समज
सप्टेंबर 5, 2019शिल्पकार
नोव्हेंबर 14, 2019हा नाही अहंकार
आज शहीद भगत सिंग जयंती आहे. त्यांच्या स्मृतीस सादर प्रणाम. साँडर्स हत्या प्रकरणी त्यांच्यावर खटला सुरु होता. दोन दिवसांनी काय निकाल लागणार आहे हे सांगण्याकरता कुण्या ज्योतिष्याची गरज नव्हती. बाबा रणधीर सिंगांनी त्यांना ईश्वराला शरण जाण्याचा सल्ला दिला. भगत सिंगांचा नकार बाबांना दर्पोक्तीपूर्ण वाटला. भगत सिंगांच्या मनात विचारमंथन सुरु झालं ज्यातून जन्माला आला एक निबंध ‘मी नास्तिक का आहे’. त्या गद्यरुपी कवितेचा काव्यरूपी संक्षेप करण्याचा हा नम्र प्रयत्न…ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/jhvmLiuBCi0 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
नास्तिक माझे बोल ऐकुनी बाबा मजला वदले
देवाच्या चरणी अर्पण कर दिन शेवटचे उरले
अहंकार हा तुझ्या मनीचा आड येई भक्तीच्या
तेच खरे पुण्यात्मे ज्यांनी त्या शक्तीला स्मरले
प्रामाणिक माझी नास्तिकता ठाम मनात विचार
हा नाही अहंकार ॥ १ ॥
नाव जाहले माझे आणि कीर्ती मिळाली ताजी
तरी देव नाही मी नाही स्पर्धा त्याची माझी
घडले विचार माझे जेव्हा कुणीही ओळखत नव्हते
बालपणी जरी पूजा करण्या होत असे मी राजी
कीर्तीमुळे शेफारून माझे घडले नाही विचार
हा नाही अहंकार ॥ २ ॥
अनेक जण प्राणार्पण करती स्वतंत्रता संग्रामी
हिंदू म्हणतो पुढल्या जन्मी होईन बघ राजा मी
नंदनवनीचे स्थान मिळविण्या इसाई मुसलमान
शरण नाही गेलो असल्या कुठल्या प्रलोभनाला मी
फास आवळता संपून जाईल माझा हा अवतार
हा नाही अहंकार ॥ ३ ॥
पतितांचा उद्धार जपावी मानवतेची नाती
प्रयत्न करणे केवळ असते तुमच्या आमच्या हाती
यशही मिळेल तुम्हां मिळाली जर नशिबाची साथ
देव कशाला हवा मारण्या अपयश त्याच्या माथी
जबाबदारी झटकून टाकी हा कैसा आजार
हा नाही अहंकार ॥ ४ ॥
पूर्वज आपुले विचार करती समय असे भरपूर
कसा अर्थ लावावा निसर्ग होत असे निष्ठुर
अल्पज्ञान लावून आपुले लावत बसले अर्थ
म्हणून एवढ्या विविध कल्पना अंतर जितुके दूर
आजही बसले कुरवाळत ते जीर्ण आपुले विचार
हा नाही अहंकार ॥ ५ ॥
अज्ञानी मानवा दिलासा देव जन्मास आला
धीर देण्यास संकटसमयी देव जन्मास आला
प्रतिष्ठितांनी मात्र तयाला असे काही वापरले
दमन कराया दलितांचे मग देव आधार झाला
देव बेगडी नको मला तो काडीचा आधार
हा नाही अहंकार ॥ ६ ॥
श्रद्धा म्हणजे दुर्बलता जी वसते मनामनात
किंवा चुकीचे निष्कर्षच जे रुजले अज्ञानात
प्रबळ मनाला भासत नाही गरज बाह्यशक्तीची
कणखर मन विज्ञान भरतसे शक्ती मनगटात
आत्मविश्वास माझ्या मनीचा बळ देई अपार
हा नाही अहंकार ॥ ७ ॥
असेल जर तो देव कुठे अन् असेल त्याला जाण
जगामध्ये त्याच्या पापाला कसे असावे स्थान
का अपुल्या देशाची जनता पिचते दारिद्र्यात
का इंग्रज राक्षस माथ्यावर मांडून बसला ठाण
बंदुका आणि पोलीस त्यांच्या राज्याचा आधार
हा नाही अहंकार ॥ ८ ॥
सुधार शासन प्रतिबंध असे पापावर उपचार
देवाधिष्ठित धर्मांमध्ये दिसत नाही सुधार
कनिष्ठ जातीमध्ये जन्मला पापी त्याला म्हणती
त्यातून सुटका केवळ दिसता मरणाचे मग द्वार
देवाला त्या दिसत नाही का पायतळी अंधार
हा नाही अहंकार ॥ ९ ॥
देवच कर्ता देवच धर्ता देवच सर्वेसर्वा
जगन्नियंत्याला विश्वाची जर का असेल पर्वा
आवडते का त्याला जग हे जे त्याने निर्मियले
हिशोब त्याने कुणास द्यावा सर्वप्रथम ते ठरवा
जाब विचारा त्याला ह्याला तू रे जबाबदार
हा नाही अहंकार ॥ १० ॥
कसे निपजलो कोठून आलो हे आता समजाया
नव्या पिढीला खगोल आणि डार्विन द्या वाचाया
रोगराई गरिबीला कारण पूर्वजन्म तो नाही
प्रगतीकरिता विज्ञानाची कास सांगा धराया
सोडूनी पुराण हाती धरू विज्ञानाचे अवजार
हा नाही अहंकार ॥ ११ ॥
प्रत्येक क्रांतिकारकाकडे गुण हे दोन असावे
चिकित्सा विचारांची करुनी टीकाही करीत जावे
दोन्ही गुणांचे वावडे असे देव संकल्पनेस
अशा ह्या दुराग्रहास तुमच्या सांगा का मानावे
कालबाह्य कल्पनाच ज्याचा होत नाही विस्तार
हा नाही अहंकार ॥ १२ ॥
असे महात्मा कुणी म्हणुनी तो सर्वज्ञानी का ठरे
विरोध करण्या त्याला त्याचा भक्त कसा घाबरे
बनवून त्याला देव तयाचे विचार होतील पंगू
बंध घालूनी अडवू नका ते खळखळणारे झरे
पटेल जे जे त्याचे त्याचा फक्त करा स्वीकार
हा नाही अहंकार ॥ १३ ॥
मृत्यूसमय समजेल उद्याला येईल जेव्हा जाग
ठरेल नैतिक पतन करी मी नास्तिकतेचा त्याग
देव मानूनी कशी करू मी स्वतःचीच फसगत
कसा लावूनी घेऊ माझ्या निर्भयतेवर डाग
अहंकार जर ह्याला म्हणता देईन मी रुकार
हा असे अहंकार ॥ १४ ॥