्या पूर्वायुष्यातल्या अनुभवाचा वापर त्यात करत असणार ह्यात वाद नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही की ती एक नक्कल असते. ह्या लेखाच्या सुरवतीला एक आदिमानवांचा दाखला दिलेला आहे. तो मला स्वत:ला सुचला असण्याची शक्यता फार कमी आहे. नक्कीच मी कधीतरी कोणाकडून हा किस्सा ऐकला असेल आणि माझ्याही नकळत हा लेख लिहिताना तो मला आठवला असेल.
पण मग ह्या जगात नवनिर्मित असं काही खरंच असू शकतं का? इंग्रजी भाषेत ‘शोध’ ह्या शब्दाला ‘डिस्कवरी’ आणि ‘इन्वेन्शन’ असे दोन प्रतिशब्द आहेत. डिस्कवरी म्हणजे जे मुळातच होतं आणि ज्याचं ज्ञान आपल्याला नव्याने प्राप्त झालं अशी गोष्ट आणि इन्वेन्शन म्हणजे सर्वस्वी नवीन ज्ञानाची प्राप्ती. आजही पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा शोध गॅलिलिओने लावला असं जगन्मान्य आहे पण भारतात हे विधान करून पहा. ‘हॅः! आमच्या आर्यभट्टांनी हा शोध गॅलिलिओच्या हजार वर्षं आधी सहाव्या शतकातच लावला आहे.’ असं ठामपणे सांगणार्या बर्याच व्यक्ती तुम्हाला भेटतील. कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला असं म्हणतात. पण अमेरिका खंडात मुळचं वास्तव्य असलेल्या जमातींना हे विधान किती बालीश वाटत असेल हे समजायला आपण त्या जमातीमध्ये जन्म घ्यायची गरज नसावी. दुसरा शोधाचा प्रकार आहे इन्वेन्शन. काही जण शास्त्रज्ञांचा हवाला देऊन असा दावा करू शकतील की वैज्ञानिक शोध (सायंटिफिक इन्वेन्शन) म्हणजे नवनिर्मितीच असते. पण वैज्ञानिक शोधांचा जरी आढावा घेताला तरी एक गोष्ट समजते की आपल्याला फक्त तो शोध लावला गेला एवढंच कळतं. त्यामागे काय प्रचंड मेहनत आणि अभ्यास असतो ते जाणून घ्यायच्या फंदात आपण पडत नाही. आणि ही जी मेहनत आणि अभ्यास असतो तो पूर्वी इतरांनी केलेल्या अभ्यासावरच आधारित असतो. सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) युगात, जगाच्या निरनिराळ्या भागातील घडामोडी सर्वदूरपर्यंत समजतात. विज्ञानाच्या क्षेत्रात कोण काय करतंय ह्याची माहिती मिळवण्याकरता फक्त संगणकाच्या काही कळी दाबणं जरूरीचं असतं. पण पूर्वीच्या काळी एखाद्या शास्त्रज्ञाने एखादा शोध लावावा आणि तो आधीच कुणीतरी लावला आहे हे समजावं अशा घटना अपवादात्मक नव्हत्या. न्यूटनने जर गतीच्या नियमांचा शोध लावला नसता तर आइनस्टाइनला त्याच्या क्रांतीकारी विचारांचा पाया मिळाला असता का ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि मुळात न्यूटनच्या विचारांवरही त्यापूर्वीच्या गॅलिलिओसारख्या विचारवंतांचा पगडा असणार हे नक्की. त्यामुळे नवीन शोधांनाही कितपत नवनिर्मिती म्हणता येर्इल ही शंकाच आहे.
विज्ञानाचाच विषय निघाला आहे तर हे सांगणं जरूरीचं आहे की ह्या संदर्भातही पूर्वीपासून शास्त्रज्ञांनी आणि तत्त्ववेत्यांनी संशोधन केलेलं आहे. (पूर्वीच्या काळी – जेव्हा विज्ञान आजच्या एवढं अफाट आणि क्लिष्ट झालेलं नव्हतं तेव्हा तत्त्वज्ञान आणि विज्ञान ह्यात फारकत केली जात नव्हती. एकोणीसाव्या शतकाच्या आधीचे सारे शास्त्रज्ञ थोर तत्त्ववेत्ते म्हणूनच प्रसिद्ध आहेत. देवाने सॄष्टी घडवली आहे. त्यामुळे सॄष्टीच्या गुपितांचा उलगडा म्हणजेच देवाचा शोध ह्या विचारांतूनच विज्ञानाचा वेध घेतला जायचा. अगदी न्यूटनसुद्धा – ज्याच्या भौतिकशास्त्रातील थक्क करणार्या संशोधनाला आधुनिक विज्ञानाचा पाया समजलं जातं – गतीचे नियम शोधू लागला ते परमेश्वराचा शोध घेण्याकरताच. भारत किंवा ग्रीससारख्या प्राचीन संस्कृतींमध्येसुद्धा अध्यात्म आणि विज्ञान हे नेहमी हातात हात घालून गेलेले दिसतील.) काही तत्त्ववेत्यांच्या मते आपलं व्यक्तिमत्त्व, आपलं वागणं हे जरी आपल्या आयुष्यातल्या अनुभवांवर आधारित असलं तरी प्रत्येक व्यक्तीची काही उपजत (a priori – ए प्रायोरि) वैशिष्ट्य असतात. म्हणजेच असं समजा की एखाद्या व्यक्तीला जन्मत:च एका पेटीत बंदीस्त केलं आणि वयाची अठरा वर्षं जगवत ठेवलं. वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत ह्या व्यक्तीचे स्वत:चे असे काहीही अनुभव नसतील. तरीही ती व्यक्ती जर अठरा वर्षांनी जागी झाली तर ती एक दिवसाच्या नवजात शिशूप्रमाणे वागणार नाही. त्या व्यक्तीवर सामाजिक संस्कार जरी झाले नसले तरी त्या व्यक्तीला स्वत:चं असं व्यक्तिमत्त्व असेल, स्वत:चा स्वभाव असेल, स्वत:चे विचार असतील. अजून तरी असला प्रयोग प्रत्यक्षात केला गेला नसल्याने हा एक वादाचा विषय आहे. पण समजा अशी व्यक्ती अस्तित्त्वात आली आणि त्या व्यक्तीने जर काही घडवलं (जे आत्तापर्यंत अस्तित्त्वात आलेलं नाही) तरच बहुदा आपण त्याला सर्वस्वी नवीन निर्मिती म्हणू शकू. तोपर्यंत नवनिर्मितीचे मापदंड ठरवण्यात आपल्याला नेहमीच बाधा येत राहील.
अभियांत्रिकी महाविद्यालयात जेव्हा आम्ही वैद्युतीय उपकरणांवर प्रयोग करायचो तेव्हा कधीही आम्हाला अपेक्षित निकाल मिळत नसत. मग काय, आदल्या वर्षीच्या मुलांनी त्यांच्या प्रयोगवहीत लिहीलेल्या निष्पत्तीची नक्कल करून आम्ही मोकळे व्हायचो. आणि आमच्या आधीच्या विद्यार्थ्यांनीही त्यांच्या आधीच्या विद्यार्थ्यांची नक्कल केली असणार ह्यात आम्हाला संशय नव्हता. तेव्हा एक विनोद नेहमी एकमेकांना सांगितला जायचा. बेंजामिन फ्रँकलीनने वैद्युतीय प्रयोगांचे जे काही निष्कर्ष त्याच्या प्रयोगशाळेत काढले तेच निष्कर्ष बहुदा पिढ्यान्पिढ्या गिरवून आता आपल्या प्रयोगवहीपर्यंत पोहोचले असावेत असं म्हंटलं जायचं. विज्ञानसारख्या स्पष्ट आणि निश्चित शाखेची ही तर्हा आहे तर साहित्यासारख्या स्वैर आणि मनस्वी गोष्टीची काय कथा?
नवनिर्मिती म्हणजे नक्की काय हा प्रश्न अनुत्तरीत रहाण्याची शक्यताच जास्त आहे. जर एखाद्या नवकवीने कलंदरला बिलंदर असं यमक जुळवलं तर ती त्याची नवीन कल्पना समजावी की आधीच्या असंख्य कवींची त्याने केलेली नक्कल समजावी हा प्रश्न त्या कवितेच्या वाचकांवर सोडणंच योग्य.