ऑगस्ट 21, 2024

एकमत

‘जात नाही ती जात’ हे साचेबंद वाक्य कितीही घासून गुळगुळीत झालं तरी ते कालबाह्य होणार नाही काळजी आपण निगुतीने घेतो. नवीन शेजारी असो, नवीन सहकर्मचारी असो किंवा अगदी स्वतःचं फक्त पहिलं नाव लावणारी एखादी अभिनेत्री असो.. त्यांचं आडनाव समजेपर्यंत आपल्याला अगदी चैन पडत नाही. त्यामुळे मग लग्नाच्या बाबतीत तर विचारायलाच नको. उपहासपूर्ण लेखनाकरता प्रसिद्ध हिंदी लेखक हरीशंकर परसाई ह्यांच्या एका कथेवर आधारित ही कविता..

रामरावांचा मुलगा होता शामरावांची मुलगी 
पडले प्रेमात एकमेकांशिवाय नव्हतं करमत 
दोघांच्याही पित्यांना ही पटणार नव्हती सलगी 
कुठल्याच गोष्टीत त्या दोघांचं होत नसे एकमत ॥

असल्या गोष्टी लपत नसतात कळलंच एका रात्री 
रामराव आणि शामरावांवर कोसळला जणू पर्वत 
आपलीच जात श्रेष्ठ होती दोघांनाही खात्री
कुठल्याच गोष्टीत त्या दोघांचं होत नसे एकमत ॥

ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/K01l3OjdMwA ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मे 5, 2024

नग्न सत्य

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील एका युरोपीय दंतकथेनुसार एकदा सत्य आणि असत्याची भेट झाली. त्या भेटीवर आधारित चित्रकार जाँ लिआँ जेरोमने काढलेलं ‘Naked Truth’ नावाचं चित्रही जगप्रसिद्ध आहे. सध्या आपल्या देशात जो वाचाळ धुरळा उडवला जातोय त्या पार्श्वभूमीवर ही दंतकथा तुम्हाला सत्यकथा वाटली तर त्यात नवल नाही..

सत्याच्या भेटीस एकदा आले पाहा असत्य
रीतीनुसार सत्यही करी असत्याचे अतिथ्य
जुनी गोष्ट आहे तरीही ऐकुनी एकदा पाहा
सत्यामध्ये ह्या गोष्टीच्या लपले मोठे तथ्य ॥
ऑक्टोबर 17, 2023

सहावं महाभूत

आज आंतरराष्ट्रीय दारिद्र्यनिर्मुलन दिन आहे. आदिमानव स्वतःचं अन्न स्वतःच गोळा करून किंवा शिकार करून मिळवत असे. मग शेतीचा शोध लागला. आता शेतीकरता मेहनत घेतल्यावर जमिनीवर मालकी हक्क येणारच. आणि इथेच सगळी गोची झाली. पुढे ह्या मालकी हक्काच्या भानगडीतूनच सहाव्या महाभुताचा जन्म झाला..

जल अग्नी वात धरणी आकाश निळे छान
जीवसृष्टीकरता होतं प्रत्येकच वरदान
मदत करणं जीवनाला त्यांचं मुख्य कार्य
शिक्षा करत त्यांचा कोणी केला जर अपमान ॥


जीवसृष्टी प्रगत झाली आली मानवजात
जीवसृष्टीच्या कारभारालाच घातला त्यांनी हात
धोकादायक ठरू लागले इतर जीवांकरता
एक एक करत महाभुतांवर केली त्यांनी मात ॥
सप्टेंबर 15, 2023

डीपी

Whatsapp, Facebook वगैरे सामाजिक माध्यमांमुळे आपण सर्व एकमेकांच्या जवळ आलो आहोत हे वादातीत आहे. मात्र ह्या माध्यमांचा एक दोष म्हणजे त्यात जे काही दिसतं त्यामुळे आपण एका आभासी जगात राहायला लागलो आहोत. वास्तव अनेकदा धक्कादायक असतं ज्याकरता पण तयार नसतो..

पण दोन दिवसांनी कळतं.. सारं काही संपलं! खेळ खलास!!
खलास?! असा कसा खलास?
आता तर भेटला होता.. कधी बरं.. जाम आठवत नाही
खरंच.. गेल्या दोन वेळेला तो आलाच नव्हता
पण इतका आजारी होता?
व्हॉट्सॲप, फेसबुकच्या मुलामा दिलेल्या विश्वात त्याचं आजारपण आपल्याला ठाऊकच नसतं ॥
जून 5, 2023

तुळस

सर्वांना पर्यावरणदिनाच्या शुभेच्छा! विकासकामांसाठी शहरात झाडं तोडली तर प्रायश्चित्त म्हणून शेकडो किलोमीटर दूरच्या जंगलात दुप्पट संख्येने वृक्षारोपण करायचं ही मखलाशी मानवच करू जाणे. पण शहरांची भरभराट करायची म्हटलं की निसर्गाचा ऱ्हास आलाच, नाही का?!

जंगल? ते काय असतं?
शेतं गेली... जंगल कुठलं राहायला!
मोठा रस्ता... वर्दळ
दुकानं...
एक गॅरेज.. एक खाटिक.. एक कबाडी.. एक सार्वजनिक शौचालय.. एका नेत्याचं ऑफिस..
रस्त्याच्या आश्रयाला एक कुटुंब.. अनेक कुटुबं.. आडोसे.. कच्च्या झोपड्या.. पक्क्या झोपड्या..
झोपड्याच झोपड्या!

ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/l10HAP2v4g0 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मार्च 13, 2023

प्राक्तन

प्राक्तन, नियती, नशीब, भाग्य, दैव, ललाटीचा लेख, विधिलिखित, भोग... भविष्यात काय वाढून ठेवलंय ह्याकरता आपण किती शब्दांचा वापर करतो. उद्याची तजवीज करण्याची दुर्दम्य इच्छा आपल्या मनात असते आणि तसे आपण सरळ रेषेत वागत असतो. मात्र उद्या येणाऱ्या एखाद्या अनपेक्षित वळणाकरता आपल्याला कधीच तजवीज करता येत नाही.

गरुडराज नभी विहरत होते बोल मधुर ते पडले कानी
पोपट पृथ्वीवरती होता मधुर जयाची होती वाणी
गुणी अशा पोपटास भेटून गरुडराजही झाले अंकित
गरुड शुकाची मैत्री पाहून तिन्ही लोक ते होती अचंबित
काहीच नव्हते समान तरीही एकमेकांस स्वभाव गमले
प्राक्तनात जे लिहिले आहे बदलण्यास ते कुणास जमले ॥

माझी ‘प्राक्तन’ ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/okTJP32oNBo ह्या ठिकाणी ऐकता येईल.
नोव्हेंबर 25, 2022

छेड

आज आंतरराष्ट्रीय स्त्रियांवरील अत्याचार विरोधी दिवस आहे. स्त्रीच्या नकारातच होकार दडलेला असतो वगैरे भंपक कल्पनांना पुरुषप्रधान समाज नेहमीच खतपाणी घालत आला आहे. स्त्रियांची छेड काढणं ह्यात स्त्रियांनाही आनंद मिळतो असले पुरुषांनी करून घेतलेले गोड गैरसमज किती अवाजवी आहेत हे जावे त्यांच्या वंशा तेव्हाच कळेल ..

समजून चुकली तीही बहुधा
	बोले माझी नजर
टाळू लागली मला आणि
	सावरू लागली पदर ॥

झाला असता स्पर्श माझा
	चुकार तो सवंग
सावरून बसली ती आपलं
	चोरून घेतलं अंग ॥

ठाऊक होता खेळ मला
	जाणार नव्हतो हार
आयुष्यातील माझ्या नव्हती
	पहिली ही शिकार ॥

ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/4FLpIxG9bac ह्या ठिकाणी ऐकता येईल.
जानेवारी 3, 2022

विद्ध

सीताहरणाकरता स्वतःला जबाबदार ठरवून पश्चात्तापाच्या आगीत होरपळणाऱ्या लक्ष्मणाने प्रभू श्रीरामांकडे दयेची याचना केली. सीतेच्या विरहामुळे व्याकूळ झालेल्या श्रीरामांना लक्ष्मणाची त्यांच्याप्रती समर्पण भावना पुन्हा एकदा जाणवली. मात्र त्याहीपुढे जाऊन त्या हळव्या क्षणी इतके दिवस स्वतःचं दुःख बाजूला सारून लक्ष्मणाने दाखवलेली निष्ठा त्यांना समजून आली ..

चंदनापरी शीतल मनही दग्ध जाहले
बंधुराज आज असे विरही विद्ध जाहले ॥

भार्येचा विरह आज सहन मला होईना
वनवासी निजदिनी तू तेच दुःख सोसले
आत्ममग्न विस्मरलो दुःख तुझे नाही ना
जाणवता व्यथा तुझी मन हे ओशाळले

ऐकुनी ते वचन मनी सुरु युद्ध जाहले
बंधुराज आज असे विरही विद्ध जाहले ॥

माझी ‘विद्ध’ ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/LduVdOTIlxI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मे 30, 2021

रोप

कोरोनाच्या संकटामुळे सारं जग हवालदिल झालं आहे. ह्या संकटात काही जणांनी आपले प्रियजन गमावले आहेत. इतरांना आपल्यावर तर अशी वेळ येणार नाही ना अशी धास्ती वाटते आहे. आपण ह्या संकटाला फार लवकर शरण जात आहोत असं तर नाही ना? हे संकट नैसर्गिक आहे – बहुतेक. पण मग निसर्गाकडूनच आपल्याला काही शिकता येईल का? ह्या काव्यकथेतील स्वामींनी आपल्या शिष्याला दिलेली शिकवण, पाहा तुम्हालाही पटतेय का ते ...

एक दिशी तो शिष्य पाहतो आक्रीत काही घडले
शिष्याचे ते रोप त्या तिथे मोडून होते पडले ॥

आकांडतांडव करुनी शिष्य आश्रम घेई डोक्यावर
स्वामी मात्र टाळती काहीही बोलायाचे त्यावर ॥

गळली पाने रोपाची पण शिष्य करी दुर्लक्ष
स्वामी मात्र जल घालती त्याला रोज राहुनी दक्ष ॥

एक दिशी शिष्यास स्वामींनी रोपापाशी नेले
काडीवरती शुष्क एक ते पान दिसे इवलाले ॥ 

ही काव्यकथा यूट्यूबवर https://youtu.be/ZAgyTFrPPhY ह्या ठिकाणी ऐकता येईल.