डिसेंबर 18, 2022

… अडलं नाही बुवा

नास्तिक व्यक्ती बोलताना फार जपून बोलते. कधी आणि कशामुळे कुणाच्या भावना दुखावतील ह्याचा काही भरवसा नसतो. शिवाय देव मानणाऱ्या व्यक्तीचा दुसरा कुठला देव मानणाऱ्यांपेक्षा देव न मानणाऱ्या व्यक्तीवर जास्त राग असतो. पण मग नास्तिक व्यक्तींना स्वतःच्या काही भावना नसतात का? एखाद्या नास्तिक व्यक्तीने आपल्या भावना व्यक्त करायचं ठरवलं तर त्या कश्या असतील?

आयुष्यात विलक्षण काही घडलं नाही बुवा
देवावाचून कधी काही अडलं नाही बुवा ॥

देवभक्ती म्हणतात असते संस्कारांची ठेव
पण चागलं वागा कळण्यासाठी हवा कशाला देव
वडिलधाऱ्यांचं ऐकून कुणी बिघडलं नाही बुवा
देवावाचून कधी काही अडलं नाही बुवा ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/1UwkJpBoYGE ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जानेवारी 17, 2021

माझाच देव महान

आज जागतिक धर्मदिन आहे. पृथ्वीवरील एका जीवाला विचार करण्याची क्षमता प्राप्त झाली आणि तो निसर्गातील घडामोडींचा अर्थ लावू लागला. सुसूत्रतेने चालणाऱ्या निसर्गचक्रामागे एखादी अतिमानवीय शक्ती असणार ह्याची त्याला खातरी पटली. त्यातून देव आणि मग धर्म ह्या संकल्पनांचा जन्म झाला. मानवाच्या त्याच वैचारिक क्षमतेमुळे पुढे विज्ञानाची वावटळ आली ज्यात असंख्य अनुत्तरीत प्रश्नांची काही निराळीच उत्तरं मानवाला मिळू लागली. देव आणि धर्म मात्र तिथेच राहिले ...

आजही आहे संस्कृती अन् आजही चाले पूजा
आजही म्हणती आमचाच देव नाही कोणी दुजा

सारे म्हणती एकच देव रूपं त्याची अनेक
देवाचंच नाव घेऊन चाले पण अतिरेक

मनीच्या वाईट प्रवृत्तींना घालण्याला लगाम
देव बनवतो आपण त्याचे बनतो पण गुलाम

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/z0fuibfFQ48 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 22, 2018

आयुष्याचं गणित

राष्ट्रीय गणित दिनाच्या शुभेच्छा! बोटं वापरून आकडेमोड करणाऱ्या प्राचीन मानवापासून ते आज ज्यांचा जन्मदिवस आहे त्या गणिताच्या मेरुमणी रामानुजनपर्यंत मानवाने प्रचंड मजल मारली आहे. आपल्यासारख्या सामान्य जनांना रामानुजन ह्यांची गणिती प्रमेय कदाचित समजणार नाहीत पण गणित हा विषय मात्र आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे ह्यात शंका नाही.

लग्नानंतर ह्या गणिताला खरा येतो बहर
     मिळकत राहते तेवढीच आणि खर्च करतो कहर
मुलं झाली की गणिताचा माजतो हाहाकार
     खर्चामधली बेरीज संपते लागतो गुणाकार

अती झालं तर कर्जाच्या वाटेने नेतं गणित
     आयुष्यात पावलो पावली समोर येतं गणित ॥

सोडवत बसलो गणित नाही विचार केला अन्य
     आयुष्याच्या जमाखर्चात बाकी राहिली शून्य
गणितापायी वर्षं झाली आयुष्यातून वजा
     गणितापायी घेतला नाही आयुष्याचा मजा

माझ्यासाठी काहीच शिल्लक ठेवत नव्हतं गणित
     आयुष्यात पावलो पावली समोर येतं गणित ॥

मग म्हणालो भीती कसली डोळे उघडून बघ
     दुसऱ्यांसाठी खूप जगलास स्वत:साठी जग
कोण सांगू शकेल आपलं आयुष्य बाकी किती
     आयुष्य आहे ओंजळ वाळू होते भरभर रिती

माझ्यापुरतं आयुष्याचं सुटलं होतं गणित
     आयुष्यात पावलो पावली समोर येतं गणित ॥
मार्च 31, 2018

नाव

काही जणांना ‘मीच माझ्या आयुष्याचा शिल्पकार आहे’ असा आत्मविश्वास असतो तर काही जण ‘देवाला काळजी’ अशी सपशेल शरणागती पत्करतात. विचार करण्याची कुवत असलेला एकमेव जीव, मानव, पूर्वापारपासून आपल्या आयुष्याचा अर्थ लावण्याकरता कधी अध्यात्माची तर कधी विज्ञानाची कास धरत आला आहे. पण खरं सांगायचं तर ....

नाही सुकाणू नाही शीड ना वल्ह्यांचाही ठाव
     आयुष्य जैसे नावाड्यावाचून असावी नाव ||

ऐलतीराचा पत्ता नाही पैलतीर ना ठावे
     कशास आलो कुठे चाललो कुणी कुणा सांगावे
प्रवाह जैसा जैसा वारा तैसीच घेई धाव
     आयुष्य जैसे नावाड्यावाचून असावी नाव ||

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/JhauMnqzsP0 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
नोव्हेंबर 18, 2016

जीवन एक अपघात

मानवाला आपल्या प्रगतीचा फार अभिमान आहे. आपल्या बुद्धीच्या जोरावर तो साऱ्या जीवसृष्टीचा अनभिषिक्त सम्राट बनला आहे. मात्र ज्या जीवसृष्टीवर मानव आपली सत्ता गाजवत आहे तिचं अस्तित्व हा ब्रह्माण्डातील केवळ एक अपघात आहे. सुईच्या अग्रावर तोलल्याप्रमाणे उभा असलेला हा डोलारा एका साध्या करणानेही कोसळू शकतो हे विसरून चालणार नाही ...

हद्द पृथ्वीची ओलांडुनिया कक्षा तुम्ही विस्तारा
     कळेल केवळ नशीब चांगले जीवन येण्या आकारा
ठाऊक जे ब्रह्माण्ड जेवढे नाही कुणीही शेजारा
     ठिपक्याइतुकी पृथ्वी आपुली त्यात पसारा हा सारा

अनंत साऱ्या विस्तारातील अंशच केवळ ज्ञात
     जीवन आहे ब्रह्माण्डाच्या खेळातील अपघात
एप्रिल 4, 2016

काळजी घे

माणूस समूहात राहणारा प्राणी असल्यामुळे बरेचदा त्याच्याकरता मुंग्या, पक्षी, मासे अशा समूहात राहणाऱ्या प्राण्यांची उपमा वापरली जाते. मात्र माणूस हा ह्या इतर प्राण्यांपेक्षा सर्वस्वी भिन्न प्राणी आहे. प्रत्येक माणसाला स्वतःच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची जाणीव असते. त्यामुळे माणसाकरता आपल्या समूहाच्या संरक्षणाएवढंच स्वतःचं वैयक्तिक संरक्षणही महत्वाचं असतं...

तुझ्यात विचार करण्याची क्षमता आहे
     तुझ्यात निर्णय घेण्याची क्षमता आहे
पृथ्वीवरील जीवसृष्टी पुढे नेणं हे तुझं लक्ष्य नव्हे
     तुझं जगणं केवळ भक्षक किंवा केवळ भक्ष्य नव्हे

तू आहेस तोवर ब्रह्मांड आहे
तुझं एकच आयुष्य आहे
          काळजी घे
सप्टेंबर 19, 2014

किती सूक्ष्म किती भव्य

विज्ञानाची अलौकिक भरारी दोन दिशांना गवसणी घालत चालली आहे. एक दिशा आहे अतिसुक्ष्माची तर दुसरी आहे अतिभव्याची. एका टोकाला अतिसूक्ष्म कणांच्या प्रक्रिया तर दुसऱ्या टोकाला ब्रह्मांडाची व्याप्ती! ब्रह्मांडाच्या साऱ्या गुपितांचा छडा लावल्याशिवाय हे शास्त्रज्ञ थांबणार नाहीत . . .

पाण्याच्या रेणूत चिमुकला हायड्रोजनचा अणू
चंद्र पृथ्वीहून विशाल सविता तीन पिढ्या त्या जणू
अणू दिसे ना कुणा कुणी ना गेले सूर्यावर
किती सूक्ष्म हे चराचर
     किती भव्य हे चराचर

कधी सूक्ष्मदर्शकातून दिसे कधी दुर्बिणीचा वापर
किती सूक्ष्म हे चराचर
     किती भव्य हे चराचर

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/St0nGb9wSGQ ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मार्च 21, 2014

जीवन

दर वर्षी २२ मार्च हा दिवस 'जागतिक जलदिन' म्हणून साजरा होतो. आपल्यापैकी कोणी पाण्याचं महत्व न समजण्याइतके अनभिज्ञ नसावेत. जलदिनानिमित्त ह्या अनन्यसाधारण जीवनस्रोताचं महत्व अधोरेखित करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न . . .

तेरा अब्ज परार्ध लिटर पृथ्वीवर ते राही
     पण त्याच्यापैकी तीनच टक्के समुद्रात नाही
तीन टक्क्यांपैकी फक्त एक शतांश आपलं
     बाकी सारं धृवांवरच्या बर्फामध्ये लपलं

ह्यात आले नदी नाले आणि सर्व तलाव
     त्याला जीवन ऐसे नाव
मार्च 3, 2013

योगायोग

'मी असा आहे', 'मी तशी आहे' ... अशा वल्गना करताना आपण सोयीस्करपणे विसरतो की आपण जसे आणि जिथे आहोत ते असणं आपल्या हातात कधीच नव्हतं, नसतं. त्याला उत्क्रांती म्हणा, प्राक्तन म्हणा किंवा देवाची करणी म्हणा, शेवटी आपलं असणं हा फक्त एक योगायोग आहे. काल संपन्न झालेल्या 'राष्ट्रीय विज्ञान दिना'निमित्त ही एक विज्ञानावर आधारित कविता ...

एकच केवळ अंडाशय ते इतुक्या मोठ्या पोटी
एक जिंकला शुक्राणू अन् हरले कोटी कोटी
विजयाची तुमच्या सांगावी काय शक्यता होती

शक्यताशक्यतांचा ऐसा पिढ्यान् पिढ्यांचा ओघ आहे
तुमचं माझं जगणं म्हणजे निव्वळ योगायोग आहे