फाळणी
ऑगस्ट 5, 2011वैमानिका…
डिसेंबर 7, 2012शहर
ग्रामीण भागातील समस्यांचा रामबाण उपाय म्हणून शहरांकडे बघितलं जातं. आणि मग गावातून शहरात येणारे लोंढे वाढतच जातात. आपल्या आई-वडिलांनी बहुतेक तेच केलं. पण सुव्यवस्था कोलमडलेल्या ह्या नगरांमध्ये गावातून येणारा माणूस खरच सुखी होतो का?
दहा बाय बरची लहानशी खोली
म्हातारीचा बिछाना; बाळाची झोळी
मुलांचा अभ्यास; बायकोचा स्वयंपाक
तिथेच झोपतो करून अंगाची मोळी
झोपलो तरी असतो निदान पसरून पाय
गाव सोडून मी मिळवलं काय? || १ ||
लोकलमधून जातो येतो; गर्दीत जातो पिचून
कारखान्यांतला धूर रित्या पोटी जातो पचून
स्वतःकरता वेळ नाही घरच्यांकरता वेळ
रात्री घरी येईस्तोवर ताकद जाते खचून
तब्येतीला झाला आहे कायमचा अपाय
गाव सोडून मी मिळवलं काय? || २ ||
एक तारीख येता मिळे तुटपुंजा पगार
खायचं सामान घेऊ की कपडे घेऊ चार?
अपेक्षेने पाहणारे चेहेरे टाळण्याकरता
तोंड लपवून घरी जातो उशिरा चिकार
पोटाच्या भुकेला काही सांगा हो उपाय
गाव सोडून मी मिळवलं काय? || ३ ||
पत्र्याच्या डब्यामध्ये वाढवतो मी तुळस
खोलीबाहेर भिंतीवरती वाढत जाई पळस
तेच माझं वृंदावन अन् तीच माझी बाग
खुंटलेल्या निसर्गाची वाटत नाही किळस
शेत होतं माझं आणि होती एक गाय
गाव सोडून मी मिळवलं काय? || ४ ||
गावी फार पैसे होते असं काही नाही
तरी सुख तिथेच होतं असं वाटत राही
इतके सारे लोक तरी इथे एकटं वाटे
गावी मोकळ्या होत्या माझ्यासाठी दिशा दाही
वठतोय एका झाडासारखा इथे मुळांशिवाय
गाव सोडून मी मिळवलं काय? || ५ ||