नमस्कारसन २०११ सालच्या जानेवारी महिन्यात माझं नवनिर्मिती.इन हे संकेतस्थळ सुरु झालं. ह्या संकेतस्थळाच्या नावामागील कार्यकारण पुढे सविस्तर लिहिलं आहे. मात्र मी जे काही लिहितो ते तुम्हा वाचकांपर्यंत तुमच्या सोयीनुसार पोहोचावं हादेखील ह्या संकेतस्थळामागील एक हेतू होता आणि अजूनही आहे. गेल्या सात वर्षांच्या साहित्य प्रवासात एक व्यक्ती म्हणून मी जसा घडत गेलो त्यानुसार संकेतस्थळातही सुधारणा करण्याची आवश्यकता भासू लागली. सन २०१८च्या जानेवारी महिन्यात हे नवीन रूपातील तेच संकेतस्थळ तुमच्यापुढे सादर करत आहे. ते तुम्हाला आवडेल अशी आशा आहे.

मनोगत

मला लहानपणी वाचनाची खूप आवड होती. शालेय शिक्षण मराठी माध्यमातून आणि त्यात आईच मराठीची शिक्षिका त्यामुळे घरी मराठी पुस्तकांचा राबता असणं साहजिकच होतं. प्राथमिक शालेय जीवनातील चांदोबा, किशोर, चिंगी, गोट्या, फास्टर फेणेपासून वाचनाचा चढता आलेख बटाट्याची चाळ, स्वामी, श्रीमान योगी, पानिपत पर्यंत पोहोचला. आणि मग महाविद्यालयीन जीवनाचं पर्व सुरू झालं. शिक्षणाचं माध्यम इंग्रजी झालं. आपल्या सहविद्यार्थ्यांच्या तुलनेत केवळ भाषेमुळे आपण मागे पडत आहोत असं वाटू लागलं. मराठी भाषा कुचकामी वाटू लागली. आपल्या मराठी शिक्षणाबद्दल एक न्यूनगंड मनात घर करून बसला. मराठी वाचन बंद झालं आणि त्या अनुषंगाने वाचनच संपूर्णपणे बंद झालं.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची निवड केल्यामुळे फक्त तांत्रिक अभ्यास करावा लागला आणि ह्या न्यूनगंडाचा फारसा प्रभाव न पडता पदवीपर्यंतचं शिक्षण निभावून गेलं. मात्र व्यवस्थापकीय अभ्यासक्रमात नुसतं पुस्तकी ज्ञान असून चालत नाही. तिथे तुम्हाला तुमचे विचार तुमच्या स्वतःच्याच शब्दांत मांडावे लागतात. आणि तेही शंभर लोकांच्या समोर. शाळेत वक्तृत्व आणि नाटकांमध्ये भाग घेतल्यामुळे लोकांसमोर बोलायची तशी सवय होती. पण लोकांसमोर उभं राहून इंग्रजीत बोलायला आत्मविश्वास आणि शब्दभांडार तोकडे पडत होते. विचार एका भाषेत करून बोलायचं दुसऱ्याच भाषेत ह्याकरता फार तारेवरची कसरत करावी लागते. भाषांमधली ही लढाई आपली आपल्यालाच लढावी लागते. काहीतरी उपाय शोधणं गरजेचं होतं. भाषेची लढाई लढण्याकरता एकच मित्र तुमची मदत करू शकतो आणि ती म्हणजे पुस्तकं. अशा प्रकारे निव्वळ गरजेपोटी माझं वाचन पुन्हा एकदा सुरू झालं.

इंग्रजी वाचनामुळे पुस्तकांचं एक नवीन विश्व माझ्यापुढे खुलं झालं. मित्रांकडून आणलेल्या लोकप्रिय कादंबऱ्यांपासून सुरूवात होऊन माझी मजल अगदी वैज्ञानिक आणि आध्यात्मिक पुस्तकांपर्यंत गेली. इंग्रजी पुस्तकांनी मला इंग्रजी भाषा सुधारायला मदत तर केलीच पण त्यामधून जो आनंद मला मिळाला त्याला तोड नाही. वाचनाचा आनंद हा भाषातीत असतो पण तरीही इंग्रजी पुस्तकं वाचताना एक अपराधीपणाची भावना बोचत राहते. घरची शेती असताना हॉटेलात जाऊन चमचमीत जेवण जेवतोय असं वाटतं. मी कुठेतरी वाचलं होतं की इंग्रजी साहित्य एवढं प्रगल्भ झालं ते इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारामुळे. निरनिराळ्या क्षेत्रांतील मंडळी साहित्य क्षेत्रात उतरली आणि त्यांनी इंग्रजी साहित्याची श्रीमंती वाढवली.

मराठीची लोकप्रियता जर वाढवायची असेल तर मराठी साहित्यातही वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींनी लिखाण करायची गरज आहे. मग एक विचार आला की आपणच प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. मराठीशी इतके दिवस फारकत घेतल्यामुळे ती भाषाच माझ्यावर जणू रुसली होती. पण थोडी मनधरणी केल्यावर हळूहळू जमू लागलं. काही कविता झाल्या, काही लेख झाले, अगदी चक्क एक कादंबरीही लिहून झाली.


आता लिखाणाला सुरूवात तर केली पण हे सगळं रसिकांपर्यंत पोहोचवायचं कसं? एकविसाव्या शतकात इंटरनेटसारखं दुसरं जबरदस्त माध्यम नाही. तेव्हा ह्या माध्यमाद्वारे तुमच्यासमोर माझं लिखाण ठेवत आहे. एकीकडे आशा करतो की माझं लिखाण तुम्हाला आवडेल तर दुसरीकडे अशीही इच्छा बाळगतो की माझा हा प्रयत्न पाहून तुमच्यापैकी काही जण नवनिर्मितीचा असाच प्रयत्न करतील आणि आपली मायबोली अधिकाधिक समृद्ध करायला हातभार लावतील.

माझ्या लिखाणाबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया ह्यापूर्वी येत होत्या तशाच पुढेही येत राहव्यात अशी इच्छा आहे.


आपला,

sandeep@navanirmiti.com