माझी पुस्तके

जानेवारी 24, 2021

विस्तव – भविष्याचा इतिहास

सुलतानी लोभीपणामुळे आलेल्या आसमानी संकटात पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टी आणि विशेषतः मानवजात विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन ठाकली. मात्र अंगभूत जिजीविषेमुळे जीवसृष्टी तगली आणि त्याबरोबर मागे राहिलेल्या मूठभर मानवांनी पुढील काही सहस्राकांत पुन्हा एकदा संपूर्ण पृथ्वी पादाक्रांत केली. सुरुवातीला फळं-कंदमुळं आणि शिकारीवर उदरनिर्वाह करणारा तो मानवही पुढे शेती करायला शिकला आणि भटक्याचं आयुष्य त्यागून वस्ती करून राहू लागला. आलेल्या स्थैर्याबरोबर समाजाच्या कक्षा विस्तारू लागल्या. कला, क्रीडा, संकृती, युद्धं आली... धर्म आला! वेगवेगळ्या समाजांमध्ये संघर्ष आला. जेत्यांचा धर्म पराजितांच्या गळी उतरवला जाऊ लागला. लहान राज्यं जाऊन मोठे देश आले आणि त्यातील एका देशाने संपूर्ण जगभर आपल्या फांद्या पसरल्या. त्यांच्या पूर्वजांनी उपलब्ध माहितीवर विसंबून नैसर्गिक घडामोडींचा जो काही अर्थ लावला होता तो त्यांच्या धार्मिक आस्थांचं रूप घेऊन सर्वदूर पसरला. मानव बुद्धिमान तर होताच. त्यामुळे त्या मानवाचीही वैज्ञानिक प्रगती झाली. शोध लागले, तंत्रज्ञान विकसित होऊ लागलं. इतके दिवस धर्माची मक्तेदारी असलेल्या प्रश्नांना विज्ञानामुळे काही वेगळीच उत्तरं मिळू लागली. संघर्षाची ठिणगी पडली आणि लवकरच धर्म आणि विज्ञानातून विस्तवही जाईनासा झाला. त्या भविष्यातील माणसाचा हा इतिहास आहे.

‘विस्तवप्रकार: कादंबरी
स्वरूप: Kindle ई-पुस्तक
प्रकाशक: नवनिर्मिती.इन
पृष्ठसंख्या: ६३०
कमाल किंमत: ₹ २५०/-
जानेवारी 15, 2019
Madhyamvargiya

मध्यमवर्गीय – एक काव्यान्वेषण

'मी एक मध्यमवर्गीय आहे. माझ्या आजूबाजूलाही सर्वच जण मध्यमवर्गीय आहेत. मध्यमवर्गीयांच्या एका प्रचंड मोठ्या कळपाचा मी एक हिस्सा आहे. पण हा ‘मध्यमवर्गीय’ नावाचा प्राणी नक्की आहे तरी कसा? त्याचे गुणधर्म काय आहेत? त्याला काय आवडतं? तो कशाला घाबरतो? तो आपलं आयुष्य कसं जगतो? तो आयुष्याची इतिकर्तव्यता कशात मानतो? अशा अनेक प्रश्नाचा छडा लावायचा हा एक माफक प्रयत्न. मध्यमवर्गीय असणं हा काही गुन्हा नाही. त्यामुळे ‘अन्वेषण’ ह्या शब्दामुळे गांगरून जाऊ नका. कविता म्हटलं की दर वेळी काहीतरी भव्यदिव्य किंवा शब्दांच्या पलीकडलं असलं पाहिजे असा काही नियम नाही. तेव्हा ही आहे तुमची-आमची एक गाथा... दैनंदिन अनुभवांवर आधारित.

मध्यमवर्गीय
प्रकार: कवितासंग्रह
स्वरूप: ई-पुस्तक
प्रकाशक: नवनिर्मिती.इन
पृष्ठसंख्या: १५२
कमाल किंमत: ₹ ९९/-
मार्च 18, 2018

अघटित – असं फक्त इतरांच्या बाबतीत घडतं!

'आजची आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना ह्यापूर्वी कधीतरी घडलेली असते. आयुष्य हे रुळावरून धावणाऱ्या आगगाडीप्रमाणे असतं असं गृहीत धरून आपण जगत असतो. आयुष्याला कलाटणी देणारे बदल केवळ इतरांच्या बाबतीत घडतात असा आपला ठाम समज असतो. इतरांकरता आपण ‘इतर’ असतो हे आपण सोयीस्करपणे विसरतो. त्यामुळे एखादी अघटित घटना जेव्हा आपल्या आयुष्यात घडते तेव्हा आपण मुळापासून हादरून जातो. आपल्या बाबतीतही असं घडू शकतं ह्या साक्षात्कारामुळे आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पार बदलून जातो...’

‘अघटितप्रकार: लघुकथासंग्रह
स्वरूप: छापील, Kindle Edition
प्रकाशक: राफ्टर पब्लिकेशन्स
पृष्ठसंख्या: २२८
कमाल किंमत: ₹ २५०/- (छापील), ₹ २००/- (Kindle Edition)
फेब्रुवारी 19, 2018

शिवबा

‘मराठी माणसाचं आद्य दैवत कोणतं?’ असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर खचितच ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असं मिळेल. बुद्धी आणि धाडस ह्या दोन्ही गुणांचा अतुल्य संगम असलेला हा महापुरुष आपल्या ह्या मराठी मातीत जन्माला आला हे ह्या मातीचं आणि येथील लोकांचं अहोभाग्य. मराठी मातीमध्ये बुद्धी आणि धाडसाची वानवा नाही. परंतु ह्या गुणांना योग्य दिशा देण्याकरता एका द्रष्ट्या नेत्याची गरज असते. सतराव्या शतकात परकीयांच्या टाचेखाली भरडत आपली संस्कृती आपली ओळख विसरत चाललेल्या मराठमोळ्या मातीला ते नेतृत्व शिवरायांनी दिलं. ह्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची जयंती १९ फेब्रुवारी रोजी येत आहे. त्यानिमित्ताने ह्या महापुरुषाला आदरांजली वाहण्याचा हा नम्र प्रयत्न.

नोंद: मुखपृष्ठावर स्वतः पेन्सिलीने चितारलेलं महाराजांचं रेखाचित्र वापरू दिल्याबद्दल मंजुषा अकलूजकर ह्यांचे मनःपूर्वक आभार.

‘शिवबाप्रकार: काव्यकादंबरी (ऐतिहासिक)
स्वरूप: ई-पुस्तक
प्रकाशक: नवनिर्मिती.इन
पृष्ठसंख्या: ८८
कमाल किंमत: ₹ ७५/-
सप्टेंबर 29, 2014

अतर्क्य

'मानवी मनाची खोली अजून विज्ञानालाही मोजता आलेली नाही. समाजात वावरताना कसं वागावं एवढंच नव्हे तर कसा विचार करावा ह्याचंही साचेबद्ध प्रशिक्षण आपल्याला लहानपणापासून मिळालेलं असतं. आपल्या मनाला मात्र ही बंधनं मान्य नसतात. सामाजिकच काय पण भौतिकशास्त्राचे नियमही मन मानत नाही. कधी कधी स्वप्नांमध्ये दिसणारे अशक्य कोटीतील खेळ मन उघड्या डोळ्यांसमोर मांडू लागतं. आणि मग 'अतर्क्य' वाटणाऱ्या घटनाही तर्कसंगत भासू लागतात ... '

‘अतर्क्यप्रकार: लघुकथासंग्रह
स्वरूप: छापील, ई-पुस्तक, Kindle Edition
प्रकाशक: राफ्टर पब्लिकेशन्स
पृष्ठसंख्या: २०४
कमाल किंमत: ₹ २००/-
नोव्हेंबर 18, 2012

महायुद्ध

‘दोन सह्स्रकांहून अधिक काळापूर्वी लिहिलेल्या महाभारत ह्या ग्रंथाने भारतीय जनमानस घडवलेलं आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये. अगदी शालेय जीवन सुरु होण्यापूर्वी आपल्या घरच्यांनी सांगितलेल्या कथांद्वारे आपल्यासमोर महाभारतातील श्रीकृष्ण, भीष्म, अर्जुन, युधिष्ठीर आदींचे आदर्श उभे राहतात. आणि ह्या आपल्या सर्व सुपरिचित महानायकांच्या जीवनाची फलश्रुती म्हणजे हे महायुद्ध. ह्या महायुद्धाचा एक काव्यमय मागोवा घेण्याचा हा प्रयत्न ...’

‘महायुद्धप्रकार: काव्यकादंबरी (पौराणिक)
स्वरूप: ई-पुस्तक
प्रकाशक: नवनिर्मिती.इन
पृष्ठसंख्या: १७५
कमाल किंमत: ₹ ९९/-
डिसेंबर 29, 2010
मुक्त - सामाजिक कादंबरी

मुक्त

‘... आणि मग चाळीशी जवळ आलेल्या ह्या ‘नवीन’ पिढीला जेव्हा स्थैर्याची गरज भासू लागते तेव्हा त्यांचे पगार इतके वाढलेले असतात की संस्थेकरता ते फार महागडे झालेले असतात. इतर संस्थाही त्यांना एवढा पगार देऊ शकत नाहीत. अवास्तव पगारामुळे महागड्या सवयी लागलेल्या असतात. मोठी वाहनं, वाहनचालक, विमानप्रवास, परदेशी सहली, मोठमोठ्या क्लब्समध्ये सभासदत्व, महागड्या शाळा, कपडे, दागिने, घरं. मन आणि शरीर तडजोडीला तयार नसतं. स्वतःच्या अहंभावाशी तडजोड केली तरी घरच्यांच्या अपेक्षांचं ओझं उतरवता येत नाही. आणि मग सुरु होते एक जीवघेणी धडपड ...’

‘मुक्तप्रकार: कादंबरी (सामाजिक)
स्वरूप: ई-पुस्तक
प्रकाशक: नवनिर्मिती.इन
पृष्ठसंख्या: २६५
कमाल किंमत: ₹ १५०/-