फेब्रुवारी 19, 2016

विहीर

एखाद्या व्यक्तीला मदत करताना काही वेळा त्या मदतीचा असा काही कैफ चढतो की ती मदत त्या व्यक्तीच्या उपयोगाची आहे का नाही हे तपासून पाहण्याचं भान आपल्याला राहत नाही. तहानलेल्या व्यक्तीला अन्न देण्यासारखा हा प्रकार असतो. अशा वेळी कुणीतरी जाणीव करून द्यावी लागते की मदत करण्यामागील भावना जितकी महत्वाची असते तितकीच त्या मदतीची उपयुक्तताही महत्वाची असते. सत्येन्द्रला ही विदारक जाणीव गौरीताईंनी करून दिली.". . .

काम नाजूक होतं. दिवस सरकत होते. नागराजच्या जीवाचा धोका प्रत्येक सरकत्या दिवसाबरोबर वाढत होता. कालपासून सर्वांच्या काळजीत आणखीनच भर पडली होती. नागराजने काल संध्याकाळपासून हालचाल करणं बंद केलं होतं. आता चिंता मिनिटागणिक वाढत होती . . . आणि अशा मनस्थितीत सत्येंद्र असताना पांडूने नेहेमीप्रमाणे त्याला प्रश्न विचारला ज्यामुळे सत्येंद्रचा पारा चढला होता. . . . "

सप्टेंबर 4, 2015

मृतात्मा

प्रत्येक खुनाला कधी ना कधी वाचा फुटते असं म्हणतात. खरंच?!

. . . एका आयुष्याच्या समाप्तीची निश्चिती त्या मडकं फुटण्याच्या आवाजात ध्वनित झाली. मडक्यातील उरलेलं पाणी आणि मडक्याचे तुकडे इतस्ततः पसरले.
"थोडा संयम पाळला असता तर आज ही वेळ आली नसती." अरे बाप रे! शेजारच्या गृहस्थांचं स्वगत पुन्हा सुरु झालं होतं. मी मघाशीच जागा बदलायला हवी होती. पण आता थोडाच वेळ उरला होता. मी शांतपणे हाताची घडी घालून नजर त्या धगधगणाऱ्या चितेवर ठेवली.
"आपल्या सावजाला बेसावध कसं ठेवायचं ते ह्या मुलीकडून शिकावं. आत्महत्या म्हणे! हा धडधडीत खून आहे खून. मी सांगतो कसा ते." बोलणं पुटपुटल्याप्रमाणे असलं तरी मला स्पष्ट ऐकू येत होतं . . .
एप्रिल 4, 2014

साठा उत्तराची कहाणी

एप्रिलचा महिना म्हणजे मला अजूनही परीक्षांची आठवण होते. ते पॅड, कंपॉस आणि खास परीक्षेची पेनं, पेन्सिली घेऊन परीक्षेला जाणं. त्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका. ते कधी सारं काही येतंय तर कधी काहीच येत नाही असं वाटणं. ह्या गोष्टीतील मुलीचीही अशीच काहीशी गत झालेली आहे . . .

". . . मी पेपरवर नजर फिरवणार एवढ्यात मला बाईंचे शब्द ऐकू आले की आजचा पेपर म्हणींवर आधारित आहे. म्हणजे भरवशाच्या म्हशीला टोणगा. तुम्हाला खरं सांगते की त्यानंतर नक्की काय घडलं ते मला नीटसं आठवतच नाही. पेपर वाचला आणि मला पळता भुई थोडी झाली. अहो पुस्तकातील शेवटचा चॅप्टर म्हणींचा होता जो काल मी पहिल्यांदा उघडून पाहिला होता. आता तहान लागल्यावर विहीर खणली तर ती तहान भागणार तरी कशी . . . "
ऑगस्ट 16, 2013

सापळा

फेसबुकसारख्या प्रसारमाध्यमात स्वच्छंदपणे विहरताना आपला भूतकाळ आपली पारध करण्याकरता सापळा लावून बसलेला नाही ना ह्याची खातरी करून घ्या!

". . . स्वीटूचे शब्द रवीच्या मनावर आसुडासारखे उमटले. पण त्या आसुडातच त्याला बुडत्याचा काडीचा आधारही मिळाला होता. आपल्या प्रत्युत्तरात त्याने कळकळीने स्वीटूला पटवून देण्याचा प्रयत्न केला की तो ही संधी वाया जाऊन देणार नव्हता. त्याने पुढच्याच रविवारी स्वीटूला पुण्यातील जंगली महाराज मार्गावरील सीसीडी म्हणजेच कॅफे कॉफी डेमध्ये भेटायला येशील का अशी विचारणा केली. त्यावर स्वीटूने 'ओके' असे त्रोटक उत्तर पाठवून दिले.

झाले. सापळा रचला गेला होता! . . . "
फेब्रुवारी 1, 2013

एकुलता

आपल्या पुरुषप्रधान समाजात प्रसंगी मुलींची आबाळ करून मुलांना झुकतं माप दिलं जातं. बहुतेक वेळा ह्यामागे एक सूक्ष्म स्वार्थ दडलेला असतो. घरातील सर्व संसाधनं उपभोगलेल्या त्या मुलाला त्या गुंतवणुकीची परतफेड करायची असते. अशा मानसिक दबावाला तोंड देणं सोपं नसतं.

"... होय, त्याला लिहिता वाचता येत होते. येणारच! तो चांगला पदवीधर होता. बी कॉम. काय काय विषयांचा अभ्यास केला होता त्याने. बुक कीपिंग, अकाऊंटन्सी, इकोनॉमिक्स ... त्याला तशाही अवस्थेत हसू आले. संतोषच्या घरच्यांना तर हे शब्द कानडी किंवा मल्याळी शब्दांइतकेच अनोळखी होते. पण तरीही संतोष शिकला होता ... नव्हे त्याला त्याच्या घरच्यांनी शिकवले होते ..."
ऑगस्ट 17, 2012

हेर

'... काही वेळाने संपूर्ण शांतता पसरली. चंदू आपल्या लपण्याच्या जागेतून सावधपणे बाहेर पडला. त्याने वाड्याच्या आवाराबाहेर पडण्याची जागा आधीच हेरून ठेवली होती. योग्य संधी येताच चंदूचं सारं शरीर जणू प्रत्यंचेवर चढवलेल्या बाणाप्रमाणे सिद्ध झालं. बस, बोट काढायची गरज होती आणि तो बाहेर पडणार होता. ती वेळ आली आणि एवढ्यात ...'
फेब्रुवारी 3, 2012

मैत्रीण

रक्ताची नसलेली काही नाती आयुष्यात अगदी अचानकपणे जुळून येतात. ही नाती असतात मनाची. समाजाच्या साचेबंद नियमावलीत ही नाती बसवताना मानसिक त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

'... दुसऱ्या दिवशी बसस्टॉप जवळ आला तशी माझी नजर तिचाच वेध घेत होती. ती खरंच तिथे उभी होती. तिनेही बहुतेक आदल्या दिवसभरात विचार पक्का केला असावा. माझ्याकडे पाहून ती अगदी मोकळेपणाने हसली. मी माझी बाइक थांबवली आणि तिच्या स्मितहास्याला प्रतिसाद दिला. ...'
सप्टेंबर 16, 2011

वास्तुपुरूष

"... एकनाथ सावधपणे उठला तरीही बाजेने बरीच कुरकुर केली आणि त्यामुळेच की काय आतले आवाज एकदम बंद झाले. दोन खोल्यांच्या मध्ये एक खिडकी होती. एकनाथ पायांचा आवाज न करता त्या खिडकीजवळ गेला. खिडकीला बाहेरून गज होते.  ... "
जानेवारी 1, 2011

बॅकस्टेज

आजुबाजूला अंधार होता. अंधारात काही माणसंही उभी होती बहुतेक. एक दरवाजा दिसला तो उघडून मी आत शिरलो. आत चांगला लख्ख उजेड होता. बरीच माणसं एकमेकांशी गप्पा मारत बसली होती. एकंदरीत वातावरण आनंदी होतं.